‘लोकमत’चा अमृतमहोत्सव गिनीजबुकाच्या पलिकडे...

नागपूरच्या दैनिक ‘लोकमत’ ने १५ डिसेंबर २०२१ ला  ५० वर्षे पूर्ण केली. त्यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्ष  साजरे करण्यासाठी कोरोना आडवा आला. १५ डिसेंबर १९७१ ला लोकमतचा पहिला अंक प्रकाशित झाला. आज लोकमतने महाराष्ट्र व्यापला आहे. हे यश सोपे नाही. कोणत्याही वृत्तपत्राशी ही तुलना नाही.  १९२३ साली मुंबईत सुरू झालेले दैनिक नवाकाळ वृत्तपत्र असेल... १ जानेवारी १९३२ ला पुण्यातून सुरू झालेले दैनिक सकाळ...  मुंबईतील १९३४ चे दैनिक नवशक्ती असेल...  १९४८ ला सुरू झालेला लोकसत्ता असेल किंवा १९६२ ला सुरू झालेला महाराष्ट्र टाईम्स असेल... ही तशी वयाने ज्येष्ठ वृत्तपत्र.... प्रथम मुंबईत सुरू झाली. लोकमतचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य हे आहे की, हे एकमेव वृत्तपत्र असे आहे की, त्याची साप्ताहिक म्हणून सुरुवात... वऱ्हाडातल्या त्यावेळी आडगाव असलेल्या यवतमाळमधून  झाली. हे साप्ताहिक १९५२ ला सुरू झाले. नंतर त्याचे १९६२ ला द्विसाप्ताहिक झाले आणि १९७१ ला दैनिक झाले. ग्रामीण भागात साप्ताहिक असलेल्या  वृत्तपत्राने संपूर्ण महाराष्ट्र ५० वर्षांत पादाक्रांत करणे ही वृत्तपत्रिय अभिसरणातील फार मोठी क्रांती आहे. (एक उल्लेख मुद्दाम करतो... कोकणातील चिपळूणसारख्या तालुक्याच्या ठिकाणी श्री. निशिकांत उर्फ नाना जोशी यांनी ‘सागर’ हे दैनिक १९६५ साली  सुरू केले आणि आज ५८ वर्ष हे दैनिक उत्तमरितीने सुरू आहे. नानांच्या नंतर त्यांच्या पत्नी शुभदाताई जोशी संपादक म्हणून प्रभावीपणे दैनिक चालवित आहेत. )  हे काम सोपे नाही. ‘मुंबई-पुणे या शहारांतून खेड्याकडे’ जाणारी वृत्तपत्र त्यांचे काम सोपे होते... ‘खेड्यातून शहरामध्ये’ स्वत:ला स्थापन करायचे, लोकांनी त्या वृत्तपत्राला मोठ्या स्पर्धेत स्वीकारायचे... हे मोठे कठीण काम होते व आहे. ‘लोकमत’चे हेच मोठे यश आहे की, या एकेकाळच्या ग्रामीण साप्ताहिकाला नागपूर, जळगाव, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई,  पुणे, नगर, अकोला, पणजी, दिल्ली अशा चौफेर विस्तार झालेल्या  वाचकांनी  क्रमांक १चे  ‘दैनिक’ म्हणून लगेच स्वीकारले आणि म्हणून ५० वर्षांपूर्वीचे एक साप्तािहक महाराष्ट्राचे क्रमांक १ चे अग्रगण्य दैनिक होऊ शकले. यापूर्वी कोल्हापूरातून १९३७ साली सुरू झालेले साप्ताहिक ‘पुढारी’ १९३९ साली कोल्हापुरातूनच दैनिक झाले. मुंबईची ‘पुढारी’ची आवृत्ती २०१३ साली सुरु झाली. पण, महाराष्ट्र व्यापण्याचे काम ‘लोकमत’ने ज्या गतीने केले त्याला तोड नाही. पणजीमध्येही आज लोकमत क्रमांक १ आहे. उद्योगपती चाैगुले यांचा ५० वर्षांपूर्वीचा ‘दैनिक गोमांतक’ क्रमांक २ ला आहे.  हे तुलनेसाठी सांगत नाही... यश मोजायची काहीतरी फूटपट्टी असली पाहिजे. नागपुरातील दैनिकाने पणजीमध्ये हे यश मिळवले, हे लक्षात घ्या... 
