आभार आणि नमस्कार

आभार आणि नमस्कार
- मधुकर भावे
९ अॅक्टोबर... या वाढदिवसादिनी अनेक प्रिय मित्रांनी, वाचकांनी प्रत्यक्ष फोन करून, समाज माध्यमांद्वारे त्यांच्या अत्यंत प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या भावना व्यक्त केल्या.  त्या सर्वांच्या ऋणातून कसे मुक्त होता येईल... त्या क्षणाला मनाला असे वाटत होते की, मी  आज जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. त्यात भर पडली माझी प्रिय कन्या नेत्रविशारद डॉ. मृदुला हिने या वाढदिवसाला औक्षण करताना, मला चक्क तीन पुस्तके भेट दिली. डॉ. मृदुला आता ५२ वर्षाची आहे. तिने मला पहिल्यांदाच पुस्तकांची भेट दिली.  तिने आजपर्यंत दिलेल्या अनेक भेटींपेक्षा हीच सर्वोत्तम भेट आहे. त्यातही ग. दी. माडगुळकरांचा ‘बांधावरच्या बाभळी’, हा कथासंग्रह, सुधा मूर्ती यांचे ‘परिघ’, आणि लक्ष्मण गायकवाड यांचे ‘उचल्या’ ही तीन पुस्तके हा वाढदिवसाचा खूप मोठा ठेवा  आणि मेवा आहे. त्यातील दोन पुस्तके वाचली होती. सुधा मूर्ती यांचे ‘परिघ’  मूळ पुस्तक वाचले होते. उमाताई कुलकर्णी यांनी केलेल्या अनुवादाचे हे पुस्तक छानच आहे... शिर्डीहून आल्याआल्या रातोरात वाचून काढले. लक्ष्मण गायकवाड यांचे ‘उचल्या’ तर ३० वर्षांपूर्वी ‘लोकमत’मधून महाराष्ट्रभर पोहोचवले होते. लातूरला लक्ष्मणरावांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घराचे दार तीन फूट ‘उंच’ होते. वाकून आत गेल्यावर त्यांची प्रिय आई चुलीवर चहाचे आधण ठेवत होती. खूप छान स्वागत केले. पितळ्याच्या भांड्यातील तो चहा.. आजही लक्षात आहे. कारण त्यात पुरेपूर प्रेम भरले होते... लातूरहून आल्यानंतर ‘लोकमत’मध्ये ‘‘उचल्या’च्या घरात जेव्हा मन चिरते’ हा लेख लिहिला. हजाराच्यावर वाचकांची पत्रं आली.  वाचकांचा प्रतिसाद हेही पत्रकारासाठी मोठेच धन आहे. 
वाढदिवसाच्या आगोदर दोन दिवस आमची पुण्याची नवलेखिका , कवयत्री शुभांगी मांडे-खारकर हिने अगदी आकस्मातपणे वाढदिवसाची भेट म्हणून, तिचेच तीन कथासंग्रह पाठवले. डिम्पल प्रकाशनने ते प्रसिद्ध केले आहेत. दिग्दर्शक चंद्रकांत कळकर्णी यांनी या तीन पुस्तकांचे प्रकाशन केले होते. ‘गोफ’, ‘कवडसे’ आणि ‘बेघर’ ही ती तीन पुस्तके...  यावर्षीच्या वाढदिवसाला या मिळालेल्या सर्वाेत्तम भेटी. याशिवाय दिवसभर शिर्डीत असल्यामुळे जामर लागलेला फोन सुरू झाल्यावर, शेकडो जणांच्या शुभेच्छा वाट्सपवर, फेसबूकवर आणि फोन सुरू झाल्यवर रात्री १२ वाजेपर्यंत खणखणणारे फोन.... मी विचार करत होतो की, ही केवढी मोठी श्रीमंती आहे... आयुष्यात बँकेत जमा किती, याला काहीच महत्त्व नाही. पण, असा सर्वबाजूंनी होणारा आपलेपणाचा वर्षाव आणि त्यातील मनापासून होणारे अभिनंदन.... फोन करणारे