महाराष्ट्र भलतीकडेच चालला आहे
महाराष्ट्र भलतीकडेच चालला आहे
- मधुकर भावे
महाराष्ट्रभर सूर्य आग ओकत आहे. काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान करून गेला... खरिपाचा हंगाम जवळ आला... शेतीच्या कामात पावसाची अडचण... शिवाय मृग नक्षत्रापासून येणारा पाऊस म्हणजे ७ जून... वेधशाळा सांगत आहे.... पाऊस लांबणीवर... रब्बीच्या पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने केलेच. येणाऱ्या पावसाची हमी नाही... मुंबई- महाराष्ट्रात कधी नव्हते ते एवढे कडक ऊन. मुंबईने ४० पुढे गेलेला पारा अनुभवला नव्हता. पुढच्या सर्व वर्षांत मुंबई पोळून निघेल... मुंबई दोन कोटी लोकसंख्येची झाली... मेट्रोमुळे ठाण्यापर्यंतची हजारो झाडे तोडली... ठाणे शहर तर उघडे- बोडके झालेय... कडक ऊन... विना सूचना वीज जाणे... सामान्य माणसाचे जे काही हाल होत आहेत... त्याच्याशी कोणाला काहीही पडलेली नाही.... खेड्या-पाड्यांतील स्थिती यापेक्षाही भयंकर... आता खरिपाचा हंगाम सुरू होताना शासनाचे कृषी खाते किती प्रचंड कामात असते.... काल एक व्हीडिओ व्हायरल होत होता.... महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत अब्दुल सत्तार... महाराष्ट्राला त्यांचे नाव ‘कृषीमंत्री’ म्हणून पटकन सांगताही येणार नाही... त्यांच्याच शेतात काही मजुरांना काठीने ते झोडपून काढत आहेत... असा हा व्हीडिओ होता... त्यात सत्तार उघडपणे दिसत आहेत. आताच्या दिवसांत कृषीमंत्री विभागवार बैठकांमध्ये असायला हवा.... पण, सगळेच राजकीय चित्र अस्त-व्यस्त झालेले आहे. अकोलो, शेगाव, त्र्यंबकेश्वर... कारणं वेगवेगळी... पण, दंगली भडकल्याच्या बातम्यांनी महाराष्ट्रभर वेगळे वातावरण तापत ठेवायचे... त्यासाठी या दंगलींचा वापर... महाराष्ट्र भलतीकडे निघालेला आहे.
राजीव गांधी यांनी विज्ञाान-तंत्रज्ञाानाची आघाडी घेवून देशासाठी खूप मोठे काम केले... ती सगळी साधनं... आज भयानक सामाजिक वातावरण तयार करत आहेत... राजकीय लोकांना त्याचा उपयोग करता येतोय.... आम माणसाचे तमाम प्रश्न.... त्याच्याशी कोणाला काहीही पडलेले नाही... येत्या काही वर्षांत नद्या-नाले-ओढे जानेवारीपासूनच कोरडे पडतील, असे शास्त्रज्ञा सांगत आहेत. जमिनीतील पाण्याचा साठा आहे ती झाडांची मुळं शोषून घेत आहेत. हा साठा काही वर्षांत सुकून जाणार आहे. आणि एक वैराण वाळवंट झाल्याचा भास पुढील काळात होणार... विकास हवा म्हणून मेट्रो आली... मेट्रो आली म्हणून हजारो झाडे तुटली... झाडे तुटली म्हणून शहरं बोडकी झाली... ऊन वाढण्याचे कारण तेच आहे... त्याचवेळी चांगले समाजस्वास्थ बिघडवण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. कुठे ‘केरळस्टोरी’ सांगते... या देशातील हिंदु असुरक्षित आहेत... या देशात ८० टक्के हिंदू आहेत.. ते पूर्वीही कधी असुरक्षित नव्हते... आणि आताही नाहीत. पण, निवडणुका जवळ आल्या की, विविध युक्त्या करून ‘हिंदूंचे कैवारी’ पालख्या उचलतात... आणि ज्या देशात ८० टक्के हिंदू आहेत, ते असुरक्षित कसे असतील? याचा विचार कोणीच करत नाही. जगातील मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या देशातही अल्पसंख्य असलेले हिंदु असुरक्षित नाहीत... या देशात तर नाहीच नाही... पण, ‘असुरक्षित’ प्रचार