या यशाचे सारे श्रेय बाबूजींचे आहे. बाबूजी म्हणजे जवाहरलाल दर्डा.  या व्यक्तिमत्त्वाचे मोठेपण, कतृत्त्व आणि जिद्द महाराष्ट्राला समजलीच नाही. राजकारणातील त्यांचे कतृत्त्व वेगळेच... इंदिरा काँग्रेस पक्षासाठी त्यांनी ज्या तडफेने आिण निष्ठेने महाराष्ट्रात त्यावेळच्या इंदिरा काँग्रेसच्या मागे ठामपणे उभे राहून आपली पक्षनिष्ठा कधी बदलली नाही. तो राजकीय इितहास वेगळा आहे. पण वृत्तपत्रसृष्टीत यवतमाळ येथे त्यावेळच्या साप्ताहिकाच्या घड्या घालण्यापासून अंक पोष्टात टाकेपर्यंतचे, काम करण्यात त्यांची वृत्तपत्रनिष्ठाच स्पष्ट होते. त्यापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा म्हणजे.... १५ अॅागस्ट १९४७ रोजी बाबूजींनी मासिक सुरू केले. त्याचे नाव होते... ‘नवे जग’ वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी निघालेल्या अंकावर महात्मा गांधी यांचे चित्र आणि ‘नव्या जगाची चाहूल....’ हे सगळे विलक्षण आहे. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भोगलेल्या १८ महिन्यांच्या  जबलपूर तुरुंगातील त्या शिक्षेची नंतरच्या राजकीय स्पर्धेत विरोधकांनी टिंगल केली. एखादा स्वातंत्र्य सैनिक िकती संतापाने आपल्या शिक्षेचे खुलासे देत बसला असता! बाबूजींमधील धीरगंभीर आणि शांत वृत्तीचा नेता विधीमंडळाच्या व्यासपीठावर तेवढ्याच शांतपणे सांगतो की... ‘माझे जे विरोधक माझ्यावर आरोप करीत आहेत, ते स्वातंत्र्य चळवळीत कधी नव्हते. त्यांना ‘मी स्वातंत्र्य चळवळीत शिक्षा भोगली आहे’ हे सांगण्याची मला अजिबात गरज वाटत नाही.’
बाबूजींनी आपल्या सगळ्या हयातीत त्यांना कितीही विरोध झाला तरी, कुणाही विरोधात एका अक्षराने प्रतिवाद केला नाही. यासाठी लागणारी जीवनातील समचित्त वृत्ती हेच बाबूजींचे शक्तीसामर्थ्य होते. याच जोरावर यवतमाळचे साप्ताहिक राष्ट्रीय विचारांनी भारावून नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गडात दैनिक म्हणून सुरू करायचे... लोकमत या मूळ साप्ताहिकाचे संपादक बापूजी आणे यांनी बाबूजींना एकाच अटीवर हे दैनिक बहाल केले... ती अट होती, ‘राष्ट्रीय विचाराने साप्ताहिक चालवील...’ बाबूजींनी तो शब्द पाळला.. वणीचे बापूजी विदर्भाचे बापूजी झाले. यवतमाळचे ‘बाबूजी’ पुढे ‘विदर्भाचे बाबूजी’ झाले. 