अनेक... संदेश पाठवणारे अनेक वाचक असे आहेत की, त्यांना मी भेटलेलोही नाही. पाहिलेलेही नाही... ओळखही नाही... पण शब्द कसं नातं तयार करू शकतात आणि ते नातं किती जीव लावतं... हे अनुभवतोय... जीवनात जी समाधानाची ठिकाणं आहेत... त्यात न भेटलेल्या व्यक्तींचा वाचक म्हणून, असा प्रेमाचा वर्षाव हे फार मोठे समाधान आहे... एक गोष्ट मान्य केली पाहिजे... प्रत्येकालाच मोठं होता येणार नाही... प्रत्येकजण कर्मवीर होऊ शकत नाहीत... प्रत्येकजण क्रांतिवीर होऊ शकत नाही... प्रत्येकजण महात्मा होऊ शकत नाही... प्रत्येकजण बाबासाहेब होऊ शकत नाही... मी फार छोटा माणूस आहे... पत्रकारितेत संधी मिळाली... अत्रेसाहेबांचा परिसस्पर्श झाला... पुढे बाबूजींनी ‘लोकमत’चा संपादक केले... ही सर्व आई-वडीलांची पुण्याई आहे. नाहीतर माझ्याजवळ होते काय? त्यामुळे मागे वळून पाहिल्यावर समुद्राची भरती ओसरली असली तरी भकासपण अजिबात जाणवत नाही. शिवाय एक गोष्ट समजून घेतली पाहिजे... आयुष्यात प्रत्येक दिवशी प्रत्येक ‘दान’ आपल्या बाजूने पडेलच असे नाही... प्रत्येक दिवशी... प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल, असे तर अिजबात नाही... उलट जीवनात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत, हे गृहीत धरूनच मन कणखर बनवावे लागते. आणि प्रत्येक विषयाकडे सकारात्मक भूमिकेने पहायची वृत्ती असली की, कशाचाच त्रास होत नाही. अकारण त्रास करून घेणे हा ही एक आजार आहे... वृत्ती समतोल ठेवली तर या आजारापासून दूर राहता येते.... आयुष्य सरळ मार्गी जाणार, असे गृहीत धरू नये... प्रत्येक गोष्ट मनासारखी होणार, असे तर अजिबात गृहीत धरू नये... अनेक अडचणी... आजारपण, दु:ख ही वाट्याला येणारच आहेत... ‘जगी सर्वसुखी’ कोणीच नाही. अडचणीचे स्वरूप वेगवेगळे असेल... पण, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते. आणि यासाठी वाचन यासारखा मित्र नाही... आपले काम प्रामाणिकपणे, निर्भयपणे आणि मनापासून करत रहा... तर अनेक अहंकार आपोआप गळून पडतात... आणि आपण किती छोटे आहोत, याची जाणीव जगाकडे पाहून सतत मनात ठेवली तर पाय जमिनीवर राहतील! आपल्यापेक्षा खूप मोठी माणसं जगात आहेत... सेवाभावी आहेत... खूप मोठं सामाजिक काम उभे केलेली आहेत... सन्मानापासून दूर आहेत... सत्तेच्या पदापासूनही दूर आहेत... तरीही ती दिग्गज माणसं आहेत... त्यापुढे आपण काजवासुद्धा नाही. 
कुसुमाग्रजांनी एक छान कविता लिहिली... त्यात माणसाचे छोटेपण त्यानी  किती नेमक्या शब्दांत सांगितले आहे... 
असीम... अनंत... विश्वाचे रण..
त्यात हा पृथ्वीचा इवला कण... 
त्यातला आशिया... त्यातला भारत... 
छोट्याशा शहरी... छोट्याशा घरात 
कोणी मी वसे... 
क्षुद्रता अहो ती अफाट असे... 
