मुसळावानी ये... जगबुडी होऊ दे’

‘मुसळावानी ये... जगबुडी होऊ दे’
- मधुकर भावे

चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले. गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ झाला. कधी नव्हे तो हाच पाऊस पुढे राजस्थानभर तीन दिवस कोसळला. संपूर्ण पावसाळ्यात राजस्थानात तीन इंचही पाऊस पडत नाही. जोधपूरमध्ये तर महापूर आला. वेधशाळांचे सगळे अंदाज चुकले. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये छान व्यंगचित्र काढले होते... वेधशाळेने अंदाज वर्तवला होता की....  ‘आज मुंबईत तुफान पाऊस...’ कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्याने सोबत छत्री घेतल्यावर त्याची पत्नी त्याला म्हणते की, ‘छत्रीची गरज नाही...’ तो सांगतो की, ‘वेधशाळेचा अंदाज आहे, तुफान पाऊस येणार....’ पत्नी सांगते की, त्याचमुळे तुम्हाला सांगते की, ‘आज छत्रीची गरज नाही....’ त्या व्यंगचित्रासारखे वेधशाळेच्या अंदाजाचे झाले आहे. मृग कोरडा गेला. परिस्थिती बिकट होत चालली आहे. महाराष्ट्राच्या गलीच्छ राजकारणाचा एवढा धुरळा आकाशात उडालेला आहे की,  आकाशातील ढगही बहुतेक घाबरले.... आणि ते गुजरात-राजस्थानकडे सरकले. या घाणेरड्या राजकारणात झालेल्या चिखलात आपल्या पाण्याची आणखी भर पडून जास्त चिखल होऊ नये, असा त्या ढगांचा उदात्त सामाजिक उद््देश असावा! या घाणेरड्या राजकारणाचे सोडून द्या. महाराष्ट्र आता सुधारेल असं काही वाटत नाही. पण, त्यामुळे प्रश्न संपत नाहीत. उलट अधिक बिकट होतो. पाऊस आला काय आणि नाही आला काय.... सरकारला कशाचे काहीही पडलेले नाही. आजची वृत्तपत्र आणि सरकारचे आरोप-प्रत्यारोप महाराष्ट्रातल्या १२ कोटी लोकसंख्येपासून आणि प्रामुख्याने ग्रामीण प्रश्नांपासून कोसो दूर आहेत. कोणाला काही पडलेले नाही. महाराष्ट्रातील बहुसंख्य नद्या कोरड्या ठाक पडल्या. विहिरी, तळी आटून गेली. मुंबईसारख्या शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांची परिस्थिती प्रत्येक दिवशी धोक्याची होत चालली आहे. तिकडे कोयना धरण कोरडे पडलेय... जल विद्युतिनर्मितीला पाण्याची गरज... उद्या वीजकपात अटळ आहे. आख्या कोकणाला कोयनेची वीज जाते. संपूर्ण कोकण समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. पण, ‘समुद्री चहुकडे पाणी... पिण्याला थेंबही नाही’ ही कोकणची अवस्था वर्षानुवर्षे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारा भाग. पण, सगळे पाणी समुद्राला मिळते. आजून १५-२० दिवस पाऊस आला नाही तर परिस्थितीचे गांभीर्य कल्पनेच्या पलिकडचे आहे. 
१९७२ च्या दुष्काळात मुंबईचे महापौर पाटकर होते. त्यांनी जाहीरपणे सांगून टाकले की, ‘अर्धी मुंबई खाली करावी लागेल’. त्यावेळी महाराष्ट्रात पाऊस झाला होता. मुंबईच्या आसपास तलाव भागात पाऊस नव्हता. आता महाराष्ट्रातही पाऊस नाही. आणि मुंबईतही नाही. घामाच्या धारा लागलेल्या आहेत. मुंबईतील अर्धी लोकसंख्या लोकलच्या प्रवासावर आहे. बाहेर कडक ऊन.... गाड्यांना गर्दी... घामाच्या धारा... चर्चगेट, सी.एस.टी. या स्थानकांतून बाहेर आल्यावर शेअर टॅक्सीला रांगा... उपनगरांत गेल्यावर शेअर रिक्षासाठी रांगा... प्रत्येक दिवस असह्य आहे. ६०-७० टक्के लोकांची घरे एक- दोन खोल्यांची आहेत.... किमान १५ लाख लोकांची घरे पत्र्याची आहेत... माणसं घरात उबलेली आहेत. बाहेर पडली तरी अस्वस्थ आहेत. कामावर जावच लागत आहे... बाहेर पडावेच लागत आहे... ९० टक्के मुंबईकरांची पोटं हातावर आहेत. काही टक्के राजकारणी असे असू शकतील... त्यांचे भरल्या पोटावर हात आहेत. ग्रामीण महाराष्ट्र असाच होरपळलेला आहे... मुंबई होपरळलेली आहे. मुंबईत पाणी कपात होणार आहे... वीज कपात होणार आहे... ग्रामीण महाराष्ट्राची परिस्थिती याहून बिकट आहे. मोठ्या धरणांतील बहुसंख्य धरणांनी तळ गाठला आहे. ‘उजनी’ धरणाचे पाणी सोलापूरला पुरवले जाते. पण पुणे आणि कात्रजमध्ये तुफान पाऊस झाला तरच उजनी धरण भरते. पुणे हे तापलेल्या त्ाव्यासारखे आहे. पुण्याजवळची पाचही धरणांची पातळी झपाट्याने खाली गेली. मूळात ही धरणं शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधली होती. पुणे शहर एवढे वाढले आहे की, सगळ्या धरणांचे पाणी पुणे शहरालाच पुरवावे लागत आहे. शेतीला पाणीच शिल्लक राहात नाही. सगळीच गणिते चुकत चालली आहेत. मूळ प्रश्न गळ्याला फास आवळावा, इतके बिकट होत चालले आहेत. वाढत्या लोकसंख्येने पर्यावरणाचा नाश हा आणखी वेगळाच प्रश्न आहे. त्यावर विचार करायला कोणाला वेळच नाही.  एकट्या मुंबई शहरात केवळ मेट्रो फिरवण्यासाठी लाखभर झाडे तोडली. सिमेंटचे जंगल उभे राहिले. मुंबईचे तापमान ४२ अंशापर्यंत कधीच पोहोचले नव्हते. मुंबई असो... महाराष्ट्र असो... परिस्थिती बिकट होत चालली आहे. पर्यावरण तज्ञा अतुल देऊळगावकर यांच्यासारख्या अभ्यासकांनी एका लेखात असे स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्रातील ५५ नद्यांची १४७ पात्रे प्रदूषीत झाली आहेत. तिकडे गंगामाई साफ करण्याची घोषणा पंतप्रधान मोदीजी यांनी केली होती. त्यातून प्रेते वाहताना पहावी लागली. महाराष्ट्राच्या नद्या एवढ्या कोरड्या आहेत की, त्यातून काहीही वाहून जाण्यासाठी पाणीच राहिलेले नाही. पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रात अतिशय बिकट परिस्थिती असेल... पश्चिम महाराष्ट्रात पेरण्या झाल्यासुद्धा. पण, पाऊस नाही... पेरण्या फुकट गेल्या. विदर्भात गेल्यावर्षीचा कापूस आजून विकला गेला नाही. कारण त्याला भावच नाही. सरकारची एकाधिकार योजना जागेवर नाही. शेतकऱ्यांच्या कापसाची किंमत पाडून त्याला मातीत घातले जात आहे. बोलणारे कोणी नाही... आवाज उठवणारे कोणी नाही... आता जांबुवंतराव नाहीत... ए. बी. बर्धन नाहीत.... सुदामकामा नाहीत... शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारा नेताच राहिलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात  उद्धवराव पाटील नाहीत... एन. डी. पाटील नाहीत...  गणपतराव नाहीत... लढणारी माणसच नाहीत. सत्तेसाठी हापापले खूप आहेत. लोकांच्या प्रश्नावर रान उठवणारे किती आहेत? मुंबईत मृणालताई नाहीत... महिलांचे प्रश्न कमी आहेत का? पण लढणारे कोणी नाही.  वृत्तपत्रांना कशाचेही काही पडलेले नाही. विदर्भातील वृत्तपत्रांनी कापसाच्या प्रश्नावर केवढे रान पेटवायला हवे होते. हताश शेतकरी घरात कापूस कोंबून ठेवला आहे.  त्या कापसाची विक्री झाली नाही तर... येणाऱ्या खरिपासाठी पैसे कुठून आणणार? त्याच्या कोंडीला सीमा नाही. त्याला आवाज नाही... त्याचे ऐकणारे सरकार नाही... त्याच्या बाजूने बोलणारा नेता नाही... गेल्या आठवड्यात वर्ध्यामध्ये गुजरातमधून आलेला १ कोटी रुपये किमतीचे बोगस बियाणे घेवून आलेला ट्रक पकडला. ट्रक गुजरातमधून आला. बोगस बियाणांचे मूळ गुजरातमध्ये आहे. त्याची बाजरपेठ महाराष्ट्र. वृत्तपत्रांनी केवढा आवाज उठवायला हवा होता. हे बोगस बियाणे पोलिसांनी पकडले... ज्यांनी कारवाई केली त्याच्या हिमतीची तारिफ केली पाहिजे. ट्रक गुजरातमधून येत होता. अलिकडे गुजरात म्हटले की, कारवाईची हिम्मत कोणीच करत नाही. सगळेजण दहशतीखाली आहेत. हे बोगस बियाणे जर बाजारात गेले असते  तर हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली असती. पण प्रकरण दडपल्यासारखे आहे. बोगस बियाणांचा व्यापार एक- दोन व्यक्ती करू शकत नाहीत. ही मोठी टोळी आहे. त्याचा कोणीतरी म्होरक्या आहे.... त्याच्यामागे कोणाचातरी राजकीय पाठींबा आहे. त्याशिवाय एवढी हिंमत होणार नाही. आणि खेळ कोणाच्या जीवाशी चालला आहे? कष्टाने कसंतरी जगणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवाशी? काय झालं पुढं त्या ट्रक पकडलेल्या बोगस बियाणे रॅकेटचे? शेवटपर्यंत कळणार नाही. सगळ्या बाजूंनी सामान्य माणसांची अशी भयानक कोंडी आहे... सरकार जागेवर असून नसल्यासारखे आहे. कृषीमंत्र्याला कशाचेही काही पडलेले नाही.  पण निसर्गसुद्धा सामान्य माणसाच्या विरुद्ध गेला आहे. त्या निसर्गालाही कष्टाने जगणाऱ्या शेतकऱ्याची कीव का येत नाही?...  पाऊस येवो किंवा न येवो.... अंबानी-अदानी यांना काहीही फरक पडत नाही. सरकारमधील मंडळींनाही काही फरक पडत नाही.. एसीमध्ये बसणाऱ्याला बाहेरच्या त्रासाची कल्पना येणे शक्य नाही. शेतीतल्या कष्टाची कल्पना त्याच्या पलिकडची आहे. शहरं रंगवण्याचे आणि सजवण्याचे काम जोरात चालू आहे. आणि खेडी उद्धवस्त होत आहेत... या बिकट परिस्थितीत महिनाभर जर पाऊस फरार झाला तर कोणत्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायची...
२९ जूनला आषाढी एकादशी आहे. आता तो एक पांडूरंगच असा आहे की, त्याच्या चरणावर डोके ठेवल्याशिवाय पर्याय नाही. बा विठ्ठला, तू तरी आता महाराष्ट्राला सांभाळून घे रे बाबा... आणि धुँवाधार बरसात कर... 
दया पवार त्यांच्या कवितेत म्हणाले होते.... 
‘मुसळावानी ये आणि जगबुडी होऊ दे...’
आजची  स्थिती अशी आहे की, जगबुडी झाली तरी चालेल... पण पाऊस हवा आहे. 
आज वसंतराव नाईकसाहेबांची आठवण येतेय.... पागेसाहेबांची आठवण  येते... यशवंतराव माहिते यांची आठवण येते... रोजगार हमीची आठवण येतेय.... कापूस खरेदी योजना आठवते आहे... शेतकऱ्याला भाव पाडून नागडे करण्याचा सटोडीयांचा डाव महाराष्ट्राच्या कापूस एकाधिकार योजनेने हाणून पाडला होता. नाईकसाहेब म्हणाले होते, ‘शेती मोडली तर लोकशाही मोडेल... ’ आज लोकशाही मोडण्याचे काम चालू आहे... शेती तर मोडलेलीच आहे. उद्या महाराष्ट्रावर रोजगार हमीची कामे काढण्याची वेळ येणार, ही भिती आहे.... पण, सरकारची काय तयारी आहे? १९७२ च्या दुष्काळात चार-चार, पाच-पाच लाख लोक रोजगार हमीची कामे करत होते. त्यात लाख-दीड लाख स्त्रिया होत्या. भूम पंरांड्यात खडी फोडताना रोजगार हमीवर हाताला घट्टे पडून त्यातून रक्ताची चिळकांडी आलेली भूम परांड्यात त्यावेळच्या दुष्काळ दौऱ्यात पाहिलेली आहे.  या कष्टकरी बाया घरी गेल्या की, वीज गेलेली असायची. मग ८- १० तास काम करून आलेल्या भगिनीला जातं टाकून ज्वारी दळायला लागायची. लेकरांना खाऊ घालायचं... दारू पिणाऱ्या नवऱ्याचा मार खायचा.... सकाळी भाकऱ्या बडवून पुन्हा रोजगार हमीवर हजर.... आज कोणी विचार करू शकेल का? शिंदेसाहेब, जरा समजून घ्या महाराष्ट्र कसा होता ते.... या भगिनीच्या हालाचा विषय वसंतराव नाईकसाहेबांच्या कॅबिनेटमध्ये चर्चेला गेला होता. आणि त्यातून अर्धी मजुरी आणि अर्ध्या मजुरीएवढे ज्वारीचे पीठ याचे वाटप लाखो पिशव्यांनी करायचा प्रस्ताव मोहितेसाहेबांनी मांडला. त्या भगिनिचे केवढे कष्ट टळले.... यंत्रनेने अतियश प्रामाणिकपणे त्यावेळी काम केले. महाराष्ट्र त्यातून उभा राहिला. काहीही बदमाशांनी त्याचा फायदा उचलला पण, असे बदमाश सर्वच काळात असतात... आणि त्यांना पक्ष नसतो... जात-धर्म नसतो... त्यावेळी याची चर्चा ‘बदमाशांची जात किंवा धर्म कोणता’? अशी कधीच झाली नाही. कारण त्यावेळी अशा वादावरच पोट जाळणारे मिडियावाले नव्हते. सकारात्मक दृष्टी होती. त्या कठीण काळात महाराष्ट्राच्या पशुधनाच्या छावण्या आठवतात... एकेक कोटी रुपयांचा चारा एकेका दिवशी पशुधनांसाठी वापरला जात होता. ते सगळे दुष्काळाचे चित्र डोळ्यांना पाहिले आहे. त्याचे शब्दांकन त्याच क्षणी केले आहे. महाराष्ट्रावर ही वेळ पुन्हा येऊ नये... कोणावरही येवू नये... पण, दुर्देवाने दुष्काळाच्या भीषण सावल्यांची मनाला भीती वाटू लागली आहे. हे काल्पनिक भय नाही. खेड्यातील परिस्थिती कठीण आहे. मुंबई- पुण्यासारख्या शहरात पाणीकपात झाली तर पैसेवाल्यांना बिसलरीची कमतरता नाही. आता बिसलेरीवालेही भाव दुप्पट करून येणाऱ्या संकटात कमवून घेतील... एक पाहणी अशी आहे की, २०२३ मध्ये देशातील बिसलरी बाटल्यांची ४५० अब्ज रुपये एवढी विक्री असेल... कारण शुद्ध पाण्याचा आता अभावच आहे. कष्टकऱ्या ग्रामीण भागाला ही बिसलरी परवडणारी आहे का? 
एकूणच महाराष्ट्राचे चित्र पुढच्या काही दिवसांत  अवघड वाटते आहे. रोजगारासाठी संघर्ष, पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष, जगण्यासाठी संघर्ष.... ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही या संघर्षात फार फरक झाला नाही. आज अंतुलेसाहेबांचीही आठवण येते... त्यांनी योजना आणली होती की, अरबी समुद्रात ३०० िकलोमीटर लांब खाऱ्यापाण्याचे गोडे पाणी करण्याचा प्रकल्प टाकू या.... तेव्हाचे ५००० कोटी... त्या योजनेची एसी. केबीनमध्ये बसून संपादकीय लिहिणाऱ्या, मोठी नावे असलेल्या, संपादकांनी अग्रलेखातून केवढी टिंगल उडवली होती! पण आज एशिया खंडातील कितीतरी छोटे- मोठे देश हाच प्रकल्प रावबून हवं  तेवढं पाणी उपलब्ध करून घेत आहेत. 
राजकारण करायचे तेव्हा राजकारण करा... अर्थात आजचे महाराष्ट्राचे राजकारण एवढे घाणेरडे आहे, अशा घाणेरड्या राजकारणाचा आणि सत्ता कारणाचा महाराष्ट्र कधीच नव्हता. पण आज दोन- पाच टक्के लोकांना त्या राजकारणाशी पडले असेल.. ९४-९५ टक्के महाराष्ट्राला ‘पाऊस कधी येतोय..., माझी शेती कधी फुलते आहे... धरणं कधी भरताहेत...’ या एकाच आणि एकाच गोष्टीची महाराष्ट्र वाट पाहात आहे... २९ जूनच्या आषाढीच्या दिवसापर्यंत धँुवाधार पाऊस येऊ दे... साऱ्या महाराष्ट्राची चिंता दूर होऊ दे... त्यासाठी आपण सगळे विठुनामाचा गजर करू या... 
ये रे ये रे पावसा....
तुला देतो पैसा....
पैसा झाला खोटा...
पाऊस आला मोठा.... 
सध्या उलटे झाले आहे.... पैसा मोठा झाला आणि खोटा पाऊस (कृत्रिम) पाडण्याची वेळ आली आहे.  महाराष्ट्राला नैसर्गिक पावसाची तहान लागली आहे. त्यासाठीच विठुरायाकडे प्रार्थना... 
सध्या एवढेच...📞9892033458

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*