कृतज्ञता आणि प्रेम... दोन गावांतील मनाला भिडणारे दोन कार्यक्रम

कृतज्ञता आणि प्रेम... 

दोन गावांतील मनाला भिडणारे दोन कार्यक्रम

- मधुकर भावे 
 महाराष्ट्रातील आजच्या अस्वस्थ वातावरणात २३ एप्रिल आणि २४ एप्रिल या दोन दिवशी दोन खेड्यांत झालेले कार्यक्रम मनाला भिडून गेले. २३ एप्रिलचा कार्यक्रम पाटण तालुक्यातील मरळी गावचा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ४० व्या पुण्यतिथीचा. अनुभव असा आहे की, महाराष्ट्रातील विविध विभागातील मोठ्या नेत्यांचे जयंती किंवा पुण्यतिथी कार्यक्रम जोरात साजरे होतात... पण प्रामुख्याने सभा, भाषणं... आदरांजली... पुतळ्याला पुष्पहार किंवा समाधीला पुष्पचक्र... अशा मर्यादित स्वरूपातच हे कार्यक्रम साजरे होत असतात. मरळी येथील बाळासाहेब देसाई यांच्या ४० व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात सहभागी होताना एक विलक्षण अनुभूती आली. पुण्यतिथीचा दिवस २३ एप्रिल. पण गेली १५ वर्षे २० एप्रिलपासून पुण्यतिथीचा ‘कृतज्ञाता कार्यक्रम’ अखंडपणे सुरू आहे. कोणाचेही भाषण नाही... प्रत्येक वर्षी २० एप्रिलला सुरू होणारा पारायण सोहळा... तीन दिवस चालतो. मग दिंडी यात्रा... त्या दिंडीत ज्ञाानेश्वर महाराजांची प्रतिमा...  ‘ग्यानबा-तुकाराम’ चा गजर... टाळ, मृदुंग... ढोलकी, ताशे... तुताऱ्या... भागवत धर्माची फडकणारी पताका... पायात काहीही न घालताना कडक उन्हात चालणाऱ्या हजारो भगिनी आणि बाळासाहेब
 देसाईंबद्दल आज ४० वर्षांनंतरही मनात  शिगोशिग भरलेल्या कतृतज्ञातेने चालणारे पंचक्राेशीतील हजारो नागरिक... पांढरा शुभ्र वेष... डोक्यावर गांधी टोपी... पण कोणाच्याही पायात पादत्राने नाहीत... उन्हाचा त्रास होवू नये म्हणून रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था आणि सर्वात मनाला भावणारी गोष्ट म्हणजे... या दिंडीमध्ये सर्वांसोबत चालणारे बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई... त्यांच्याही पायात काहीही नाही... दिंडी आटोपल्यानंतर बाळासाहेबांच्या पुतळ्याजवळ ज्ञाानेश्वर माऊलींची आरती... मग पुतळ्यावर  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी... त्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात भाषण नव्हे.... गेली १५ वर्षे याच पद्धतीच्या कार्यक्रमात कीर्तन करणाऱ्या बुवांच्या मागे २५ टाळकरी... मधुर आवाजातील कीर्तन आणि त्याला टाळकऱ्यांची साथ. विठुनामाचा गजर... तुकोबाचा गजर... महाराष्ट्रातील अनेक जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमाला जायची मला संधी मिळाली... पण, पुण्यतिथीचा असा हरिनामाचा गजर करणारा आणि ज्ञाानोबा-तुकोबाचा जयघोष करणारा हा एकमेव कार्यक्रम मनाला फार भावला. कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आणि सर्वांना महाप्रसाद जेवण... साधी पंगत.. साधे जेवण.. पण, सर्वांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञातेचे भाव असे की, पंचपक्वान्नासारखे... अशी समरसता पहायला मिळणे फार अवघड... इथून पुढच्या दिवसांत अधिक अवघड वाटते. ग्रामीण भागात अजून असा हरिनाम सप्ताह किंवा दिं किंवा रिंगण... कीर्तन आणि हंडी आणि मग प्रसादाचे जेवण हे कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात. पण, आपल्या आजोबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा असा कार्यक्रम ठेवायचा... ही शंभूराजांची कल्पना मनाला फार भिडली. शिवाय एखाद्या छोट्या कार्यकर्त्यासारखा सकाळपासून दुपारपर्यंत त्यांचा भर उन्हातला वावर... चपलेशिवाय... सगळेच काही विलक्षण वाटले... त्या दिंडीतील अनेक लोक या कार्यक्रमात वर्षानुवर्षे चालत आहेत... चालताना बाळासाहेबांच्या आठवणी सांगतात... कुणी सांगते, ‘आमच्या तालीमसंघाला इमारतीसाठी तीन एकरची जागा साहेबांनी दिली...’ कुणी सांगते, ‘माझ्या मुलाला नोकरी लावली.’ बाळासाहेब जाऊन आज ४० वर्षे झाली... पण पश्चिम महाराष्ट्रात यशवंतराव, वसंतदादा, बाळासाहेब, राजारामबापू  यांच्याबद्दल जीवापाड प्रेम असलेली अशी असंख्य माणसे अजून आहेत. पण, या सर्वांचा मेळ करून पुण्यतिथीला मरळीतील कार्यक्रम फारच आगळावेगळा वाटला. शंभूराज नंतर सांगत होते की, ‘केवळ याच वर्षी नव्हे तर गेली १५ वर्षे मी याच पद्धतीने आणि त्याच श्रद्धेने हा कार्यक्रम करतो आणि साहेबांच्या प्रेमामुळे तसर्वपक्षीय लोक यात सहभागी होतात. त्याचा फार मोठा आनंद आहे... माझं असे आवाहन आहे की, पुढच्या पिढ्यांनीसुद्धा हे व्रत चालवले पाहिजे....’ त्यांचा मुलगा यशराज हे लक्षपूर्वक ऐकत होता. पुढच्या पिढीमधील तो आणि त्याच्या तरुण मित्रांनी हे कार्यक्रम नेटाने चालवले पाहिजेत... कोणाला मान्य होओ... न होओ... ग्यानबा... तुकारामाचा गजर सुरू झाला की, माणसं किती तल्लीन होवून जातात ही श्रद्धा कोणत्याही तागडीत तोलता येणार नाही... मनात विचार आला की.... ज्ञाानेश्वर महाराज १२०० व्या शतकातील... तुकाराम महाराज १६०० व्या शतकातील... दोन तत्त्ववेत्यांमध्ये ४०० वर्षांचा फरक आहे... हा फरक असताना ज्ञाानोबाला-तुकोबा जोडला जातो... आणि अखंड हरिनामाचा गजर आजपर्यंत चालू राहतो... पुढेही चालू राहणार... ही संत परंपरा आणि त्यामागचे तत्त्वज्ञाान जगात अशी जोडी कुठेही मिळणार नाही... ४०० वर्षांच्या फरकानंतर दोन तत्त्ववेत्ते एकत्र गुंफून त्यांच्या नामाचा गजर होतो... ज्ञाानोबा आणि तुकोबाला आपण सगळ्यांनी संत केले... पण, जगातील भारीतल्या भारी तत्त्ववेत्यापेक्षाही मग... ते सॅाक्रेटीस असोत... किंवा  प्लेटो असोत... आमचे ज्ञाानोबा-तुकोबा एकेका ओळीत तत्त्वज्ञाानच सांगत आहेत. ग्रामीण भागात आज हा जागर टिकून राहिला आहे. पुढच्या पिढ्यांवर ही जबाबदारी आहे... हे शंभूराज यांचे वाक्य फार महत्त्वाचे आहे. बाळासाहेब देसाई यांना मी फार जवळून पाहिले आहे. त्यांची निर्णयशक्ती आणि कामाची तडफ सगळेच  विलक्षण होते... पण, शंभूराज यांनी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्यावर असा ज्ञाानोबा-तुकोबाचा गजर पुण्यतिथीच्या दिवशी ऐकायला मिळेल आणि हजारो लोकांचे रिंगण पहायला मिळेल, अशी कल्पनाच केली नव्हती... मनात येवून गेले की... जयंती-पुण्यतिथीच्या भाषणबाजीपेक्षा हे असे कार्यक्रम लोकांना निश्चितच भावतील... आणखी एक विचार मनात येवून गेला... आपल्या आजोबाचे पांग फेडणे म्हणजे काय असतं.... त्याचीही अनुभूती शंभूराज देसाई यांनी दिली. 
... आणि औंढी गावातील सचिनवरील प्रेमाचे दर्शन....
 २३ एप्रिलचा मरळीचा हा कार्यक्रम जसा भावला तसा २४ तारखेला आणखी एक विलक्षण कार्यक्रम कल्पनेच्या पलीकडचा वाटला... मुंबई-पुण्यातील लोकांनी सचिन तेंडूलकर या विक्रमादित्यावर अफाट प्रेम केले... पण, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील औंढी गाव किती घरांचे असेल.... या गावाने सचिन तेंडूलकरचा ५० वा वाढदिवस गुढ्या उभारून साजरा केला... सचिनचा पुतळा पालखीत बसवून त्याची गावभर मिरवणूक निघाली... गावभर दिंडी फिरली.. सचिनच्या विक्रमाची छायाचित्रे गावभर झळकली... त्याच्या विक्रमाच्या नोंदी दाखवल्या गेल्या... तरुण मुले बेभान होती... या तरुण मुलांच्या या उत्साहातून एखादा सचिन उद्या तयार होईल... या गावातील सचिनचा वाढदिवस आणि तो उत्साह याची दखल मुंबई- पुण्याच्या वृत्तपत्रांनी फारशी घेतली नाही.... जवळपास घेतलीच नाही... त्यांना गरजही नाही... पण, महाराष्ट्राच्या एका खेडेगावात सचिन घराघरात इतका प्रिय आहे की, गावकऱ्यांनी गुढ्या उभाराव्यात.... हे सगळेच सचिनसाठी आणि महाराष्ट्रासाठी विलक्षण आहे... महाराष्ट्राकरिता सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर हे सगळे ‘कर’ फार महत्त्वाचे आहेत. पण, सचिनचा गुणविशेष असा की, सबंध महाराष्ट्राला आणि देशाला सचिन आपल्या घरातला वाटतो. कोणत्याही सामन्यात तो शतक करो... न करो... शुन्यावर बाद झाला तरी सचिन सगळ्यांना भावलेला आहे... केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही तो खूप मोठा आहे. आज हा खेळाडू ‘भारतरत्न’ किताबाचा मानकरी असताना आयपीएल सामना पाहताना सामान्य सहकाऱ्यांच्या बरोबर वावरत असतो... ए.सी. रूममध्ये वेगळा बसत नाही... हे त्याचे सहजपण सर्वांना भावते...  पण मुंबई-पुण्यातील लोकांपेक्षा कौतुक जास्त आहे.... औेंढी या खेड्यातील गावकऱ्यांनी सचिनचा ५० वा वाढदिवस असा धूमधडाक्यात साजरा करणे... 
 आजच्या क्रिकेटबद्दल लिहीण्याची गरज नाही... कसोटी सामने आता निरर्थक ठरत चाललेत... आणि आय.पी.एल.सारखे सामने लोकप्रिय झालेत... खेळाडू विकले गेले... खरेदी- विक्री झाली.. आणि गंमत अशी की, मुंबईचा संघ समजला जाणारा जो सामना खेळतो आहे त्यातील  शर्मा (रोहित), वर्मा (तिलक), चावला(पियुष) यांच्या संघाला हरवतेय कोण?... गायकवाड... (ऋतुराज), राहणे (अजिंक्य), देशपांडे (तुषार) आणि यांचा संघ आहे चेन्नई!  गंमत आहे की नाही ते बघा... धोनीला मुंबईतल्या संघातील गोलंदाजाने बाद केल्यावर त्यांचा कर्णधार रोहित शर्मा टाळी वाजवतोय... असे हे आय. पी. एल. काळानुसार सगळं बदलत चालले आहे... पूर्वीचे ते स्वच्छ राजकारण राहीले नाही.... ते समाजकारण राहीले नाही... मग सरळ बॅटने शास्त्रशुद्ध खेळले जाणारे क्रिकेट आणि पाच दिवसांचे ते कसोटी सामने कसे टिकणार? आणि कसे लोकप्रिय राहणार? पण या सगळ्यामध्ये टिकून राहिले नाव ते फक्त सचिनचे... ज्यांनी ब्रेबॉन स्टेडियम बघितले नाही... वानखेडेवर सामना पहायला आलेले नाहीत... सचिनशी कोणाची भेटही झालेली नाही... असं १०० घरांचे गाव औंढी गाव सचिन तेंडूलकर या महान खेळाडूचा ५० वा वाढदिवस गुढ्या उभारून साजरा करतोय... मला तर असे वाटले की, सचिनला मिळालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्कारापेक्षाही या गावात उभारली गेलेली गुढी हा सचिनसाठी सगळ्यात मोठा सन्मान आहे... 
खंत एवढीच वाटते... सचिन एवढीच फलंदाजीची गुणवत्ता असलेल्या विनोद कांबळीने सचिनसोबत पहिली भागिदारी ६६४ धावांची केली. त्यात विनोदचा वाटा ३४९ धावांचा होता. विनोद तुझं गणित कुठेतरी चुकलं... नाहीतर सचिनसारखीच तुझी बॅट तळपली असती तर तमाम महाराष्ट्राला केवढा आनंद झाला असता.📞9892033458

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*