निवडणुकीत कामाला येतो... त्यामुळे हिंदुंचे कैवारी त्यांची संख्या वाढत जाते.. निवडणुक होईपर्यंत हे चालेल. नंतर पाच वर्षे पुन्हा हिंदूंचे काय व्हायचे ते होऊ दे.... सामान्य माणसांचे मुख्य प्रश्न बाजूला टाकून जात... धर्म याचा सरास वापर होत आहे. विविध मार्गाने होतोय... मतदारांच्या मनावर परिणाम ठसवण्याचा कार्यक्रम होतोय... हे सगळं जाणीवपूर्वक केले जात आहे. अशा या वातावरणात उन्हाने हैराण झालेली माणसं वैतागलेली आहेत... कष्टकऱ्यांना तर कोणी विचारणारेच नाही... महाराष्ट्रातील हे वातावरण सध्या ‘अहिंसक अराजका’च्या अवस्थेत आहे... एकेकाळी खेड्या-पाड्यांत सर्व जाती-धर्माची माणसं गुण्या-गोविंदानं राहात होती. त्या सर्व वातावरणाला आता राजकीय रूप देवून सामान्य माणसांची डोकी भडकवली जात आहेत. शिवाय महाराष्ट्रातील सामान्य माणसाला धाक वाटेल, विश्वास वाटेल, असा नेताही शिल्लक नाही... गल्लीबोळात कार्यसम्राटांचा उदय झालेला आहे. त्यांच्या वाढदिवसाचे मोठ-मोठे पोस्टर लागलेले आहेत... त्यांच्या गळ्यात सोन्याच्या साखळ्या आहेत... हातात सोन्याची कडी आहेत... पोस्टरवर शुभेच्छुकांची भली मोठी नावे... आणि फोटो... वृत्तपत्रात सडकछाप नेत्यांच्या वाढदिवसाच्या पुरवण्या... पूर्वी प्रामाणिक राजकीय कार्यकर्ता तयार व्हायला १५-१५ वर्षे लागत होती... त्याचे आदरपूर्वक नाव व्हायला अनेक वर्षे त्याला काम करायला लागत होते.. आता १५ दिवसांत ‘कार्यसम्राट’ तयार झालेले आहेत. पूर्वी कार्यकर्त्यांसाठी नव्हे तर आमदारांसाठी कोणत्याही एस. टी. मध्ये १ आणि २ नंबरची सीट आमदारांसाठी राखीव होती. आणि गावातून बाहेर पडणाऱ्या एस. टी. मध्ये त्या-त्या विभागातील आमदार बसून जायचे... त्या गाडीतील प्रवाशांना आपला आमदार आपल्यासोबत प्रवासात आहे, याचा अभिमान वाटायचा... आता आमदारांसाठी ठेवलेल्या त्या जागा तशाच आहेत... पण, एकही आमदार त्या जागेवर बसून प्रवास करतोय, असे दिसत नाही. प्रत्येकाकडे लक्षावधी रुपयांच्या मोठ-मोठ्या गाड्या... आमदार निवासात राहण्याची व्यवस्था... पण अनेक आमदारांचे राहणे पंचतारांकित... काल मंत्रालयासमोरून आलो... तर पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण दरवाजांच्या बाहेर तंबू टाकलेले होते. त्या तंबूत ए. के. ४७ घेवून सुरक्षा यंत्रणा उभी होती. प्रत्येक मंत्र्याच्या गाडीच्या मागे- पुढे पोलीस गाडी... प्रवेशासाठी प्रचंड बंदोबस्त... पोलीस यंत्रणेवर किती प्रचंड ताण आहे आिण त्यांचे किती हाल आहेत... त्यांना आठवड्याची सुटी तरी आहे का? कोणी कधी विचार करतंय का?
जुना काळ आठवला... त्यावेळच्या सचिवालयाचे दरवाजे... तमाम उघडे असायचे.. सचिवालयाचे सोडून द्या... जुन्या विधानसभेचा एकही दरवाजा कधीही बंद नव्हता. रिगल सिनेमाकडून प्रवेशद्वार... आणि लायन गेटच्या बाजूचे बाहेर पडण्याचे दार.... सताड उघडे असायचे.. कोणतीही सुरक्षा नसायची... गरजही नसायची... कसली भीती नव्हती... काल्पनिक भय तर अजिबात नव्हते... आत बसणारे आमदार आणि मंत्री यांच्याबद्दल आदर होता. यशवंतराव चव्हाण मुग्यमंत्री होते... वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते.. वसंतदादा मुख्यमंत्री होते... त्यांच्या मागे-पुढे चार-चार पोलीस गाड्या कधीच नव्हत्या.
१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्य झाले. त्यानंतर १९८० पर्यंतच्या २० वर्षांत नेमके काय घडले हो? तब्बल ३१ मोठी धरणं... त्याच २० वर्षांत झाली... मोठी म्हणजे किती मोठी? देशपातळीवरील माेठी.... उजनी घ्या... जायकवाडी घ्या... कोयना घ्या... (कोयना धरण १९६० पूर्वी झाले.) नावांची यादी दिली तर ती यादी खूप मोठी आहे.. पण, ही मोठी ३१ धरणं आहेत. ७५० मध्यम धरणं झाली... ३००० लघू पाटबंधारे झाले. कोराडी, चंद्रपूर, पारस, खापरखेडा ️बल्लारपूर, चंद्रपूर, परळी बैजनाथ... अशी आता होणारी १५ ते १८ हजार मॅ.वॅट रोजची वीजनिर्मिती... त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा योजना... ३५ हजार खेड्यांना वीजपुरवठा... याच २० वर्षांतील नवी मुंबईची निर्मिती याच २० वर्षांत झाली.... नवीन औरंगाबाद याच २० वर्षांत... नवीन पाच विद्यापीठे याच २० वर्षांत... चार कृषी विद्यापीठे याच काळात... खाजगी संस्थांना उच्च शिक्षणाची परवानगी याच २० वर्षांत... रोजगार हमी कायदा याच काळातला... कापुस एकाधिकार योजना याच काळातील... सामान्य माणसांचा विचारही याच काळात झाला.... ‘रोजगार हमीवर पुरुष आणि स्त्रीला समान मजूरी’ ही विरोधी पक्षाची मागणी मंजूर झाली तीही याच काळात. १०-२-३ शिक्षण अभ्यासक्रमाचा पॅटर्न या काळातील... चित्रनगरिची निर्मिती याच काळातील... किती मोठी यादी देवू.... याशिवाय सामान्य माणसांच्या प्रश्नाची बोच आणि टोच सरकारला कशी होती.... रोजगार हमीवर एकावेळी एकादिवशी पाच ते सहा लाख मजूर काम करायचे.. तो १९७२ चा भयंकर दुष्काळ... गुरांच्या त्या छावण्या... पशुधन वाचवण्याची धडपड.... अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे दुपारपासून संध्याकाळपर्यंत वीजकपात... रोजगार हमीवरून आठ तास काम करून तीन ते चार लाख महिला घरी आल्या की, गावातील पिठाची चक्की बंद... कारण.. वीज बंद... मग जातं टाकून ज्वारी दळायचा.... भाकऱ्या भाजायच्या लेकरांना खाऊ घालायचे... ८ तास काम करून आल्यावर काही घरांत दारू पिणाऱ्या नवऱ्यांचा मार खायचा... वीज बंद असल्यामुळे कामावरून आलेल्या महिलेला दळणाचे कष्ट होतात, हा विषय मंत्रिमंडळात चर्चेला जातो. राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक म्हणतात.... ‘अडचण एकदम बरोबर आहे.... उपाय सांगा...’ यशवंतराव मोहिते सांगतात... ‘महिलांना अर्धी मजुरी आणि अर्ध्या मजुरीच्या रकमेएवढ्या ज्वारीच्या दळलेल्या पिठाच्या पिशव्या....’ कोणी कल्पना तरी करू शकते का? एक किलोच्या दोन-दोन लाख ज्वारीच्या पिठाच्या पिशव्या रोजगार हमीच्या ठिकाणी महिलांना वाटल्या गेल्या आहेत...
सामान्य माणसांच्या प्रश्नांची इतकी तीव्रतेने जाण असणारी सरकारे त्यावेळी होती. लोकांचा त्यामुळे विश्वास होता... त्यामुळेच मंत्रालयावर सुरक्षेची गरज नव्हती. आज सुरक्षेच्या गराड्यात मंत्री... आणि रांग लावून सामान्य माणूस मंत्रालयात जाण्यासाठी उभा... त्याचा नंबर कधी लागणार... ज्याला भेटायचे आहे तो कधी भेटणार... भेटला तर काम होणार का? कितीवेळा खेपा घालायच्या... सगळाच विषय अवघड झालेला आहे. एकूणच सगळं वातावर विचित्र, अस्वस्थ करणारे आणि सरकार लाेकांच्यापासून खूप दूर गेलेय... हे सरकार असे नव्हे.... १९८० नंतर असेच चित्र आहे... कारण, कोणतेच सरकार स्थीर नाही. बॅ. अंतुले... दीड वर्ष... भोसले एक वर्ष.... वसंतदादा दीड वर्ष.... निलंगेकर एक वर्ष... मग शंकरराव दोन वर्षे... मग शरदराव दोन वर्षे..... सुधाकरराव नोईक दोन वर्षे... मग युती चार वर्षे... मग आघाडी चार-चार वर्षे... एका पक्षाचे मजबुतीचे सरकार असल्याशिवाय विकासाच्या कार्यक्रमांचा झपाटा येऊ शकत नाही. माणसं सांभाळण्यातच सरकारची सगळी ताकद जातेय... १९८० नंतर नेमके काय झाले?.... राजकारणाचा विचका झाला...
