या ‘युती’ला ‘आघाडी’त बसवावे लागेल...!

या ‘युती’ला ‘आघाडी’त बसवावे लागेल...!
- मधुकर भावे

राजकीयदृष्ट्या तीन-चार महत्त्वाच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या. उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे परिणाम होणार आहेत. त्यातील पहिली महत्त्वाची घटना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाशभाई आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची ‘युती’! ही युती झाली याचा महाराष्ट्रात दोन्ही राजकीय पक्षांना नक्कीच फायदा होईल. वंचित आघाडीला विधानसभा किंवा लोकसभेत एकही जागा निवडून आणता आली नसली तरी, अनेक जागा पाडण्याचे काम वंचितने केले. त्याचा परिणाम प्रामुख्याने काँग्रेसच्या उमेदवारांचे पराभव होण्यात झाला. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव. त्यांच्याविरुद्ध भाजपच्या उमेदवाराबरोबरच वंचित आघाडीचे खुद्द प्रकाश आंबेडकरच उभे राहिले. आता या वंचित आघाडीने शिवसेनेसोबत ‘युती’ केल्याचे जाहीर केले आहे. पहिल्या प्रथम म्हणजे ही ‘युती’ टिकली पाहिजे. दुसरे म्हणजे आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची ‘आघाडी’ आहे.  त्याला ‘महाविकास आघाडी’ असे नाव दिले. ते  नाव सत्तेत असताना ठीक होते.  आता नुसते ‘महा-आघाडी’ म्हणायला हरकत नाही. शिवसेना आणि वंचित पक्ष यांची ‘युती’ असेल तर या युतीला सध्याच्या आघाडीत एकतर सामावून घ्यावे लागेल किंवा आता ‘तीन ऐवजी चार पक्षांची आघाडी’ झाल्याचे जाहीर करावे लागेल.  वंचितची युती शिवसेनेपुरतीच असेल तर विषय आणखी कठीण होईल.  सध्यातरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या दोघांच्या युतीला पाठींबा दिलेला आहे. पण, तेवढ्यावर भागणार नाही. तिकीट वाटपाचा विषय आला की कुरबूर होईल म्हणून एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल... एकूण जागांपैकी वाटपाचे चार वाटे पडणार की तीन वाटे.... म्हणजे असे की, शिवसेना आणि वंचित यांचीच युती असेल तर शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या एकूण जागांपैकी वंचितला िकती जागा द्यायच्या, हे शिवसेनेने ठरवावे. हा एक मुद्दा. जर आघाडीत ‘वंचित’ला सामील केले तर एकूण चार वाटे पडतील... म्हणजे आघाडीतील मूळ तीन पक्षांना २५ टक्के जागा सोडाव्या लागतील.  यासाठी केवळ शिवसेनेसोबतच नव्हे तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांबरोबर सेना आणि वंचितच्या नेत्यांनी बसून याचा स्पष्ट निर्णय केला पाहिजे. शिवाय जर आघाडी करायची असेल तर ‘जागांवरून बिघाडी होणार नाही....’ हे पहिले पथ्य पाळावे लागेल.  कारण यात गडबड झाली तर भाजपाच्या नळावर पाणी भरणारे सगळे चॅनलवाले गडबड होण्यासाठी टपलेले आहेत. म्हणून जो काही राजकीय निर्णय कराल तो चौघांच्या विचारांनी करा. जयंत पाटील, नाना पटोले या अध्यक्षांसह पवारसाहेबांच्या सोबतही एक बैठक होऊ द्या. खरगे साहेबांनाही या बैठकीला बोलवा. एकप्रकारे राष्ट्रीय पातळीवरच या आघाडीची बैठक पक्की करून घ्यावी लागेल. तसे झाले नाही तर फायद्याऐवजी नुकसान होईल. 