आपण नेमके कोण आहोत... हे एकदा जाणून घेतले की, मग आपण जिथे आहोत त्या जागेवर जितकं चांगलं काम करता येईल... त्याचं समाधान काही वेगळेच असते... मी संपादक म्हणून निवृत्त होऊन आता २४ वर्षे झाली. कोणत्याही जागेवरून निवृत्त झालेली ती-ती माणसं निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी किती अस्वस्थ असतात.. जणू आता सर्वस्व गमावले आहे.. असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो. घरात कोंडून घेतात... जे  छोटे-मोठे काम मिळेल, ते टाईमपास म्हणून करत राहतात... आयुष्यातला आनंद आणि उत्साह गमावल्यासारखे त्यांना वाटत राहते. निवृत्ती हे निसर्गचक्र आहे. निवृत्ती वयाची होते... उत्साहाची होत नाही... वाचनाला निवृत्ती नाही... चिंतन करायला निवृत्ती नाही... आणि चांगलं काम करायला निवृत्ती तर अजिबात नाही... मला अनेक मित्र विचारतात... ‘अरे, या वयात तुझ्या उत्साहाचे रहस्य काय....?’ मी सांगतो, ‘खरं तर रहस्य सांगायचं नसतं... पण, ‘या वयात’ या शब्दालाच माझा आक्षेप आहे. मी वयाने निवृत्त आहे... उत्साहाने नाही... सतत काम करत रहा... वयाची अडचण येत नाही... पडल्या पडल्या झोप लागते की नाही पहा... रात्री पडल्या पडल्या झोप लागणं आणि उठल्या उठल्या पोट साफ होणे हे निरोगी शरीराचं जसं पहिलं लक्षण आहे... तसं निरोगी मनाचेही तेच लक्षण आहे..’ विनोबा नेहमी सांगायचे, ‘जेवढे वय वाढते तेवढा अनुभव अधिक उपयोगी पडतो.  त्यासाठी चिंतन लागते.’ शिवाय वाढदिवस या संकल्पनेत ‘वाढ’ हा शब्द असला तरी तो अनुचित आहे. खरंतर आयुष्याचं एक वर्ष त्या दिवशी कमी होते.. त्यामुळे तो ‘काढदिवस’ आहे. पण काढदिवस या शब्दातील नैराश्य बाजूला फेकून दिले की, मग विषय सोपा होतो.  मग कोणत्याही अडचणीवर मात करता येते. 
शरद पवारसाहेब यांच्याकडे पहा ना.. किती असाध्य दुखण्यावर मात करून आज ते खंबीरपणे कसे उभे आहेत... इतक्या कणखर मानसिकतेला आजार आणि निराशा कधीच पराभूत करू शकत नाही. ते आणि त्यांच्यासारखी अनेक माणसे खूप मोठी आहेत... पण त्यांच्याकडून आपण हेच शिकले पाहिजे की, आपण निराश न होता काम करत राहिले पाहिजे. ‘लोकमत’मधील माझी एक संपादकीय सहाय्यक निवृत्त झाल्यावर मला फोन करून म्हणाली की, ‘अहो भावेसर, तो अमूक अमूक मंत्री माझा फोन उचलत नाही... असं कसं...’ मी शांतपणे सांगितले... ‘शांतपणे विचार कर... तो फोन उचलत नाही हे बरोबर आहे... कारण आता तू संपादक नाहीस... ज्यावेळी तुझा फोन उचलला जात होता... त्यावेळी तो तुझा फोन उचलत नव्हता... तर तू ज्या पदावर आहेस, त्या पदाचा फोन उचलत होता... त्यामुळे आपण जेव्हा त्या जागेवर नाही त्याचा हा फरक लक्षात घेतला की, त्रास होणार नाही.’ कोणतीही मनाविरुद्ध होणारी गोष्ट अंगाला चिकटवून घेतली नाही की, मग कसलाच त्रास होत नाही. हे जीवनाचे सोपे सूत्रं आहे... वसंतदादांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा फेकून दिला... ही सोपी गोष्ट होती का? राजीनामा दिल्यावर स्वत:च्या गाडीने ते माहीमला घरी आले.. आणि म्हणाले, ‘यशवंता, मी आता चार तास झोपतो... कोणी आले तरी मला उठवू नकोस... आजची माझी झोप  सगळ्यात गाढ झोप असेल...’ मनावर ओझं न ठेवता कसं वागायचं... याची ही उत्तम उदाहरणे आहेत... १९८० साली शरद पवार यांचे  पुलोद सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केले.. तेव्हा शरद पवार वानखेडे स्डेडियमवर बॉर्डर कप्तान असलेली अॅास्ट्रेलियाविरुद्धची क्रिकेट मॅच पहात होते. सरकार बरखास्त केल्याच्या पी. टी. आय. च्या बातमीचा तुकडा घेवून त्यांचे सचिव श्री. धुवाळी स्टेडियमवर आले... त्यांनी बातमी हातात दिली.. पवारसाहेब म्हणाले, ‘चला आता पूर्ण मॅच पहायला मोकळा झालो...’ कशात फार गुंतायचे नाही.. आणि कशात फार अडकायचे नाही... हे ज्याला समजले त्याला जीवनात फार अडचण येत नाही. 