आजचे चित्र काय आहे? विज्ञानाच्या प्रगतीने घराघरात टी.व्ही. संच आहेत. काय बातम्या आहेत... काय आरोप-प्रत्यारोप आहेत. टी.आर. पी वाढवण्यासाठी वृत्तवाहिन्यांचे काय-काय उद्योग आहेत... लोकांच्या प्रश्नाशी कवडीचा संबंध नसलेली दिवसभराची चर्चा..... तेच -तेच चेहरे .... तेच-तेच आरोप... दिवस-दिवस हे नेते आरोप-प्रत्यारोप करत या वाहिनीवरून त्या वाहिनीवर.... सगळं कसं किळसवाणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे रूपांतर गटारात झालेले आहे. इतकी या राजकारणाची किळस यावी, असा भलतीकडं महाराष्ट्र चाललेला आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसला यश मिळाले म्हणून तीन दिवस खूप उत्साह होता. कर्नाटकच्या जनतेने ज्या हिंमतीने काँग्रेसला विजयी करून दिलं... त्या जनतेच्या भावनांची दखल घेवून चार तासांत मुख्यमंत्री ठरायला हवा होता. मुख्यमंत्रीपदाचे किती दावेदार? आमदारांच्या बैठकीत नेता निवडण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींना देणारा ठराव करता आणि पक्षश्रेष्ठींना फाट्यावर मारून तीन-तीन, चार-चार माणसं मुख्यमंत्रीपदाचा दावा करतात. श्रेष्ठींचं ऐकतो कोण? राजकारण किती किळसवाणं होतं.... सत्तेची हाव प्रत्येकाला... एक पर्याय आला... एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री... आचरटपणाला सीमाच राहीली नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे १३६ आमदार आहेत... मग १३५ जणांना उपमुख्यमंत्री करून टाका... प्रत्येकाला नेता व्हायचे आहे... मग लगेच ितकीट हवं... मग लगेच आमदारपद हवं.... मग लगेच मंत्रीपद हवं... आणि मुख्यमंत्रीपद हवं... ज्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचे २२२ (सभागृहाची संख्या २६४) त्याकाळात २२२ आमदारांमधून एक मुख्यमंत्री आणि नऊ कॅबिनेटमंत्री.... कोणी कसलाही आवाज केला नाही.... नेत्यांचा आदर... धाक... आणि मुख्य म्हणजे मला मंत्रीपद दिले नाही तर पळापळ करायला जागाच नाही... आता धमक्या देवू शकता.... फुटू शकतात... राजकीय पक्ष न फुटण्यासाठी कायदा काँग्रेसनेच केला... पण, पक्ष फुटण्यासाठी किती सदस्य लागतात, बघून आता तेवढी संख्या गाठायची स्पर्धा आहे. सत्तेची हाव एखाद्या लावेसारखी... किळस आणणारी....
आाणि या सगळ्यामध्ये सामान्य माणूस आहे कुठं.... त्याचे प्रश्न कोणते आहेत.... ते प्रश्न सोडवणारा कोण आहे? प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत म्हणून रान उठवणारी वृत्तपत्रे कुठे आहेत? तसे संपादक कुठे आहेत... तसे विरोधी पक्षनेते कुठे आहेत....? लोकांच्या प्रश्नावर लाखा-लाखांचे मोर्चे कुठे आहेत?.... सगळं काही संपलेले आहे... कोणाला काहीही पडलेलं नाही. सत्तेची हाव.... त्यासाठी राजकारण...
महाराष्ट्र असा कधीच नव्हता हो... आणि देशही असा कधीच नव्हता... महाराष्ट्र भलतीकडे चालला आहे.
सध्या एवढेच...📞9892033458
Comments
Post a Comment