१३७ वर्षांच्या काँग्रेसचे ९८ वे अध्यक्ष....
श्री. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष झाले. मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले. तिकडे राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये मोठा प्रतिसाद मिळवित आहेत. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना सध्याचे दिवस अनुकूल नाहीत. गुजरात विधानसभा निवडणुकीतही ‘आप’चे मोठे आव्हान आहे. दक्षिणेतील जवळपास एकही राज्य भाजपासोबत जाणार नाही. सर्व दिवस सारखे नसतात. या स्थितीत घराणेशाहीच्या आरोपाखाली काँग्रेसला घेरण्याची एक संधी भाजपा सातत्याने साधून होता. वाहिन्या त्यांच्या मदतीला आहेत. या स्थितीत काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक झाली. यापूर्वी गांधी-नेहरू घराण्याच्या बाहेर १९९२ ते १९९४ या काळात पी. व्ही. नरसिंहराव काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि पंतप्रधानही होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या मदतीने काही क्रांतिकरी निर्णय घेतले. पण, पक्षाचे नेतृत्त्व करताना ते कमी पडले. १९९६ ते १९९८ सिताराम केसरी अध्यक्ष झाले होते. त्यांचा प्रभाव तर अिजबात नव्हता. काँग्रेसच्या घसरणीची सुरुवात तेव्हापासूनच झाली. आता नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष निवडणुकीतून निवडून आलेला आहे. खरगे यांना ८० व्या वर्षी हा सगळा प्रचंड पक्ष कसा सावरता येईल, याची कसोटी लागणार आहे. ५० वर्षांपूर्वीचा काळ असा होता की, देशातील काँग्रेसचे सगळे विरोधी पक्ष एकत्र येवून काँग्रेसला विरोध करत होते. ज्यावेळी भाजपा नव्हता तेव्हाचा जनसंघही त्या त्या राज्यात काँग्रेस विरोधी आघाडीत घुसलेला होता. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीतही जनसंघ होता. १९६३ साली पंडित नेहरू पंतप्रधान असताना काँग्रेसला त्यावेळी मोठा वाटणारा धक्का बसला होता. नेहरूंच्या अखेरच्या दिवसांत लोकभेच्या चार पोट निवडणुका झाल्या. या चारही निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. कनोजमधून डॉ. लोहिया, मुंघेरमधून मधू लिमये, अमरोहमधून आचार्य कृपलानी, राजकोटमधून मिनू मसानी हे विजयी झाले. नेहरूंना तो मोठा धक्का होता. २७ मे १९६४ रोजी पंडितजींचे िनधन झाल्यावर श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, १९६७ सालच्या विधानसभा निडणुकीत ९ राज्यांत काँग्रेस पराभूत झाली. तेथेही काँग्रेस विरोधात सगळ्या विरोधी पक्षांची आघाडीच झाली होती. काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला, पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल, उत्तर प्रदेशमध्ये चरणसिंग, बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर, बंगालमध्ये अजय मुखर्जी, ओडिसामध्ये हरेकृष्ण मेहताब, मध्यप्रदेशमध्ये गोविंद नारायणसिंग, तामिळनाडूमध्ये अण्णा दुराई, केरळमध्ये ई. एम. एस. नम्बुद्रीपाद असे ९ राज्यांत विविध पक्षांचे मुख्यमंत्री झाले. अवघ्या दीड वर्षांत ही सरकारे कोसळली. फक्त तामिळनाडू टिकले आिण ते अजूनपर्यंत काँग्रेसच्या हातात आलेले नाही. (अपवाद... काँग्रेसच्या जानकी रामन यांचा काही काळ मुख्यमंत्री होण्याचा).
