उद्याच्या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचाच सूर्य पुन्हा उगवेल...
उद्याच्या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचाच सूर्य पुन्हा उगवेल....
-मधुकर भावे
एक महिना होऊन गेला. अनेक विषय होते... पण मन जागेवर नव्हते. २२ मार्च रोजी अचानकपणे डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांचे िनधन झाल्याची बातमी विजेेसारखी अंगावर कोसळली. २२ तारखेला सकाळी डॉक्टर साहेबांनी जोधपूरच्या त्यांच्या रुग्णालयात २० रुग्ण तपासले होते. दुपारी घरी जेवायला जावून ४ वाजता परत आले. पुन्हा काही रुग्ण तपासले. ५.३० ला घरी गेले. घरी पोहोचताच न पोहोचतात तोच छातीत जबरदस्त कळ आली. १० सेकंदात सगळा खेळ संपला. नियती इतकी कठोर असू शकते.... लाखो रुग्णांवर उपचार केलेल्या या धन्वंतरीवर कसलाही उपचार करण्याची संधीच मिळू शकली नाही, याची सगळ्यात मोठी खंत वाटते. अॅटॅक आला... त्यानंतर योग्य उपचार झाले असते... आणि त्यात अपयश आले असते तर एकवेळ समजू शकलो असतो. पण लाखो रुग्णांवर उपचार करणारे गोवर्धनसाहेब, उपचार न होता जाणे, यामुळे डोके सुन्न होते. रात्री उिशरा फोन आला. जोधपूरपर्यंत कसा पोहोचलो तेही समजले नाही.... थेट वैकुंठभूमीत गेलो तेव्हा अंत्यदर्शन झाले... अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बघता-बघता चिता भडकली... आणि एक देवमाणूस देवाकडे गेला... कदाचित देवमंडळींनाच पाठीत, गुडघ्यात, कमरेत दुखणे वाढले असल्यामुळे त्यांनी थेट गोवर्धनसाहेबांना बोलावून घेतले तर नाही ना.... अनेक विचार मनात येवून राहिले... लिहिण्याची काही इच्छा होईना... तेवढ्यात आणखी एका कामात गुंतवून घेतले... २३ एप्रिल २०२३ बाळासाहेब देसाई यांची ४० वी पुण्यतिथी आहे. बाळासाहेब फार मोठे नेते होते. महिन्ााभरात त्यांच्यावर एक छोटेखानी पुस्तक तयार केले. सगळे राजकीय विषय बाजूला ठेवले. कारण िटकेल ते पुस्तक....
आज मनापासून सांगतो की, अजूनही तडाकून काही लिहावे, अशी इच्छा होत नव्हती. शब्द वांझोटे वाटतात.... शिवाय लिहिण्याचा परिणाम काय? सध्याचे वातावरण.... सध्याचे आरोप-प्रत्यारोप, सध्याचे सरकार, तिकडे अादाणी, तिकडे सत्यपाल मलिक, महाराष्ट्रातील गोंधळ.... सरकार एकीकडे हस्यास्पद वागत आहे... दुसरीकडे पत्रकार त्याहून हस्यास्पद ठरत आहेत. पत्रकारांनीच बातम्या सोडून दिल्या... ठरवून सोडल्या... सत्यपाल मलिक यांच्या आरोपांनी झालेले वातावरण त्याच्यावरचा उतारा म्हणून ‘अजित पवार हे भाजपात जाणार....’ या बातम्या आठ दिवस पुरवल्या गेल्या. वाहन्या तर अशा बातम्यांसाठी टपूनच आहेत. एक एन. डी. टी.व्ही.... काही सत्त्व राखून होता... त्यालाही अदाणींच्या पैशांनी गुंडाळून टाकले गेल्याने सगळ्याच वाहिन्या आता कोणाच्या नळावर पाणी भरतात.... हे जगाला माहिती झाले आहे... वृत्तपत्रेही त्याच पद्धतीने आपआपले हांडे घेवून त्याच नळाच्या रांगेत उभी आहेत.... एकाही वृत्तपत्राला असे वाटले नाही की, ‘बातमी छापण्यापूर्वी अजितदादांना भेटावे.... त्यांना बोलतं करावं....’ कुणीतरी सांगितले, ते ‘नॉट रिचेबल’ आहेत... आजची पत्रकारिता ‘मोबाईलवरच’ चालते... ‘नॉट रिचेबल’ असतील तर घरी असणारच ना.... घरी नसतील तर कुठेतरी असतीलच ना... तिथे गाठता येत नसेल आणि बोलतं करता येत नसेल तर पत्रकारिता कशाकरिता...? एखाद्या पत्रकार त्यांच्या घरासमोर ठाण मांडून बसला असता तर त्याला सत्य बातमी कळली असती. एकाही संपादकाला बातमीची शहानिशा करून बातमी छापावी, असे वाटले नाही. आठ दिवस धुमाकूळ घातला. दादांची कमाल अशी की, त्यांनी चार दिवस गंमत पाहिली. आणि तडाकून सांगून टाकले की, ‘जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार...’ ‘जबाबदार पत्रकारिता’ करत अहोत, असे भासवणाऱ्या वृत्तपत्रांनी ‘दादा भाजपामध्ये जाणार’ अशा बातम्या सोडल्या होत्या. त्याच वृत्तपत्रांनी, त्यांच्या त्याच जागेवर ‘चर्चेला पूर्णविराम... दादा राष्ट्रवादीतच राहणार...’ अशा बातम्या झळकवल्या. आपण काल काय लिहित होतो.... आज काय लिहितोय.... पत्रकारिता म्हणजे काय गंमत समजतात का? की, करमणुकीचे साधन आहे....? वृत्तपत्रांचे काही गांभीर्य असले पाहिजे.... लिहिलेल्या शब्दाला खोडता येणार नाही, इतका तो मजबूत असला पाहिजे. यापूर्वीचे मराठी परंपरेतील संपादक लिहिलेला शब्द न खोडणारे... आणि दिलेला शब्द न मोडणारे होते. आता जो धुमाकूळ घातला गेला आहे... सगळ्यात गंमत वाटते ती वृत्तपत्रांच्या संपादकांची.... आपल्या संपादकीय विभागातील मंडळी काय बातम्या आणतात... आपण काय छापतोय.... आपल्या विश्वासार्हतेवर लोक कसे हसताहेत.... एकाही संपादकाला याबद्दल काळजी घ्यावी, असे वाटू नये.... राजकीय नेते रोज रंग बदलले म्हणून वृत्तपत्रांचे रंगही रोज बदलू लागले तर या वृत्तपत्रांवर विश्वास कोण ठेवणार... आणि का ठेवावा? एकाही वृत्तपत्राला याची खंत वाटत नाही. आपण दिलेल्या बातम्या तोंडावर आपटत आहेत.... आपल्या वृत्तपत्राची नाचक्की होत आहे... दादांना सांगावं लागतंय.... आता बस कर ना रे.... कोणीतरी हे सगळं पेरत आहे... आणि वृत्तपत्र त्याची शिकार होत आहेत. कोणाही वृत्तपत्राने अशा बेजबाबदार पत्रकारितेचे अॅाडीट करण्याची भूमिका घेवू नये... हे ही समजण्याच्या पलिकडचे आहे. माझ्या वृत्तपत्रात येणारी बातमी दुसऱ्या दिवशी मलाच खोडावी लागेल, हा पोरखेळ महाराष्ट्रात असा कधी नव्हता.... आता हे समजू शकतो की, आजची वृत्तपत्र ‘संपादक काय म्हणतो’ याच्याकरिता कोणीही वाचक वाचत नाहीत. अपवाद एक-दोन वृत्तपत्र आहेत... त्यात गिरीश कुबेर यांचा उल्लेख करावा लागेल... पण, एकीकाळी अग्रलेखाकरिता वाचली जाणारी वृत्तपत्रे होती. आज अग्रलेखही वाचवत नाही... आणि बातम्याही वाचवत नाहीत.... एवढी एकतर्फी झाली आहेत. एवढेच नव्हे तर आपण आज काय छापतोय आणि उद्या काय छापतोय... कोणाला काही पडलेले नाही. या महाराष्ट्राची ती महान गंभीर पत्रकारिता आज राहिली नाही. अर्थात ते चारित्र्य राहणार नाही, हे समजू शकतो. लोकमान्य टिळक लिहायचे की, ‘परदेशी कपड्याची होळी करा...’ बातमी वाचून हजारो लोक रस्त्यावर उतरून परदेशी कपड्यांची होळी करत होते. संपादकांच्या शब्दाला चारित्र्य होते.... कारण आज समजा मी संपादक आहे... मी ‘होळी करा’ असे लिहिले... तर कोण करणार आहे? उलट बाहेर ‘होळी’ झाली तर मला लिहावे लागत आहे. पूर्वी राजकीय नेते सामाजिक प्रश्न शोधून काढायचे... आणि विधानमंडळात त्यावर झोड उठवायचे. पूर्वीचे पत्रकार सामाजिक जाणीवेने अनेक प्रकरणे शोधून काढायचे.... आज मेहनतीची गरज नाही. जसे सरकार तसे पत्रकार.... तिकडे सरकारातही आजचे बोललेले उद्या टिकत नाही... आणि उद्याचे परवा नाही... ‘राजकीय निष्ठा’ हा विषयच नाही. मला काय मिळते.... एवढाच विषय... मला काही मिळाले तर पक्षाशी निष्ठा... नाही तर ‘नि स टा...’ असे निसटलेले राजकारणी आणि निसटलेले पत्रकार यांची झाली आहे युती... शिवाय आजच्या वृत्तपत्रांना जाहिरातींची कमी नाही... ‘गतिमान’ सरकार असल्यामुळे ‘गतिमान जाहिराती’ रोजच आहेत. पान-पान भरून आहेत... शिवाय सरकारलाही उत्सवी स्वरूप आलेले आहे. रंग-रंगोटी सुरू आहे.... झाड-लोट सुरू आहे... दिवाळीच्या आगोदरच रोषणाई सुरू झाली आहे. शहरातील लखलखाट वाढतो आहे. जगात मुंबईला सुंदर शहर करण्याची इर्षा चांगली आहे. पण, मुंबईत लखलखाट करताना खेड्यांत रखरखाट झाला आहे, याची कुठेतरी जाणीव असली पाहिजे. लोकांचे प्रश्न वाऱ्यावर आहेत. अवकाळी झालेल्या नुकसानाला शेतकरी कसं तोंड देतो आहे, ते त्याचे त्याला माहिती. रब्बीचा हंगाम अवकाळीने मातीत घातला. एप्रिल-मे महिन्यात खरिपाच्या शेतीच्या तयारीच्या कृषीमंत्री पातळीवर विभागवार किती आणि कशा बैठका होतात.... खताची व्यवस्था... पेरणीच्या बी-बियाणांची व्यवस्था... विभागवार आढावा... एक नाही दोन... हे दोन महिने त्या तयारीचे असतात. बाळासाहेब थोरात कृषीमंत्री असताना अशा विभागवार बैठकींसाठी त्यांच्याबरोबर अनेक वेळा उपस्थित होतो. कल्पना करता येणार नाही, इतक्या विषयांची चर्चा होवून निर्णय होताना पाहिले आहेत. आज कृषीमंत्री कोण आहे, हे मुख्यमंत्र्यांना तरी पटकन सांगता येईल का? ... सगळाच आनंदी आनंद आहे... वाढती महागाई, बेरोजगारी,.... हे प्रश्न तर आता बाजूलाच पडले आहेत. वृत्तपत्रांनाही आता त्याचे काही पडलेले नाही. काळ बदलला.... विषय बदलले... तंत्र बदलले.... माणसं बदलली... विचार बदललेत... माणसांना गरजेपुरती किंमत आहे... गरज संपली की, अशी कामाची माणसं फेकून दिली जात आहेत... माणसं मनाने लहान झाली... पैशाची किंमत घटली पण सगळे महत्त्व पैशांला आले.... सगळं काही पैशांनी करता येईल, अशी मिजासही आली. एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे फुशारकीचे वाटू लागले.... असे पक्ष बदलून जे आले... त्यांचे सत्कार होवू लागले... त्यांच्या पुरवण्या निघू लागल्या. आहे त्या विचारावर ठाम उभा राहिन... एकटा रहिलो तरी चालेल... पण विचार सोडणार नाही. अशी नेतेमंडळी आता कुठून मिळणार...? अशा वेळी अजितदादा तुम्ही फार मोठे वाक्य बोलून गेलात.... ‘शेवटचा श्वास असेपर्यंत राष्ट्रवादी पक्षातच राहिन....’ मी आठवत होतो... एवढ्या जिद्दीने आज कोण बोलत का? दोन संदर्भ आठवले... आता त्या महान नेत्यांची सध्या नावं घ्यावी, यात त्या नेत्यांनाच कमीपणा आहे. पण, असे नेते होते म्हणून महाराष्ट्राची बांधणी झाली. आठवण झाली.... यशवंतराव चव्हाण यांची... शेकापक्षाचे थोर नेते उद्धवराव पाटील यांना यशवंतराव चव्हाण यांनी खासदार रामराव आवरगावकर यांच्यामार्फत निरोप पाठवला.... ‘तुमच्यासारख्या अभ्यासपूर्ण नेत्याची काँग्रेसला गरज आहे.... काँग्रेसमध्ये या... सन्मानाने घेतो... आधी मंत्री, नंतर मुख्यमंत्री करतो.” उद्धवराव पाटील यांनी अवरगावकरांना सांिगतले, ‘साहेबांना माझा नमस्कार सांगा.... आभार माना.... पण, मी शेवटी लाल झेंड्यातच गुंडाळला जाईल... ’ अशा निष्ठा आता कुठे मिळणार आहेत.? असे नेतेही आता कुठे आहेत.... बाबूजींचीही आज आठवण आली... बाबूजी म्हणजे जवाहरलाल दर्डा. साल आहे १९९५. सेना-भाजपा युतीचे सरकार येत होते. काँग्रेसमधून अनेक मंडळींची पळापळ सुरू झाली होती. जशी आताही झाली. त्यावेळी थोड्या प्रमाणात होती. बाबूजी इंदिरा काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेवून होते. २ जुलै १९९७ला त्यांचा वाढदिवस होता. त्यांची मुलाखत घेतली... ‘एकटा राहिलो तरी चालेल.... काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेवून लढत राहिन....’ आणि बाबूजी तसेच लढले. त्यांच्या ‘लोकमत’ या वृत्तपत्राला सोबत घेवून लढले. (बाबूजींची ती शेवटची मुलाखत ठरली. २५ नोव्हेंबर १९९७ ला ते सर्वांना सोडून गेले.)
आज महाराष्ट्राचे राजकारण कुठे चालले आहे... आणि कसे भरकटेल माहिती नाही... किती पक्षबदल होतील.... कोण कुठे जाईल.... याची हमी कुणीच देवूशकत नाहीत.... अशा आजच्या या िनसरड्या काळात अजितदादा, तुम्ही ताडकन म्हणालात..... ‘स्टँप पेपरवर लिहून हवं आहे का? शेवटच्या श्वासापर्यंत पक्षातच राहिन....’ दादा तुमचे आता वय ६४ वर्षे आहे. म्हणजे अजून तब्बल ३६ वर्षे तुम्ही हाच विचार घेवून घट्टपणे उभे रहा... महाराष्ट्राच्या ५० वर्षांच्या पुरोगामी राजकारणाकडे पाहताना काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल... जे जे पुरोगामी आहेत... सर्व धर्म समभाव जपणारे आहेत... घटनेचा आदर करणारे आहेत... त्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे.... ज्या विचारांवर उभे आहोत... त्याच विचारांवर खंबीरपणे उभे राहू... सत्ता मिळेल किंवा न मिळेल... सत्तेची पर्वा करू नका.... सत्तेसाठी पळापळ करणाऱ्यांची नोंद इितहासात होत नाही. नोंद त्यांचीच होते.... जे विचारांवर उभे राहतात.. आणि अशा विचारांवर उभे राहणारे कधीही पराभूत होत नाहीत... विजयाचा अर्थ केवळ ‘सत्ता मिळवणे’ नव्हे.... विजयाचा अर्थ मान्य असलेल्या विचारांवर खंबीरपणे उभे राहणे.... तेच महाराष्ट्र उभा करू शकतील.... तोड-फोड करणारे .... पळवा-पळवी करणारे दोन दिवस चर्चेत राहतील... वृत्तपत्रांत झळकतील... इतिहासात अंभीची चर्चा होत नाही. पौरसाच्या पराक्रमाची चर्चा होते. पळपळ करणाऱ्यांची महाराष्ट्राच्या इितहासात दखलही घेतली जाणार नाही.
शेवटी एवढेच...
आज महाराष्ट्र भलत्या वाटेकडे गेला असला तरी महाराष्ट्रातील जनता म्हणजे नेते नव्हेत... ती जनता शहाणी आहे... लोकशाहीचे महत्त्व तिला कळते आहे... शिवाय ती महाराष्ट्रातील जनता आहे... छत्रपतींच्या महाराष्ट्रातील... शाहू महाराज .... महात्मा ज्योतिबा... आणि भारतरत्न बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे. नेते भरकटले म्हणून ही जनता भरकटेल असे समजू नका. थोडीशी कळ सोसा... हा महाराष्ट्र आहे... अन्य राज्य नाही... एवढं लक्षात ठेवा... उद्याच्या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचाच सूर्य पुन्हा उगवेल.... बाकी सगळे मावळून जाईल....
दादा, तुम्ही ‘ती’ अशुभ पहाट विसरलात, हे फार छान झाले. टिकावू आणि टाकावू याचा फरक इथल्या जनतेला कळतो.
सध्या एवढेच...📞9892033458
Comments
Post a Comment