कुस्तीतील विठ्ठलाचे मंदीर त्यांच्या जन्मभूमीत होणार का?स्व. गणपतराव आंदळकर यांचे स्मारक कधी होणार !...
कुस्तीतील विठ्ठलाचे मंदीर त्यांच्या जन्मभूमीत होणार का?
स्व. गणपतराव आंदळकर यांचे स्मारक कधी होणार !...
मनोजकुमार मस्के - मांगरूळ
कुस्ती म्हटलं की गणपतराव आंधळकर (आबा) हे नातं जणू जुळलेलं आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीचा डंका आंदळकर आबांनी सातासमुद्र पार नेऊन पोचवला. आणि भारताबरोबरच देशविदेशातील पैलवानांना चारी मुंड्या चीत करून दिल्लीच्या रस्त्यावर ज्यांचं नाव कोरल गेलं ते गणपतराव आंदळकर (आबा) यांचे मंदिररुपी स्मारक व त्यांच्या कारकिर्दीचा इतिहास सांगणारे एक वास्तुसंग्रहालय त्यांच्याच जन्मभूमीत असावे असे असंख्य कुस्तीप्रेमी म्हणत आहेत.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात गेले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळख कुस्तीपंढरी अशी निर्माण केली होती. देशभरातील मल्ल इथे कुस्तीसाठी येत होते. त्यामुळे शिराळा तालुक्यातील पुनवत गावातील गणपतराव आंदळकरांनीही कोल्हापुरात येणे स्वाभाविक होते. परंतु कुस्तीची सुरुवात ही त्यांचे मूळ गाव पुनवत मधूनच झाली हे विसरून चालणार नाही.
आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देदीप्यमान कामगिरी बजावली. त्यांनी १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या. १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकिओ ऑलिपिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरवले आहे. अशा या महान खेळाडूचे मंदिररुपी स्मारक त्यांच्याच मुळगावी पुनवत येथे असावे असे त्यांचे पुतणे दत्ता आंधळकर यांनी पुण्यनगरीशी बोलताना सांगितले.
खरं पाहता अनेक महापुरुषांची स्मारके उभारण्यात आली. परंतु कुस्ती क्षेत्राशी निगडित असणारे शिराळा तालुक्यातील पुनवत गावचे एक महान हिंदकेसरी व तमाम पैलवानांचे दैवत विठ्ठलरुपी असणारे स्वर्गीय गणपतराव आंधळकर (आबा) यांचं भव्य दिव्य असं स्मारक होणे काळाची गरज आहे.
चौकट- आबांची कर्मभूमी असलेली कोल्हापूरची मोतीबाग तालीम आज आबांच्या नंतर पोरकी झाली आहे. एकापेक्षा एक मातब्बर पैलवान घडवणारी ही तालीम अखेरचा श्वास घेत असल्याचं जाणवत आहे. कृपया शासनाने यात लक्ष घालून ती जतन करणे गरजेचे वाटतं.
आयुष्यभर कुस्ती आणि लाल माती याची सेवा करणारा, कधीही कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करणारा, एक देखणा जबरदस्त शरीरसृष्टी असणारा गणपतराव आबांसारखा पैलवान पुन्हा महाराष्ट्राला मिळणार नाही हे तितकंच खरं आहे. आणि ही मूर्ती कायम ठेवण्यासाठी आबांच्या मुळ गावी स्मारक होणे गरजेचे आहे.
- चंद्रहार पाटील (डब्बल महाराष्ट्र केसरी)
आजपर्यंत अनेकांची स्मारक बांधण्यात आली. परंतु कोणत्याही खेळाडूचे स्मारक आज पर्यंत कोणीही बांधलेलं नाही. ज्या खेळाडूंनी अटकेपार झेंडा रोवला, देशाचं, गावाचं, राज्याचं नाव मोठं केलं अशा महान कुस्तीतल्या पांडुरंगाचे स्मारक होणं खरंच गरजेचं आहे शासनाने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी .
- रामदास देसाई, संस्थापक कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र, राज्य
Comments
Post a Comment