दावणीचा बैल गेला.. वळसणीला ट्रॅक्टर लागला...


दावणीचा बैल गेला.. वळसणीला ट्रॅक्टर लागला...
बैलांची संख्या कमी झाल्याने ग्रामीण भागात ट्रॅक्टर पूजन केले जात आहेत.
मनोजकुमार मस्के -मांगरूळ
 शिराळा तालुका तसा कष्टकऱ्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुर्वी प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी असायची व शेतकामातील कुळव , नांगर , पास , दिंड , कुरी, जू , कोळपे , बैलगाडी आदी सगळे साहित्य असायचे . पण शेतीमध्ये ट्रॅक्टर आला . शेतकऱ्यांनी आपल्या जवळचे बैलाचे नांगर भंगारात विकून टाकले . हळुहळू शेतीमधील सर्व कामे ट्रॅक्टर करु लागला आणि त्यामुळे बैलांची संख्या हळूहळू कमी होत गेली . त्यात बैलांसाठी लागणारे खाद्य व वर्षभर सांभाळण्यासाठी लागणारा खर्च परवडेनासा झाला . हल्ली शेतीच्या कामाला नसून शर्यतीपुरताच बैल सांभाळला जातो तो ही काही प्रमाणात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कामासाठी बैल सांभाळण्याचे प्रमाण कमी झाले व आता काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे .

बेंदूर सणाला पुर्वी खूप थाटमाट होता . प्रत्येकाकडे बैल असलेमुळे बाजारपेठेमध्ये खुप मोठी उलाढाल होत असे . कासरे , दावे , गोंढे , कंडे , शिंगाला लावायचे रंग , वेसण , तसेच बैल सजवण्यासाठीच्या साहित्याची खूप मोठी उलाढाल होत असे . बैलांच्या मोठ्या मिरवणूक निघत असत . बँड - बाजा , गाणी , मस्ती यामुळे ग्रामीण भाग भारावून जात असे आणि बळीराजाचा मोठा आनंदोत्सव होत असे .
पण अलीकडे काही वर्षात बैलांची संख्या कमी झाल्यामुळे ट्रॅक्टरची मिरवणूक सुरू झाली . बैलाचं आणि शेतकऱ्याचे नातं हे फारसं वेगळच आहे. शेतकऱ्याला आपल्या बैलाशिवाय आणि बैलाला आपल्या मालकाशिवाय राहणं कधीच जमलं नाही. पूर्वी  बैलाला खायला मक्याच्या पिठाचे उंडे केले जात असे, तेलाने आणि हळदीने आपल्या बैलाचा खांदा मळला जात असे, बैलाची शिंगे रंगवली जात होती आणि त्याच्या पायावर पाणी घालून त्याचं पूजनही केलं जात होतं. परंतू हल्ली प्रत्यक्ष बैलांची पूजा करण्याऐवजी मातीच्या बैलांची पूजा करावी लागत आहे . आपला देशी खिलार गोवंश वाचला पाहिजे . गाई , बैलं वाचली पाहिजेत, वाढली पाहिजेत यासाठी गोरक्षक अत्यंत तळमळीने काम करताना दिसतात. हल्ली गावात एखाद्याच शेतकऱ्याकडे बैल जोडी दिसते. त्यामुळे  प्रत्यक्ष दावणीच्या बैलाला सजवण्यापेक्षा वळचणीच्या ट्रॅक्टरला सजवण्यात हल्लीचा शेतकरी धन्यता मानतो, अवजारालाच आपला मित्र मानतो, आणि मानाचं तोरण ही औजारालाच बांधतो. खरंच का बैलाचं आणि शेतकऱ्याचं नातं संपत चाललंय... बैलांची संख्या वाढली तरच बेंदूर सण पूर्वीप्रमाणे आपला बाज राखेल , नाहीतर बेंदूर सनाला मातीचाच बैल पुजावा लागणार एवढं मात्र नक्की.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*