शेवटी एवढेच... माझे समाधान यामध्येच आहे की, मी आयुष्यात ६४ वर्ष मला आवडणाऱ्या पत्रकारितेच्या व्यवसायात अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे समर्पित केली. सर्व क्षेत्रातील उंचच उंच व्यक्तिमत्त्व मला गेल्या ६४ वर्षांत पाहता आली. त्यांच्याजवळ जाता आले... बोलता आले... त्यांच्यासोबत प्रवास करता आला... ३० पुस्तके लिहिता आली. आणि ती वाचकांकरिता लिहिली नाहीत... माझ्या समाधानाकरिता लिहिली... 
माझ्याजवळ अनेक पुस्तकं संग्रहित केली. विकत घेतली... आता पुस्तकं ठेवायला जागा नाही म्हणून २४० पुस्तके नाशिकच्या सार्वजिनक वाचनालयाला भेट दिली. आणि १०० पुस्तके मुंबई मराठी पत्रकार संघाला भेट दिली. अगदी निवडक संदर्भ ग्रंथ तेवढेच ठेवलेले आहेत. 
एक समाधान असं की, असं कोणतेही क्षेत्र नाही ज्यातील उतुंग माणूस गेल्या ६४ वर्षांत मला पाहता आला नाही... मला भेटता आले नाहीत... मग तुकडोजीमहाराजांंपासून गाडगेबाबांपर्यंत... भाऊराव पाटील यांच्यापर्यंत... पंडित नेहरूंपासून यशवंतरावांपर्यंत, लता दीदींपासून पद्मजा फेनानीपर्यंत... पंजाबराव देशमुख यांच्यापासून उद्धवराव पाटील यांच्यापर्यंत... अचार्य अत्रे यांच्यापासून माधव गडकरी यांच्यापर्यंत... पत्रकारिता, राजकारण, साहित्य, कला... संगीत.. क्रीडा.. या सर्व क्षेत्रांतील दिग्गजातील दिग्गज यांचा सहवास आणि प्रेम यापासून खूप काही शिकता आले. आणि तिच तर आयुष्याची मोठी शिल्लक आहे... शिवाय मी स्वत:ला मोठा कधीच मानत नाही. खूप दिग्गज पत्रकार होते... आणि आजही आहेत... सामान्य माणसं तर असामान्यांपेक्षा मोठी आहेत. जी माणसं लांबून खूप मोठी वाटतात ती कधी कधी जवळ गेल्यावर मनाने खूप लहान वाटतात... आणि जी खूप लहान वाटतात ती जवळ गेल्यावर मनाने डोंगराएवढी वाटतात... अशी अनेक उदाहरणे सांगू शकेन... महाराष्ट्रात अनेक मोठे पत्रकार झाले आणि आजही आहेत... त्यासमोर  मी कोण आहे? एक गोष्ट सांगून थांबतो.. आणि सगळ्यांचे आभार मानून, सगळ्यांना नमस्कारही करतो.. 