१९७१ साली इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध जी ‘बडी आघाडी’ स्थापन झाली त्यात राजाजींचा स्वतंत्र पक्ष आणि भाजपाही होता. १९७७ साली काँग्रेस विरोधात जनता पक्षातही सगळे पक्ष एक झाले. १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींसह काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. केंद्रातील काँग्रेसचे सरकार पहिल्या प्रथम पराभूत झाले. हे जनता पक्षाचे सरकार विचित्र तोंडाचे होते. ते अल्पावधीत कोसळले. नंतर चरणसिंग यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली ती काँग्रेच्या पाठिंब्यावर. लोकसभेला सामोरे न जाताच ते सरकार कोसळले. कारण काँग्रेसने पाठींबा काढून घेतला. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी जाहीर केले होते की, ‘चरणसिंगजीको सरकार बनानेका काँग्रेसने समर्थन दिया था... चलाने को नही.... ’ नंतर १९७९ च्या पोटनिवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा एकदा श्रीमती इंदिरा गांधी यांना सत्तेवर बसवले. त्यानंतर इंदिराजींची हत्या, राजीव गांधी यांचे पंतप्रधान होणे.... त्यांचही हत्या हा सगळा भीषण इितहास तसा डोळ्यासमोर आहे. २५ वर्षांपूर्वीच काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर जी घसरण झाली ती काही प्रमाणात सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यावर २००४, २००९ या दहा वर्षांत काँग्रेस उभी राहतेय, असे वाटले. पुन्हा एकदा भाजपाने पद्धतशीर प्रचार यंत्रणेने देशातील वातावरण अनुकूल करून घेतले. आणि आज धार्मिक उन्मादाच्या जोरावर भाजप विरोधात सर्व पक्षांना एकत्र येवून लढावे लागणार आहे. ५० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येवून लढत होते. ५० वर्षांतील बदल म्हणजे भाजपाविरोधात सर्व पक्षांना एकत्र येवून आता लढावे लागत आहे.
या स्थितीत नवीन अध्यक्ष झालेले खरगे यांच्यासमोर फार मोठे आव्हान आहे. त्यांचे वय ८० आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही सगळ्यात मोठे आव्हान आहे. काँग्रेसकडे सत्ता नसली तरी गांधी-नेहरू आणि काँग्रेसचा विचार देशातून संपलेला नाही. काँग्रेस पक्षही संपलेला नाही. प्रत्येक गावात काँग्रेसचा विचार आहे.... काँग्रेसचा कार्यकर्ता आहे... काँग्रेसचा झेंडा आहे... शिवाय काँग्रेस हा एक राजकीय पक्ष नाही. ती एक विचार धारा आहे. १२५ कोटींचा देश एकत्र ठेवायचा असेल तर या देशाची घटना जो सर्व धर्म समभाव सांगते, तोच देशाला तारणारा केंद्रबिंदू आहे. सर्व जाती-धर्मांना बरोबर घेवूनच हा देश चालवावा लागेल. गांधींची आणि नेहरूंची कितीही बदनामी केली तरी या देशात त्यांचे नाव पुसून टाकता येत नाही म्हणून ही बदनामी सुरू आहे. त्यांच्या घराणेशाहीवर टीका करताना या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत नेहरू कुटुंबाने तब्बल १६ वर्षे सक्तमजुरीचा कारावास भोगला होता. मोतीलाल नेहरू, त्यांच्या पत्नी स्वरूपाराणी, पंडित नेहरू, त्यांच्या पत्नी कमला नेहरू, इंदिरा गांधी, नेहरूंच्या भगिनी, कृष्णा, त्यांचे पती राजाहाथीसिंग, विजयालक्ष्मी, त्यांचे पती रणजीत पंडित, त्यांची कन्या चांद अशा नेहरू कुटुंबातील सर्वच्या सर्व १० व्यक्तींना स्वातंत्र्य चळवळीत कारावास भोगावा लागला. याच कुटुंबातील २ पंतप्रधानांचे देशासाठी बलिदान झाले. नेहरू-गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीची चर्चा करताना, या कुटुंबाने केलेला त्याग इितहासालाही पुसता येणार नाही. भाजपावाल्यांनी कितीही अपप्रचार केला तरी ते शक्य नाही. ज्याला काँग्रेस संस्कृती म्हणतात, ती देशाच्या स्वातंत्र्याचा आदर्श आहे. गंधाचा टिळा लावलेले मदनमोहन मालविय....त्यांचा उजवा हात धरलेले मौलाना अबुल कलम आझाद आणि डाव्या हाताला वीर नरीमन असा हा सर्वधर्मिय नेत्यांचा लढा, स्वातंत्र्य चळवळीत लढला गेला, तिचे नाव काँग्रेस संस्कृती आहे. पक्षाच्या पलिकडची ही संस्कृती आहे. सध्याच्या प्रचारी लाटेत धार्मिक उन्मादामुळे इितहास पुसण्याचे काम सुरू आहे. पण, भाजपाच्या दुर्दैवाने तो पुसला जात नाही. सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभा केला तरी गांधीजींची उंची कमी होणार नाही, हे देशाच्या लक्षात आले आहे. कारण गांधी जगात ६०० विद्यापिठांत शिकवला जातो. काँग्रेसचे तत्त्वज्ञाान म्हणजेच गांधीविचारसरणी. आज सर्वबाजूंनी सत्ताधारी काँग्रेसला घेरतात पण, देशात भाजापाविरोधात राष्ट्रीय पातळीवर खंबीरपणे उभा राहणारा काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे. त्याची प्रचिती २०२४ ला येईलच. जेव्हा जनमानसात असंतोष साचत असताे, तो ज्यावेळी व्यक्त होतो, त्यावेळी नेता महत्त्वाचा नसतो. पक्ष महत्त्वाचा असतो.