कसलीही भांडवली तरतूद त्यावेळी नसताना दैनिक सुरू झाले. हे सोपे काम नव्हते. नागपूरच्या सुभाष रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये कार्यालय स्थापन करून हे दैनिक सुरू झाले. बाबूजी दैनिकाचे सर्वेसर्वा होते. पण, दैनिकाचे संपादक म्हणून प्रख्यात पत्रपंडित पा. वा. गाडगीळ यांना त्यांनी नागपूरमध्ये आणले... संपादक केले... स्वत:कडे दुय्यम भूमिका घेतली. ते राजकारणात जेव्हा होते तेव्हा ते राजकारणी होते. मंत्री होते तेव्हा जमिनीवर पाय ठेवून चालत होते. बाकी सर्ववेळी ते पत्रकार म्हणून जगत होते. किंबहुना मंत्रीमंडळात असतानाही... त्यांच्याकडे असलेल्या खात्याच्या विरोधातील एखादी बातमी त्यांनी कधीही अडवलेली नाही. एवढेच नव्हे तर ‘मी सरकारात मंत्री आहे.... लोकमत नाही’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.  त्याप्रमाणेच ते  शेवटपर्यंत वागले... 
बाबूजींच्या हयातीत नागपूरचे दैनिक लोकमत सुरू झाले.... जळगाव (१५ डिसेंबर १९७७), औरंगाबाद (९ जून १९८२) ही दैनिके सुरू झाली. नगर, सोलापूरला आवृत्त्या सुरू झाल्या होत्या. पण, मुंबईत लोकमत सुरू झाल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होणार नाही, असे ते नेहमीच सांगायचे....  बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती झाल्यावर शेवटच्या दिवसांत त्यांच्या डोक्यात एकच विचार येत होता... ‘बम्बई के लोकमत का क्या?’ राजेंद्रबाबूंचा हात हातात घेवून बाबूजींनी ती भावना व्यक्त केली. राजनबाबूंनी आश्वासन दिले.... ‘तुम्ही बरे व्हा... आपण लगेच सुरू करू....’  पण, नियतीला ते मंजूर नव्हते. २५ नोव्हेंबर १९९७ ला बाबूजी गेले... १ मे १९९८ ला मुंबईत लोकमत सुरू झाला. बाबूजींना वाहिलेली ती आदरांजलीच होती. 
मी गेली ६३ वर्षे पत्रकारितेत आहे. अत्रेसाहेबांनी मला मीडास राजासारखा हात लावला आणि माझ्या आयुष्याचे सोने झाले, असे मी मानतो. १२ वर्षे अत्रेसाहेबांच्या सोबत... नंतरची १९७४ ते १९९७ बाबूजींच्या सोबत... पत्रकारितेचे सुवर्णपर्व होते. कामाची झींग काय असते... हे या दोन्ही वृत्तपत्रांनी शिकवले. ‘मराठा’मध्ये प्रखरता, आक्रमकता, निर्भिडता अत्रेसाहेबांकडून आपोआप शिकायला मिळाली. लोकमतमध्ये बाबूजींनी विकासाची एक वेगळी दृष्टी दिली. ‘वृत्तपत्राचा मालक सामान्य वाचक आहे, त्याला समोर ठेवून प्रत्येक शब्द लिहा,’ हे बाबूजींचे सूत्र होते. धोरण आणि निष्ठेवर उभे रहा, कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही, हा त्यांचा मंत्र होता. माझ्या आयुष्यात तर दोन एकदम वेगळ्या व्यक्तीमत्त्वांच्या फार मोठ्या नेत्यांबरोबर मला जवळपास ३७ वर्षे वावरता आले. खूप काही शिकता आले. बाबूजींनी तर लोकमतचा संपादक केले. 
आज ८३ व्या वर्षी अत्रेसाहेब आणि बाबूजी यांचेच ऋण डोक्यावर घेवून मी वावरतोय... आणि ते  मोकळेपणाने सांगण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही. ‘मराठा’त मला स्वातंत्र्य होते... अत्रेसाहेबांच्या बरोबर, ते जिथे जातील तिथे मी होतो. त्यांच्या इंपाला गाडीत त्यांच्यासोबत मीच असायचो... लोकमतमध्ये बाबूजींच्या बरोबर दिवस- दिवस मी राहात होतो. ते सगळे विलक्षण दिवस होते. तशी माणसं आता होणार नाहीत... तसे दिवसही आता दिसणार नाहीत. 