वंचित आघाडीचा पाठींबा महत्त्वाचा ठरेल. प्रकाश आंबेडकर हे बुद्धीमान नेते आहेत. बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षात जे सक्षम असे चिंतन आणि अभ्यासू नेते होते त्यात बी. सी. कांबळे, दादासाहेब रूपवते त्यानंतर मला तर प्रकाश आंबेडकर हे वाचन करणारे आणि बुद्धीमान नेते वाटतात. शिवाय विचाराने स्पष्ट आहेत. काही पूर्वग्रह त्यांना सोडावे लागतील. अर्थात हा नियम सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही लागू आहे. महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करायचा असेल तर, जे जे पुरोगामी आहेत त्या सगळ्यांनी समजूतीने घेतले पाहिजे. मग अडचण होणार नाही. सगळ्यांनी मनाने ठरवले तर चौघांची आघाडी अवघड नाही. त्यासाठी मनाची तयारी हवी. घरात एकच खोली आहे... आणि चार पाहुणे आले... पण आलेल्या पाहुण्यांबद्दल प्रेम आहे... तर एक खोली असली तरी अडचण वाटत नाही. पण, आलेला  पाहुणा नावडता असेल तर आणि तो एकटा असला तरी दहा खोल्या असल्यावरसुद्धा त्याची अडचण वाटते. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला स्वीकारताना मोकळ्या मनाने स्वीकारा.  हा नेता शब्द दिला तर तो पक्का पाळेल. त्यांच्या पाठिमागे असलेला लढाऊ समाज बाबासाहेबांवर श्रद्धा असलेला समाज आहे. त्या समाजाला वंचित रहावे लागले... सगळ्या भाकऱ्या एकाच दुर्डीत वाढल्या गेल्या तर असे होणार... म्हणून वंचितची युती शिवसेनेपुरती न राहता... त्यांना आघाडीत घ्या. कारण शत्रू प्रबळ आहे... शिवाय शिवसेनेची शकले झाली आहेत. उद्धवसाहेबांच्या मागे असलेली शिवसेना प्रभावी आहे, यात शंकाच नाही... एकनाथ शिंदे यांची सेना सत्तेमुळे आणि मुंबई -ठाण्यात भाजपाचा फायदा करून देणारी असेल पण तमाम महाराष्ट्रात अजून त्यांचे बस्तान बसलेले नाही. उद्या सत्ता गेली तर परिस्थिती आणखी अवघड होईल. तरी आजच्या घडीला मूळ शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे, हे मान्यच करावे लागेल. शिवाय आणखी एक गोष्ट स्पष्ट आहे... मुंबई-पुणे-ठाणे आणि जी शहरे आज फुगलेली आहेत... तेथील मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग  आणि धनिक वर्ग भाजपसोबत आहे... हे  मान्य करावे लागेल. कष्टकरी, कामगार, शेतकरी असा राबणारा ग्रामीण विभाग आहे तो अजून भाजपाच्या फार आहारी गेलेला नाही. पण, मुंबईत मेट्रोच्या उद्घाटनाचा इव्हेंट एवढा गाजावाजा करत केला की जणू देशात पहिल्यांदाच मेट्रो धावते आहे! ३० वर्षांपूर्वी कलकत्यात आणि २५ वर्षांपूर्वी दिल्लीत मेट्रो धावली. पण काँग्रेसवाल्यांना त्याचा ‘इव्हेंट’ करता आला नाही. प्रत्येक विषयाला प्रसिद्धी झळाळी दिल्याशिवाय भाजपाचा कार्यक्रम होत नाही. शिवाय सगळीच चॅनल भाजपांकित आहेत. त्यामुळे दिवसभर डोळे, मेंदू यावर भडीमार केला जात आहे. त्याचा परिणाम होतच असतो. ‘पंतप्रधान मेट्रो ट्रेनने फिरले...’  ‘त्यांनी तिकीट काढले...’ याचाही ‘इव्हेंट’ केला जात आहे. पंतप्रधानांच्या मातोश्रींचे दु:खद निधन झाले... कोणाचीही माता स्वर्गवासी झाली तर तो धक्का सहन करणे अवघड असते. ही संवेदना पदावर अवलंबून नाही... मनुष्य भावनेवर अवलंबून आहे... पण, आदरणीय पंतप्रधानांच्या आदरणीय मातोश्रींचे दु:खद निधन हा विषयही चॅनलवाल्यांनी इव्हेंटसारखाच दाखवला. सगळ्या बाजूंनी प्रसिद्धीचे लोट इतके प्रभावी आहेत की, श्वास कोंडायची वेळ आली... ही साधने काँग्रेसवाल्यांची देणगी आहे... तीच देणगी भाजपवाल्यांनी अशी काही उलटवली त्यामुळे शहरांना पादाक्रांत करणे त्यांना सोपे झाले आहे. या स्थितीत शहरांमध्ये किती यश मिळेल, याचा भाजपाचा तक्ता तयार आहे... मतदारसंघवार आखणी झालेली आहे. भरपूर पैसा आहे. नियोजन आहे... कार्यकर्त्यांची पेरणी आहे.  ज्या मतदारसंघात ठराविक उमेदवारांना घेरायचे आहे, तिथे दिल्लीहून माणसं पाठवण्याची योजना आहे.... आमच्या महा-आघाडीकडे यातले नेमके काय आहे? श्रीगणेशापासून सुरुवात करावी लागेल आणि म्हणून प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत करताना विचारपूर्वक आखणी करा... जागांवरून तंटा-बखेडा होता कामा नये. 