एक खूप श्रीमंत माणूस रात्री झोप येईना म्हणून, आपल्या बंगल्याच्या हिरवळीवर शाल पांघरून उभा राहिला... खूप थंडी होती.. धुकं पडलं होते... दरवाजावरील सुरक्षा रक्षकाने पाहिले... ‘हिरवळीवर कोणीतरी उभे आहे...’ तो धावत आला... दहा फुटांवरून त्याने जोरात आवाज करून विचारले... ‘कौन हो तुम...?’ बॅटरीचा टॉर्च तोंडावर टाकला... त्याच्या लक्षात आले की, आपला मालकच उभा आहे... तो आदबीनं म्हणाला... ‘माफी चाहता हँू... साहब... मैने गलत सवाल पुँछा..’ तो मालक म्हणाला... ‘क्या गलत पुँछा... और कभी पुँछा...’ सुरक्षा रक्षक म्हणाला, ‘अभी तो मैने पुँछा आपको...  कौन हो तूम...’ मालक हसत म्हणाला... ‘अरे, तुमने तो अभी पुँछा... मैं पचास साल मुझको पुँछ रहा हूँ... मैं कौन हूँ... और मुझे उसका जवाब नही मिल रहा हैं...’ 
आयुष्यात आपण कोणीही नसतो... आपल्याला जो मोठेपणा वाटत असतो तो एकतर अहंकार असतो... किंवा अभास असतो. एका क्षणात ते सगळं गळून पडतं... ज्या काळात जहाजाला यंत्रे नव्हती त्या काळात जहाजाची ती प्रचंड शीडे बाहुबळावर फडकवणारा कोलंबस त्याच्या निर्धारामुळे जगात विख्यात झाला... पण त्याला शीडं फडकवण्यासाठी मदत करणारे असंख्य हात होते... ते अपरिचितच आहेत... सगळ्यांच्याच वाट्याला कोलंबस होणे जमणार नाही... पण, कोलंबसाच्या त्या गर्वगीताला आणि शीडं फडकवण्याऱ्या त्याच्या सहाय्यकांसारखे आपलेही हात आयुष्याचे शीड फडकवताना लागले तरीही स्वत:साठी तो फार समाधानाचा क्षण आहे. आणि गेली ८४ वर्षे तोच क्षण मी मोलाचा मानतो... आणि माझ्या मनाला मीच प्रश्न विचारतो... मी खरंच कोण आहे? किती छोटा आहे... अफाट आणि प्रचंड जगातला एक बिंदू.... आिण जगसुद्धा किती छोटं आहे... ते त्या सुनिता विल्यमला विचारा... मग विश्वाच्या रणाची कल्पना येऊ शकेल... आणि त्या चंद्रयानाला बोलता आले तर जग किती छाटं आहे ते तोच सांगेल... आपल्या विज्ञान शास्त्रज्ञांचे मोठेपण मात्र अफाट आहे. त्याला तोड नाही. देश के झेंडेपर चाँद लगाना आसान है... लेकिन चाँदपर देश का झंडा लेहराना बडी कायमाबी हैं. ये ‘औकात’ का फरक हैं... आणि याच वैज्ञानिक प्रचंड झेपेमुळे हे असीम आणि अनंत जग छोटं ठरलं आहे... मग मी आणि सगळेच किती छोटे!
पुन्हा एकदा सगळ्या प्रियजनांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार... 
कळावे...
अनेक वर्ष शुभेच्छा देत आहात... त्याच शुभेच्छांच्या पाठींब्यावर आणखी दहा वर्षे याच उत्साहाने आणि आत्मविश्वासाने जेवढं जमेल तेवढं काम करीत राहीन... महाराष्ट्राला आणि कोणालाही कमीपणा वाटेल, असे माझ्या हातून काही होऊ देणार नाही.
सध्या एवढंच...📞9892033458

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*