१८ फेब्रुवारी ला नागपूर येथे लोकमतच्या अमृतमहोत्सवाचा ‘राहिलेला समारंभ’ साजरा होत आहे. हेच वर्ष बाबूजींच्या जन्मशताब्दीचेही वर्ष आहे.  त्यांच्या जन्मशताब्दीचा ‘बाबूजी’ हा गौरवग्रंथ संपादन करण्याचे काम विजयबाबू आणि राजनबाबू यांनी माझ्यावर सोपवले... ते किती जमले... सांगता येणार नाही. पण, ‘बे दुणे चार जमले नसले तरी बे निम्मे एक’ इथपर्यंत जमले आहे, याचा मला आनंद आहे. 
बाबूजींच्या जन्मशताब्दीचा  २ जुलै १९२३ ते २ जुलै २०२३ केवढा मोठा काळ... आणखी एक योगायोग असा की, याच वर्षी येणाऱ्या १३ अॅागस्ट २०२३ रोजी आचार्य अत्रे यांची १२५ वी जयंती आहे... बाबूजींची जन्मशताब्दी आणि अत्रेसाहेबांची १२५वी जयंती... माझ्यासाठी तरी नियतीने किती छान योग आणला आहे... 
लोकमतचा एवढा मोठा सगळा पसारा बाबूजींच्या पश्चात महाराष्ट्रभर पसरला. कमान बांधताना त्याला आधार देतात... कमान मजबुतीने उभी राहिली असे लक्षात आले की, आधार काढून घेतात. ‘आधार काढल्यावर कमान कोसळली नाही की दिलेला आधार मजबूत होता...’ असे मानले जाते. बाबूजींचा लेकमतचा आधार किती प्रचंड पक्का होता हे आज प्रत्येक दिवशी सिद्ध होत आहे. म्हणूनच एका वटवृक्षाच्या पारंब्याच नव्हे... महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर लोकमच्या वटवृक्षाने नवीन इतिहास घडवला. गिनीज बुकाच्या पलिकडचे हे काम आहे. (गिनीज बुक संकल्पना १९५५ ला सुरू झाली.) श्री. विजयबाबू, श्री. राजनबाबू, श्री. निर्मलबाबू, श्री. अशोक जैन, श्री. रमेश बोरा असे बिनीचे कार्यकौशल्याचे कर्णधार आहेत. पत्रपंडित पा. वा. गाडगीळ यांनी दिशा दिली. बाबा दळवी, सुरेश द्वादशीवार या संपादकांनी त्या दिशेवर आणि त्या धोरणावर या वृत्तपत्रांचा चेहरा सामान्य माणसाचाच ठेवला. त्यातून हे यश मिळाले आहे. खूप जणांनी नावं घेवून कृतज्ञाता व्यक्त केली पाहिजे... पण, ती यादी खूप मोठी होईल... लोकमतच्या सर्व आवृत्त्या.... त्यामधील सर्व टीम... संपादकीय विभाग... वितरण विभाग, जाहिरात विभाग, सामान्यातील सामान्य शिपायापासून ही बांधणी झालेली आहे.  त्या त्या गावातील तरुणांना तयार करून लोकमतची टीम जमा झाली. यात पुण्या- मुंबईचे फार थोडे... अशा या लोकमतने ५२ वर्ष पूर्ण केली. जळगाव लोकमतने ४६ वर्षे पूर्ण केली. औरंगाबाद लोकमतने ४१ वर्षे पूर्ण केली. हे काम सोपे नाही. या परिवारात मी ३०-३५ वर्षे पणाला लावून काम केले, त्याचा मला आनंद आहे. या परिवाराने मला त्यांचे मानले. याचेही समाधान आहे. आणि १८ तारखेला साजरा होणाऱ्या ‘लोकमत अमृत महोत्सव सोहळा’ आणि ‘बाबूजी जन्मशताब्दी सोहळा’ या दोन्ही सोहळ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! बाबूजींना आदरांजली.... 
- मधुकर भावे. 📞9892033458

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*