 बाळासाहेबांना अडचणीत आणण्यासाठी...
डोळ्यासमोरचे एक उदाहरण आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचा विषय किती छोटा... जागा विधान परिषदेची... समंजसपणे हा विषय हाताळला गेला असता तर काट्याचा नायटा झाला नसता. आज एका तरुण कार्यकर्त्याला पक्षातून निलंबित केले. त्याही पेक्षा महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कोंडीत पकडण्याकरिता हा विषय नायटा होईपर्यंत मुद्दाम चिघळवला का? बाळासाहेब या सगळ्या विषयांत काहीही बोललेले नाहीत. परंतु जे घडले ते काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अितशय चुकीचे घडलेले आहे. उद्या सत्यजित तांबे निवडूण आले तर काँग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून निश्चितच विधानपरिषदेत काँग्रेससोबत बसतील. यापूर्वीची अशी उदाहरणे हवी आहेत का? विधानसभेच्या निवडणुका ‘अपक्ष’ म्हणून लढलेले शंकरराव कोल्हे, अनंतराव थोपटे, खुद्द बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांचे तिकीट काँग्रेसने नाकारले होते. बाळासाहेबांच्या बाबतीत तर प्रदेश काँग्रेसने संगमनेर मतदारसंघात बाळासाहेबांच्या नावाची एकमताने शिफारस केली. पण, केंद्रीय समितीने १९९० साली बाळासाहेबांऐवजी शकुंतला थोरात यांना तिकीट दिले. अपक्ष असलेले हे सगळे आमदार नंतर काँग्रेसचे मुख्य नेते झाले. नाशिक मतदारसंघाचा विषय भर चौकात ढोल बडवावे, एवढा मोठा नव्हता. थोडासा समंज्ास्ापणा कमी पडला म्हणा किवा बाळासाहेबांना या निमित्ताने कोंडीत पकडायचे म्हणा... असे काहीतरी यात घडले. त्यामुळे छोटा विषय कारण नसताना चघळण्याचा विषय झाला. 
अनिल देशमुख यांना 
सर्वोच्च न्यायालयाचा न्याय...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन निर्णयाविरोधात सी. बी. आय. ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जर अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला तर साक्षीदारांवर दडपण आणले जाईल, असा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात सी. बी. आय. ने केला.  सर्वांेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि त्यांच्या खंडपीठाने सी. बी. आय. चे हे निवेदन पूर्णपणे अमान्य केले. कायद्याच्या भाषेत अपील फेटाळून लावले. मुंबईच्या उच्च न्यायालयात सी. बी. आय. ची न्यायमूर्तींनी फजीती केली होती. १२९ साक्षीदार तपासल्यावर एकही पुरावा समोर येवू शकला नाही. ऐकीव माहितीवर खटला भरला, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. अनिल देशमुख ३५ वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्या विरोधात ३५ वर्षांत कसलाही आक्षेप घेतला गेला नाही, असेही निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. ही निरीक्षणे रद्द करावीत... जामीन रद्द करावा, ही सी. बी. आय.ची मागणीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी फेटाळून लावली. परमवीर सिंह यांनी आरोप केल्याने एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याला वर्षभर तुरुंगवास घडला... त्यामागे कसलाही पुरावा नव्हता. हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी स्पष्ट झाले. सूड भावनेने केलेल्या कारवाईमागे नेमके कोण आहे? आणि अनिल देशमुख यांच्यासारख्या सार्वजनिक जीवनातील एका चांगल्या नेत्याची झालेली बदनामी कोण भरून काढणार... आणि कशी? याचे उत्तर कोण देवू शकेल? आणि त्यांना भोगावा लागलेला मनस्ताप..... त्यांच्या कुटुंबीयांचा झालेला मानसिक छळ... क्लेष... दडपण आणि घुसमट कशी भरून निघेल?
सध्या एवढेच....9892033458

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*