अशोकराव, जायचे तर खुशाल जा...

अशोकराव, जायचे तर खुशाल जा... 
सध्या  वाहिन्यांवर ‘अशोक चव्हाण’ आणि ‘गणपती दर्शन’ हे दोन विषय फार मोठ्या चर्चेत आहेत. ‘गणपती दर्शन’ आता भक्तीभावाच्या पलीकडे जावून मोठ्या प्रमाणात राजकीय बनल्याची भावना सर्वच माध्यमांची आहे. शिवाय राजकारणातील या भक्तीभावाच्या भेटीवेळचे ‘योगायोग’ ही फार विलक्षण आहेत. अशोक चव्हाण आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यापूर्वी काँग्रेस पक्षात मंत्री हाेते, मुख्यमंत्री होते. त्याआधीही मंत्री होते, राज्यमंत्री होते. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांचे िपताश्री. स्व. शंकरराव चव्हाण १९८६ ते १९८८ महाराष्ट्रात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा नांदेडमधून काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून अशोक चव्हाण निवडून आले होते. शंकरराव चव्हाण १९५२ साली नांदेड नगरपालिकेचे अध्यक्ष होते. २००२ ला ते खासदार होते. सलग ५० वर्षे ते काँग्रेसच्या सरकारमध्ये सत्तेत होते. अशोक चव्हाण १९८५ पासून जवळपास ३० वर्षे सत्तेत आहेत. १९९५ ते १९९९ हा चार वर्षांचा काळ सोडला तर ते कायमचेच काँग्रेससोबत सत्तेत आहेत. त्यांचा जन्म  २८ अॅाक्टोबर १९५८ चा. म्हणजे आज ते ६४ वर्षांचे आहेत. या वयापैकी जवळपास अर्धे आयुष्य काँग्रेसच्या सत्तेमध्ये गेले आहे. अशोकराव जन्माला आले त्या दिवशी शंकरराव चव्हाण महाराष्ट्र मंत्रीमंडळात उपमंत्री होते. त्यामुळे अशोकराव हे जन्मापासूनच ‘सत्तेचा चमचा’ तोंडात घेवून आहेत आणि तो चमचा चांदीचा असेल िकंवा नसेल पण, काँग्रेसचा मात्र होता. आता काय झाले ते मािहती नाही... 
सध्या वाहिन्यांपासून अनेक लोक सांभाळून राहतात. ईडीला जसे राजकीय लोक घाबरतात... तसेच वाहिन्यांपासूनही दूर राहतात. पण, योगायोग नावाची गोष्ट काही विलक्षण आहे. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्यांच्या भेटीसाठी शेकडो लोक बसलेले असतात. अशोकराव मंत्री-मुख्यमंत्री आणि पुन्हा मंत्री असतानाही शेकडो लोक त्यांच्या त्या त्या वेळच्या विविध बंगल्यांवर भेटीसाठी ताटकळत बसायचे. पण, फार क्वचित लोकांची व त्यांची भेट व्हायची. ‘योगायोग’ असेल किंवा नसेल.... पण आता मात्र असा ‘योगायोग’ आहे की, गणपती दर्शनाच्या निमित्ताने एका मित्राच्या घरी अशोकराव जायला.... आणि ितथं फडणवीस साहेब यायला.... काय छान ‘योगायोग’ आहे. त्यामुळे गणपती दर्शन झालेच... अशोकरावांना फडणवीसांचे आणि फडणवीसांना अशोकरावांचेही दर्शन घडले. आता राजकारणातील माणसं ‘काय अशोकराव, तब्बेत कशी आहे....?’ एवढा एकच प्रश्न विचारून ही भेट थांबत नसते. शिवाय दोघेही माजी मुख्यमंत्री.... फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ म्हणाले होते.... एक पायंडी चुकली.... आणि ते उपमुख्यमंत्री म्हणून आले. ही तात्पुरती व्यवस्था आहे. २०२४ पर्यंत जमवाजमव करण्याकरिता जेवढे मिळतील त्यांच्या ‘योगायोगाने’ अशा भेटी होणारच आहेत. त्यातीलच ही एक भेट. पण, गंमत कशी आहे.... अशा भेटींची एवढी चर्चा होणे.. लोकांना वाटते, काहीतरी पाणी मूरतेय.... कुठे मुरतेय.... फडणवीस यांच्याकडे मुरणे शक्यच नाही.... मुरले तर अशोकरावांकडेच मुरणार.... पण, हे अशोकरावांनी बोलायला पाहिजे.... त्यांनीच सांगायला पाहिजे.... ‘हो, योगायोगाने भेट झाली.... पण, मी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष सोडणे शक्य नाही.... ज्या पक्षाने मला मुख्यमंत्री केले... पक्षाचे अध्यक्ष केले.... अनेकदा मंत्री केले.... एकदा खासदार केले.. तो पक्ष मी कसा सोडेन....’ नितीन गडकरींच्या भोवती असेच एकदा संशयाचे वातावरण उभे राहिले. तेव्हा त्यांनी चक्क सांगून टाकले की, ‘विहिरीत उडी टाकून जीव देईन, पण भाजपा सोडणार नाही....’ गडकरींवर लोकांचा लगेच विश्वास बसला. मोदींनी त्यांना काहीसे बाजुला केल्याची भावना लोकांमध्ये ठाम आहे. पण, ते पक्ष सोडतील हे शक्य नाही... अशोकराव, तुमच्या बाबतीत एवढा ठामपणा लोकांना का वाटत नाही, याचे उत्तर तुम्ही द्यायला हवे. तुमच्या वतीने खुलासा कोण करतयं....? तर, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात.... ते सांगतायत, ‘अशोकराव भाजपात जाणे शक्य नाही.... आमच्या सोबत ते ‘भारतयात्रे’च्या तयारीत आहेत....’ बाळासाहेब थोरात यांचे हे शब्द १०० टक्के खरे आहेत, असेसुद्धा अशोकराव बोलले नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांच्या तोंडात त्यांच्याच कारखान्यातील किंवा अशोकरावांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यातील चिमुटभर साखर तोंडात पडो.... असे म्हणण्याची पण सोय राहिली नाही. अशोकराव ठामपणे बोलत नाहीत आणि बाळासाहेब बोलत आहेत... म्हणून संशय आणखी वाढतो. शिवाय याला एक संदर्भ आहे... अशोकरावांचे खास म्हणजे अगदी खास .... राधाकृष्ण विखे-पाटील आता भाजापामध्ये आहेत... महसूलमंत्री झालेत... त्यांच्याबद्दलही असाच संशय निर्माण झाला होता.... तेव्हा ते म्हणाले होते, ‘काय वाट्टेल ते झाले तरी मी काँग्रेस सोडणे शक्य नाही.... माझ्या रक्तातच काँग्रेस आहे... ती कोण काढू शकणार....?’ आणि नंतर गंमत अशी झाली की, देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना एक टाचणी टोचली आणि काय गंमत राधाकृष्ण विखे यांच्या रक्तातील काँग्रेस फडणवीसांनी एका दमात शोषून घेतली. मग, राधाकृष्ण विखे-पाटील लाजत-मुरडत भाजपवासीय झाले. नंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या. ‘अहमदनगर जिल्ह्यातील १२ च्या १२ जागा भाजपाला जिंकून देतो’, अशी शपथ त्यांनी फडणवीसांना साक्ष ठेवून घेतली. पण, पुढे असे झाले की, ते त्यांना जमलेच नाही. कारण नगर जिल्हा हा बिना काना-मात्रा असणारा जिल्हा आहे. अ-ह-म-द-न-ग-र... मात्र या जिल्ह्यातील राजकीय काना-मात्रा एवढ्या आहेत की, जगातल्या कोणत्याही जिल्ह्यात नाहीत. पण, फडणवीसांनी त्यांना बरोबर हेरले होते. अशोक चव्हाण काँग्रेसचे अध्यक्ष होते.. राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. या दोघांनीही २०१४ ते २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा हा पक्ष यांच्याविरोधात एका शब्दाने कधीही टीका केली नाही. फडणवीसांकडे हा सगळा तपशील असतो. त्यांच्याकडे एक टीम यासाठी काम करते. नाना फडणवीसांकडूनच हा वारसा थेट गंगाधरराव फडणवीस यांच्या घराण्यात आला आणि तो देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय  रक्तात एकदम फिट्ट बसला. त्यामुळे कोणाला जवळ करायचे, कोण गणपतीच्या दर्शनाला कोणत्यावेळी जाणार आहे, कोणाची योगायोगाने भेट घ्यायची.... याचे सगळे टायमिंग फडणवीसांना बरोबर मािहती आहे. ५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार आहेत. कारण आहे... लालबागच्ाा राजाचे दर्शन.... अमित शहा यांच्या मनोकामना दर्शनापूर्वीच पूर्ण झालेल्या आहेत. तरीही दर्शनाचे प्रमुख कारण सांगून या निमित्ताने पुन्हा एकदा ‘योगायोगा’नेच भेटी होणार आहेत. कदाचित त्याचवेळेला नेमके अशोक चव्हाण दर्शनाला जातील आणि मग लालबाग ते सह्याद्री गेस्ट हाऊस असा अिमत शहा यांच्या गाडीत फडणवीसांसह प्रवास होऊ शकेल.... पण याचा अर्थ वाहिन्यावाल्यांनी लगेच असा काढला की, ‘चालले, अशोक च्ाव्हाण चालले.’ तर ते अन्यायाचे होईल. अशोकराव एवढी घाई करणार नाहीत. दिल्लीमध्ये जसे जी-२३ मध्ये २३ लोक जमा होईपर्यंत गुलाम नबीसुद्धा थांबले होते. ही संख्या बऱ्यापैकी झाल्यानंतर मग ४०-४० वर्षे काँग्रसमध्ये राहून सत्ता भोगलेले हळू-हळू बोलू लागले. आता सत्ता िमळण्याची शक्यता जवळपास नाहीच.... हे लक्षात आल्यानंतरच असे साक्षात्कार घडतात.... की, पक्षाचे नेतृत्त्व कमकूवत आहे... खरं म्हणजे सत्ता नसल्याने हीच मंडळी कमकूवत झालेली असतात. कारण सत्तेची त्यांना सवय झालेली असते. अशोक चव्हाण यांचे नेमके दुखणे तेच अाहे.... त्यांना सत्तेची सवय झालेली आहे. यापेक्षा अिधक थोडासा टोचणारा शब्द, पण योग्य शब्द तो म्हणजे.... ‘सत्तेची चटक’ लागलेली आहे. त्यामुळे सत्त्ोच्या बाहेर दोन-अडीच महिने रहायचे, ही काय सामान्य गोष्ट नाही. कसं सहन करणार....? त्यामुळे काही तरी चलबिचल चालू आहे... पण, जी-२३ जमले नाही तरी सी-१२ जमवण्याचा प्रयत्न आहे. (सी- म्हणजे चव्हाण,) या सगळ्यांच्या मानसिकतेचा नेमका अभ्यास जसा दिल्लीच्या भाजपा नेत्यांनी केलेला आहे... तशी या विषयातील डॉक्टरेट फडणवीसांनी िमळवलेली आहे. त्यामुळे नाराज कोण? कशामुळे? विधानपरिषद निवडणुकीत मत टाकायला कोण गेले नाहीत...? विधान सभागृहाचे दरवाजे बंद होईपर्यंत ट्रॅफिकमध्ये कोण अडकले? कसे अडकले? का अडकले? याची सगळी मानसिकता फडणवीसांना बरोबर माहिती अाहे. जसे एकनाथ शिंदेसाहेब अनेक वर्ष या सगळ्याचा अभ्यास करत होते आणि मग फडणवीसांच्या लक्षात आले की, पश्चिम महाराष्ट्रातील या शिंदेसाहेबांचा भाजपाला जास्त उपयोग आहे.... चंद्रकांत पाटील पश्चिम महाराष्ट्रातील असले, अाडनावाने ‘पाटील’ असले  तरी या पाटलाला कोल्हापूरमधून निवडूनही येता येत नाही. त्यांना पुण्यातील पेशव्यांचा मतदारसंघाचा आश्रय घ्यावा लागतो आणि भाजापाच्या एका कर्तबगार भगिनीचा राजकीय बळी देवून ही जागा चंद्रकांत पाटलांना द्यावी लागते. त्यामुळे ते पाटील हाताशी होते तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बहुमत िमळाले नाही. २०१४ ला भाजपाची सत्ता नसताना १२२ आमदार निवडून आले होते. २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे फडणवीस मुख्यमंत्री असताना पूर्ण बहुमत तर िमळालेच नाही... उलट १७ आमदारांची संख्या कमी झाली. ितथंच चंद्रकांत पाटील यांच्यावर फुली पडली. आणि ‘वेगळा शोध’ सुरू झाला. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासारखा तगडा नेता िमळाला. त्याचा नेमका उपयोग करून घेण्याकरिता २०२४ पर्यंतच्या बेरीज आणि वजाबाक्या सुरू आहेत. अशोक चव्हाण यांची ‘योगायोगा’ची भेट त्याचाच एक भाग असेल. शिवाय अशोक चव्हाण यांनी जोरत जरी सांिगतले की, ‘मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही.’ तरी तो जोर त्या दिवसापुरता असू शकतो. पक्ष सोडेपर्यंत असेच बोलावे लागते, असा पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे अशोकरावांच्या भोवती संशयाचे वातावरण आजही कायम आहे. बाळासाहेबांच्या खुलाशानी लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही. बर, उद्या अशोकराव भाजपामध्ये गेले.... तरीही विखे-पाटील महत्त्वाचे खाते पकडून बसले आहेत. तिकडे वर्षवर्धन पाटील हे शिंदे-फडणवीसांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेला त्यांच्या मागे आपला चेहरा दिसेल अशी पोझ घेवून बसलेले असतात.  शिवाय आदिवासी समाजाचे मधुकर पिचड, बबनराव पाचपुते हे रांगेत आहेतच.... मग भाजपाच्या मंत्रीमंडळात हे सगळे जुने काँग्रेसवाले- राष्ट्रवादी काँग्रेसवाले सगळेच मंत्रीमंडळात आले तर.... ते मंत्रीमंडळ सर्वपक्षीय होईल आणि भाजपासाठी आजपर्यंत मर-मर मेलेले काय म्हणतील? आजच अाशिष शेलारांसारखा आणि विनोद तावडेंसारखा हाडाचा भाजपावाला सत्तेच्या बाहेर आहे. शिवाय ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ पंकजा टीकेचे पंख फडफडवीत आहेतच... मग या सगळ्यांना मंत्रिमंडळात कसे घेणार? 
शिवाय अशोकराव, तुम्ही कसंतरी जमवून घ्याल हो.... पण, जे भाजपात गेले होेते आणि परत काँग्रेसमध्ये आले आहेत त्या भास्कराव खतगावकरांना तर विष्णुपुरी धरणात उडीच मारावी लागेल. बघा बुवा...., परिस्थिती कठीण आहे... एक उपाय आहे... काँग्रेसने तुम्हाला भरपूर काही दिले आहे.... ३३ वर्षे सत्ता दिली... २ वर्षे मुख्यमंत्रीपद दिले... कल्पना तरी कधी केली होती का? आवाक्यापेक्षा खूप काही िमळाले... आता शांत बसा.... पळापळी केलीत तर पदरात सत्ता पडेल पण बदनामीही पडेल. प्रतिष्ठा तर अजिबातच राहणार नाही. निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोळ्याला डोळा  भिडवण्याची तुमची हिम्मत राहणार नाही. पक्षाने काही दिले तरच पक्षनिष्ठा.... आणि काही मिळाले नाही तर नि-स-टा... हे धंदे आता बंद करा... एवढे केलेत तरी सत्ता नसतानाही प्रतिष्ठेने जगू शकाल... पुन्हा सत्ता.... पुन्हा मंत्रीपदाची गाडी... लोक समोरून काही बोलणार नाहीत... पण, तुमच्या मागे तुमच्या या घाणेरड्या सत्ताकारणाला लोकं शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. जायचे असेल तर खुशाल जा....  काँग्रेसचे जे काही व्हायचे ते होईल.... काँग्रेसचा पराभव होऊ शकतो.... पण काँग्रेसच्या विचारांचा पराभव देशात कधीच होणार नाही.... गांधीजींना मारता येणे शक्य झाले... पण कोणत्याही राजवटीला गांधीविचार मारता आला नाही. आज जगात ६०० विद्यापीठांत गांधी शिकवला जातो.... म्हणजे काँग्रेसचा विचार शिकवला जातो. एकदिवस प्रत्येकाला जायचे आहे.. स्वाभिमान की लाचारी यातील काय निवडायचे हे प्रत्येकाने ठरवावे..
 सध्या एवढेच.... 
                                          - मधुकर भावे

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*