नवे अध्यक्ष खरगे यांना काँग्रेची धोरणे व्यापक प्रमाणात बदलावी लागतील. तरुणांना काँग्रेसशी जोडावे लागेल. या देशाचे मुख्य प्रश्न केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी बाजुला टाकलेले आहेत. जीवन जगणे अशक्य असलेली महागाई, जबर वेगाने निर्माण होणारी बेरोजगारी, रुपयाचे अवमूल्यन त्यामुळे अांतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाची पत घसरणे, धार्मिक उन्माद, घटना आणि लोकशाहीचे रक्षण हे आजचे मुख्य प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर एकीकडे पैसे चढवताना दुसरीकडे या शेतकऱ्यांच्या लढ्याला पंजाबमध्ये चिरडून टाकण्यासाठी लोखंडी खिळे ठोकलेले पत्रे अंथरले होते. हा विरोधाभास ‘करणी आणि कथनी’मधला फरक आहे. देशव्यापी मोहीम करून खरगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नव्याने घुसळण करावी लागेल. भाजपाविरोधातील पुरोगामी विचारांच्या छोट्या-मोठ्या पक्षांना, नेत्यांना सोबत घ्यावे लागेल. अहंकार बाजूला ठेवावे लागतील. २०२४ च्या लढाईवर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसला याचा गंभीरपणे विचार करावा लागेल.
१८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली. पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी होते. किती नामवंतांनी हे पद भुषवले आहे... फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, दिनशा वाच्छा, गोपाळकृष्ण गोखले, मदन मोहन मालविया, डॉ. अॅनी बेझंट, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास १९२४ साली बेळगावला काँग्रेसचे एकच वर्षाकरिता अध्यक्ष झालेले महात्मा गांधी, सरोजीनी नायडू, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, सुभाषचंद्र बोस, आचार्य कृपलानी, पुरुषोत्तमदास टंडन, इंदिरा गांधी अशी काँग्रेस अध्यक्षांची फार महान परंपरा आहे. या उंचीची माणसं आता होणार नाहीत. भाजपामध्येही अटलबिहारी वाजपेयी पुन्हा होणे नाही.... राजकीय विरोध असला तरी देश, घटना आणि देशातील सामान्य माणसं, याबद्दलच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना अत्यंत उच्च दर्जाच्या होत्या. राजकारणाचा चोथा झालेला नव्हता. राजकारणात शत्रूत्त्व आलेले नव्हते. सत्तेचा वापर विरोधकांना चिरडून टाकण्याकरिता झालेला नव्हता. आणि आजपर्यंत कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना संपवून टाकण्याची भाषा केली नव्हती. एकपक्षीय, एकव्यक्तीय हुकूमशाहीकहे देश चालला असताना सामान्य माणसांचे प्रश्न अधिक उग्र बनले आहेत. अवघ्या आठ वर्षांत जगातील २४० व्या क्रमांकाचा अदाणी जगातला श्रीमंत माणूस होतो आणि त्याचे फोटो वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापले जातात... काँग्रेसला पुन्हा एकदा देशातील सर्वात गरीब माणसाला शोधून काढायचे आहे. त्याच्यासाठी लढाई लढायची आहे. खरगे यांच्यापुढील हे आव्हान आहे. सगळ्यांना बरोबर घेवून हा नवा प्रयोग हा देश, संविधान, लोकशाही याचे रक्षण करण्यासाठी सक्षम होईल, अशी अपेक्षा करू या...
सध्या एवढेच...
Comments
Post a Comment