बिळाशीचे बंड - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोनेरी पान*
*आणि शिराळ्याचे नाव अजरामर झाले.....*
१) पणुंब्रेत क्रांतिकारकांची बैठक......
९ आँगस्ट १९४२ ला गांधीजींनी 'चले जाव'ची घोषणा केली. करा किंवा मरा या ध्येयाने देशभर इंग्रज सरकार विरोधी प्रचंड लाट उसळली. सातारा प्रांतात सध्याचा सांगली जिल्ह्या पण समाविष्ट होता. इंग्रज सरकारने पोलिस बळाचा वापर करून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. स्वातंत्र्य सैनिक भूमिगत झाले. पणुंब्रे गावी ( प त शिराळा) क्रांतिकारकांची बैठक झाली. इंग्रज सत्ता मानायची नाही असा निर्धार करण्यात आला.
पोलिस पाटील हा सरकार व जनता यांना जोडणारा दुवा होता. तोच कमकुवत करायचा. बिळाशीचे पोलिस पाटील गणपतराव पाटील (दादा) ह्यांनी पाटीलकीचा राजीनामा दिला. गणपतराव दादा, वाटेगांवचे बर्डे गुरूजी, बापु शेडगे, नेमिनाथ कत्ते व जोशी काका यांनी कोकरूड, चरण, आरळासह परिसरातील सुमारे ८६ पाटलांचे राजीनामा देण्यास तयार केले. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात कुठेही घडले नव्हते.
लोकांचे जीवन, वित्त व अब्रु यांचे रक्षण होवु लागल्याने जनतेचे पाठबळ मिळाले. लेव्हीचे धान्य गरिबांना वाटून टाकणे, जंगले खुली करणे, दिवाणी खटल्यांचा निकाल विचारपुर्वक देणे आदि कामे कार्यकर्ते निःस्वार्थी पणे करीत होते. चोरी, दरोडे, गुंडगिरी करणा-यांना अद्दल घडवणे.अशा प्रकारे जनतेचे सरकार परिसरात स्थापन झाले. ग्रामराज्याचा एक वेगळा प्रयोग राबवण्यात आला. पुढे हेच लोण शिराळा पेटा, मलकापूर संस्थान, शाहूवाडी, पाटण, कराड व वाळवा तालुक्यातील ५००-६०० गावात पसरले.
देशभरातील क्रांतिकारक पकडले गेले.... आंदोलन मागे घेतले.... मात्र प्रतिसरकार चळवळ झाले.... जनतेला ते प्रीतीसरकार वाटु लागले, गुंड, दरोडेखोरांना पत्रीसरकार वाटत होते.
*२)बिळाशीचे बंड - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोनेरी पान*
बिळाशीचे बंड हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोनेरी पान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारे १७ वर्षापुर्वी येथील जनतेने झेंडा सत्याग्रह करत ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीला विरोध केला होता. तारीख १८ जुलै १९३० च्या पूर्वसंध्येला गावातील तरण्याबांड पोरांनी स्वातंत्र्याच्या धैर्याने झपाटून कुसाईवाडीच्या
अस्वलद-यातून ४० फुटी सागवान तोडला. त्यासाठी खास चांदीचा विळा बनवण्यात आला होता. तो सागवानी सोट वाजत गाजत ग्रामदैवत महादेव मंदिराच्या आवारात उभारून त्यावर तिरंगा फडकवला. रात्रंदिवस त्याच्या रक्षणासाठी खडा पहारा होता. गावासह पंचक्रोशीतील हजारो लोक अभिमानाने भेट देत होते. लहान थोर, महिलाही मोठ्या प्रमाणात या तिरंग्याचा रक्षणासाठी त्याच्या सभोवताली गोल कडे करून उभे होते. सोबत देशभक्तीपर गीते गायली जात होती. असे हे अभूतपूर्व आंदोलन ५ सप्टेंबर १९३० पर्यंत तब्बल ५१ दिवस भारतीय तिरंगा फडकत सुरू होते.
*३)बंकटसिंगची गोळी.....करी तरुणांची होळी*
बिळाशीचे ऐतिहासिक बंड जोशात आले होते. देशभरातील अनेक ठिकाणी मीठाचे सत्याग्रह झाले. ज्याठिकाणी समुद्र किनारा आहे तिथे मिठाचा सत्याग्रह अन्य ठिकाणी जंगल सत्याग्रह अशी हाक गांधीजींनी दिली होती. सर्व आंदोलने अल्पावधीतच ब्रिटिशांनी मोडून काढली मात्र बिळाशीचे बंड कार्यकर्त्यांच्या हातून जनतेच्या ताब्यात गेले होते. देशभक्तीने बेभान होऊन गरिब, अशिक्षित, कष्टकरी, शेतकरी मिळेल तो तुकडा खाऊन निःस्वार्थीपणे यात सहभागी झाले होते. स्वार्थ इतकाच की ब्रिटिशांची राजवट जावून भारतभूमीने मुक्त श्वास घ्यावा. त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर!!
बिळाशीच्या या बंडाची खबर साता-याच्या डी एस पी पर्यंत पोहोचली. हे बंड दडपण्यासाठी डी एस पी ने कडक शिस्तीच्या बंकटसिंग या जिगरबाज अधिका-याला धाडले. १ आॅगस्ट १९३० रोजी बंकटसिंग ५० - ६० पोलिसांचा फौजफाटा घेऊन बिळाशीत दाखल झाला. पण प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी भक्कम बंदोबस्त ठेवला होता. ज्यावर तिरंगा फडकत होता त्या सागवानी सोटाला परिसरातील जनतेने उस्फूर्तपणे सभोवताली एकामागोमाग एक अशी सहा कडी केली होती. पोलिसांच्या दंडुकशाहीला कोणीही भिक घालीत नव्हते त्यामुळे बंकटसिंग प्रचंड चिडला होता. अशात घोड्यांची उपासमार होऊ लागली व फौजफाटा पण चलबिचल झाला होता. या सर्वाला कंटाळून त्याने मोर्चा माघारी वळवला. आंदोलनाला हे मोठे यश मिळाले होते.
पण समोर काही नवीनच वाढून ठेवले होते. पावलेवाडी खिंडीतून मुंग्यांची रिघ लागावी अशी रिघ लागली होती. पण टप्प्यात येताच चित्र धक्कादायक होते. सुमारे ५०० - ७०० पोलिस जवान हे बंड मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने गुपचुप रवाना केले होते. मोटारींचा ताफा गावात घुसला. तुफान हाणामारी सुरू झाली. बेभान होऊन लोक पोलिसांशी दोन हात करत होते. मनात दृढनिश्चय आणि आत्मविश्वास होता. शेवटच्या क्षणापर्यंत लोक लढत होते. पोलिसांच्यापुढे प्रयत्न टोकडे पडत गेले. कित्येकांना जायबंदी करत ते नराधम शांत झाले. पोलिसांनी शस्त्रांच्या मदतीने हे बंड दडपले.
गावात धाक निर्माण व्हावा म्हणून पोलिसांच्या तुकडीने संचलन केले. संचारबंदी लागू केली. काही निवडक पोलिस बंदोबस्त ठेवून गाड्या शिराळ्याच्या दिशेने निघाल्या. ते देशभक्तीने झपाटलेले क्रांतिकारक होते इतक्यात हार माननारे नव्हते. अचानक पोलिसांच्या ताफ्यापुढे रस्त्यावर मोठ मोठे दगड पडू लागले.
टेकडीवरून दोन तरणीबांड मिसरूटही न फुटलेली पोरं पोलिस गाड्यापुढे दगडफेक करत होती. बंड मोडत विजयाने बेभान झालेला फौजदार बंकटसिंग रागाने लालबुंद झाला. बंदुका त्या तरण्याबांड पोरांकडे रोखल्या गेल्या. क्षणात गोळ्या सुटल्या... धाड धाड करत त्यांनी पोरांचा नेम टिपला.... रक्ताचे कारंजे उडाले..... हिरवा शालू नेसून नटलेल्या माऊलीने लालभडक मळवट भरावा असे भारतमातेचे हृदयद्रावक दृश्य मावळतीच्या सूर्याने टिपले.
भारतमातेसाठी हुतात्मा झालेले हे वीर होते... मांगरूळचे धोंडी संतू कुंभार आणि शंकर भाