आचार्य अत्रे यांना ‘महाराष्ट्र-भूषण’ पुरस्कराने सन्मानित करा
आचार्य अत्रे यांना ‘महाराष्ट्र-भूषण’ पुरस्कराने सन्मानित करा
- मधुकर भावे
१३ जून १९६९ संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १९४६ च्या बेळगाव साहित्य संमेलनापासून आवाज उठवणारे आणि १९५४ ते १९६९ पर्यंत सतत १५ वर्षे आपल्या वाणी आणि लेखणीने महाराष्ट्राचा जागता पहारेकरी म्हणून ज्यांनी अखंड जागल्याची भूमिका घेतली ते आचार्य अत्रे १३ जून १९६९ रोजी महाराष्ट्राला सोडून गेले. मंगळवारी त्यांची ५४ वी पुण्यतिथी... संयुक्त महाराष्ट्राचे सगळे राज्य आणि शेवटी ‘महाराष्ट्र- राज्य’ हे नाव ज्यांच्या शेवटच्या तडाख्यामुळे मिळाले... नाहीतर हे राज्य ‘मुंबई राज्य’ झाले असते... त्या आचार्य अत्रे यांना महाराष्ट्राने काय दिले? महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ या सन्मानाने त्यांना कधीच पुरस्कृत करायला हवे होते. पण, ‘मरणोत्तर पुरस्कार द्यायचा नाही’, असा निर्णय त्यावेळी सरकारने घेतला... मात्र २००८ साली नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला.. मग आता आचार्य अत्रे यांना पुरस्कर देण्यासाठी सरकारला कोणती अडचण आहे? आम जनतेची तर मागणी आहे की, संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारे आचार्य अत्रे, शाहीर अमर शेख, शाहीर आत्माराम पाटील आणि आण्णाभाऊ साठे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने शासनाने सन्मानित केले तर त्या पुरस्काराची शान वाढेल. आतापर्यंत ज्या थोर व्यक्तिमत्त्वांना पुरस्कार दिलेत त्यापैकी कुणालाही या चार नावाने कमीपणा येणार नाही... अभिजनांचा जरूर गौरव करा... पण, बहुजनांनाही तेवढ्याच सन्मानाने गौरवित करता आले पाहिजे...
महाराष्ट्रातील १८ नामवंतांना आतापर्यंत ‘महाराष्ट्र-भूषण’ हा पुरस्कार शासनामार्फत दिला गेला आहे. महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगात दुमदुवून टाकणाऱ्या या महान व्यक्तींचा त्या त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी, या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ‘महाराष्ट्र-भूषण’ पुरस्काराची सुरुवात १९९५ साली युती-सरकार असताना झाली. श्री मनोहर जोशीसर तेव्हा मुख्यमंत्री होते. पहिला पुरस्कार पद्मश्री पु. ल. देशपांडे यांना दिला गेला. त्यानंतर स्वरसम्राज्ञाी लता मंगेशकर (१९९७) यांना दिला. विजय भटकर (१९९९), सचिन तेंडुलकर (२००१), भीमसेन जोशी (२००२), अभय बंग-राणी बंग (२००३), बाबा आमटे (२००४), रघुनाथराव माशेलकर (२००५), रतन टाटा (२००६), रा. कृ. पाटील (२००७), नानासाहेब धर्माधिकारी (२००८-मरणोत्तर), मंगेश पाडगावकर (२००८), सुलोचनादीदी (२००९), डॉ. जयंत नारळीकर (२०१०), डॉ. अनिल काकोडकर (२०११), बाबासाहेब पुरंदरे (२०१५), स्वरभूषण आशा भोसले (२०२१), आप्पासाहेब धर्माधिकारी (२०२३) एवढ्या महनीय व्यक्तींना या पुरस्काराने आतापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराच्या नावांची निवड करण्याकरिता त्या त्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री त्याचे पदसिद्ध सभासद असतात. बाकी तीन सदस्य शासन निवडते. स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २००५ ते २००८ या काळात मी या समितीचा सदस्य होतो. स्वर्गीय बाबा आमटे, श्री. रघुनाथराव माशेलकर, श्री. रतन टाटा आणि रा. कृ. पाटील ही नावे या समितीत मीच लेखी प्रस्ताव देवून सुचविली होती. आणि ती मान्यही झाली होती. त्यावेळी समितीमध्ये स्व. चंद्रशेखर धर्माधिकारी, अजित वाडेकर आणि मी असे तीन ‘अशासकीय’ सदस्य होतो. त्याचवेळी नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याबद्दल बरीच निवेदने शासनाकडे आली होती. तसेच मी त्यावेळी आचार्य अत्रे यांनाही हा पुरस्कार द्यावा, असे सुचविलेले होते. मात्र चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी मुद्दा उपस्थित केला की, ‘हा पुरस्कार मरणोत्तर व्यक्तींना दिला जावू नये...’ माननीय मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा मान्य केला. नंतरच्या समितीने (अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर) अपवाद करून नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र-भूषण’ पुरस्कार देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. आणि त्याप्रमाणे त्यांचे सुपूत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार खारघर येथीलच जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिला गेला. मी समितीत असताना त्या समितीसमोर रा. कृ. पाटील यांचे नाव सुचविले होते... त्यावेळी चंद्रशेखर धर्माधिकारी सोडून बाकी कोणालाही श्री. रा. कृ. पाटील कोण? हे माहितीही नव्हते. अिजत वाडेकर यांनी तसा प्रश्नही केला... त्यावेळी मी त्यांना सांगितले होते, ‘या देशातील शेवटचे आय. सी. एस.’ जे आजही जिवंत आहेत. (त्यावर्षी) आणि अकोला येथे ते राहतात. १९४४ साली ब्रिटीश सरकारने त्यांना अकोल्याचे कलेक्टर म्हणून नियुक्त केले तेव्हा कार्यभार स्वीकारल्यावर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरचा ‘युनियन जॅक’ खाली उतरवून रा. कृ. पाटील यांनी ‘तिरंगा झेंडा’ तिथे फडकवला. म्हणून त्यांची ‘आय. सी. एस.’ पदवी िब्रटीशांनी काढून घेतली. त्यांची जिल्हािधकारी नियुक्ती रद्द केली. त्यांना तुरुंगवास झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची सुटका झाली. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी रा. कृ. पाटील यांना बोलावून नियोजन मंडळाचा आराखडा कसा असावा, याची चर्चा केली. व ते काम त्यांच्यावर सोपवले. आजच्या नियोजन मंडळाचा जो मूळ आराखडा ४०० पानांचा आहे तो श्री. रा. कृ. पाटील यांनी तयार केला आहे. पहिल्या नियोजन मंडळाचे ‘सन्माननीय सदस्य’ म्हणून रा. कृ. पाटील यांची नेमणूक पंडितजींनी केली. आणि या सदस्यपदाच्या काळात मानधन म्हणून महिना फक्त १ रुपया ते स्वीकारत होते. मी १९९३ साली नागपूरला ‘लोकमत’चा संपादक असताना अकोला येथे जावून त्यांना तीन वेळा भेटून आलो होतो. त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केल्याचे भाग्य मला मिळाले आहे.
२००८ सालापासून महाराष्ट्र शासनाने ‘मरणोत्तर’ पुरस्कार देण्याचा पायंडा पाडला आहे... त्यामुळे आचार्य अत्रे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मदिनी (१३ अॅागस्ट २०२३ ) यांना या वर्षीचा पुरस्कार देण्यात शासनाला अडचण नाही... ‘महाराष्ट्र-भूषण’ पुरस्कार देताना जे निकष आहेत त्या निकषामध्ये आचार्य अत्रे बसत नाहीत का? ‘श्यामची आई’ चित्रपटाला १९५४ साली देशातला ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ मिळवणारा हा पहिला चित्रपट आचार्य अत्रे यांनी निर्माण केला होता... खरंतर ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार आचार्य अत्रे यांना देण्याकरिता हे एकच कारण पुरेसे आहे... बाकी साहित्यिक अत्रे, नाटककार अत्रे, चित्रपटकार अत्रे, संपादक अत्रे, वक्ते अत्रे, असे एका आचार्य अत्रे साहेबांच्यामध्ये दडलेले दहा अत्रेसाहेब फार मोठेच होते. पण, १९५४ साली राष्ट्रपतींचे पहिले सुवर्णपदक मराठी चित्रपटाला मिळवून देणारा आणि १९५५ साली म्हणजे दुसऱ्याच वर्षी राष्ट्रपतींच्या नावाने दिला जाणारा ‘रजत पदक’ पुरस्कार आचार्य अत्रे यांच्या ‘महात्मा फुले’ या चित्रपटाला मिळाला... या चित्रपटाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या कीर्तनाने झालेली आहे. गाडगेबाबा यांनी या चित्रपटात कीर्तन करण्यास आचार्य अत्रे यांच्यामुळे मान्यता दिली. आणि चित्रिकरण बघायला साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माई आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांची उपस्थिती होती. हे महाराष्ट्राच्या गावी तरी आहे का? असा दिग्दर्शक आणि चित्रिकरणावेळी डॉ. बाबासाहेबांसारखे महामानव उपस्थित राहण्याचे भाग्य कोणाच्या वाट्याला आले आहे का? ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळायला आणखी कोणता निकष असायला हवा... ? सरकारने या प्रश्नाचं उत्तर द्यावं... उत्तर देता येत नसेल तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार विनाविलंब द्यावा...
मुख्यमंत्री शिंदेसाहेब, ‘महाराष्ट्र भूषण’ निकषात आचार्य अत्रे बसत नाहीत, असे सरकारचे म्हणणे आहे का? तसं असेल तर सांगून टाका ....
आचार्य अत्रे म्हणजे हात लावतील त्याचे सोने करणारा मिडास राजाच जणू! एक शिक्षक असलेले आचार्य अत्रे चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून उतरले आणि त्यांनी निर्माण केलेल्या ‘शामची आई’ या चित्रपटाला केंद्र सरकारने सुरू केलेला पहिला ‘उत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट सुवर्ण पुरस्कार’ १९५४ साली दिल्ली येथे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळाला. या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्पर्धेत तीन चित्रपट दाखवले गेले होते. त्यामध्ये प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॅाय यांचा ‘दो बिघा जमीन..’ त्यानंतर दुसरा चित्रपट होता प्रख्यात दिग्दर्शक सोहराब मोदी यांचा ‘झाशी की रानी’ आणि तिसरा चित्रपट होता आचार्य अत्रे यांचा ‘शामची आई’. स्पर्धेच्या सात परिक्षकांत एकही परिक्षक मराठी नव्हता. तीन परिक्षक बंगाली, दोन परिक्षक उडीया, एक हिंदी भाषिक आणि एक दक्षिणेकडील होता... एकही मराठी परिक्षक नसताना, आचार्य अत्रे यांच्या मराठी भाषेतील ‘शामची आई’ या चित्रपटाची निवड, बिगर मराठी परिक्षकांनी एकमताने केली. ज्या क्षणाला आचार्य अत्रे यांच्या गळयात राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सुवर्णपदक घातले त्याच क्षणाला मुंबईत आचार्य अत्रे यांच्या सुकन्या सौ. शिरीष पै यांना पुत्ररत्न झाले. सुवर्णपदक घेवून आचार्य अत्रे दिल्लीहून निघाले... मुंबईला आल्यावर थेट हॉस्पिटलमधे जावून त्यांनी आपल्या पहिल्या नातवाच्या गळयात हे सुवर्णपदक घातले. आणि त्याचे नाव ठेवले राजेंद्रप्रसाद.... श्रीमती शिरीष पै आपल्या आवडत्या पप्पांना म्हणाल्या, ‘पप्पा, केंवढ लांबलचक नाव...’ शिरीषताईंचे लाडके पप्पा म्हणाले, ‘अगं नाने, तुझं आडनाव एवढूसं... पै.. मुलाचं नाव थोडं लांबलचक असू दे... ’ आजचे प्रख्यात अॅड. राजेंद्र पै हे पूर्ण नावाचे ‘अॅड. राजेंद्रप्रसाद व्यंकटेश पै’ आहेत. शिरीषताईंच्या दुसऱ्या पुत्ररत्नाचे नावही आचार्य अत्रे यांनीच ठेवले. ते नाव आहे... ‘विक्रमादित्य.’ आणि आचार्य अत्रे यांच्या दुसऱ्या कन्या श्रीमती मीनाताई सुधाकर देशपांडे यांच्या सुपूत्राचे नावही आचार्य अत्रे यांनीच ठेवले आहे... आणि ते आहे... हर्षवर्धन सुधाकर देशपांडे... आणि गंमत म्हणजे आचार्य अत्रे यांनी लांबलचक नाव ठेवलेल्या त्यांच्या तिन्ही नातवांची नावे आता बाहेर कोणालाही माहिती नाहीत... घरात आिण बाहेरही ‘राजेंद्रप्रसाद’ नावाचा पहिला नातू ‘राजू’ या नावानेच प्रसिद्ध आहे. दुसरा विक्रमादित्य ‘दित्यू’ या नावाने ओळखला जातो... आणि तिसरा नातू ‘हर्षवर्धन’ आता ‘हर्षू’ झालेला आहे.
अत्रेसाहेब : जयंती आणि पुण्यतिथी
शासकीय पातळीवर आचार्य अत्रे यांची जयंती िकंवा पुण्यतिथी साजरी होत नाही आणि कोणताही राजकीय पक्षही साजरी करत नाही. वरळी येथील आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याला ‘आचार्य अत्रे स्मारक समिती’तर्फे अध्यक्ष अॅड. आरती सदावर्ते (काका पुरंदरे यांच्या कन्या) पुष्पहार अर्पण करून आदरांजली कार्यक्रम होतो. मुंबई मराठी पत्रकार संघात आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेला प्रतिवर्षी पुष्पहार अर्पण केला जातो. सासवड येथे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर, या संस्थेमार्फत अध्यक्ष अॅड. विजय कोलते आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखाध्यक्ष अॅड. आण्णासाहेब खाडे अत्यंत श्रद्धेने गेली अनेक वर्षे हा स्मृतिदिन १३ जून रोजी साजरा करीत आहेत. पुणे येथे श्री. बाबुराव कानडे हे अत्रेसाहेबांचे िनस्सीम भक्त. त्यांनी स्थापन केलेल्या ‘विनोद विद्यापीठा’तर्फेही दरवर्षी जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रम अितशय आदरपूर्वक साजरा केला जातो. आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै, अॅड. विक्रमादित्य पै, हर्षवर्धन देशपांडे यांच्या ‘अत्रेय’ या संस्थेतर्फे दरवर्षी १३ अॅागस्ट रोजी महाराष्ट्रातील एका नामवंत व्यक्तिमत्त्वाला आचार्य अत्रे पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. या सर्व सस्थांनी आचार्य अत्रे यांची स्मृती भावपूर्ण रितीने जपली आहे.
Comments
Post a Comment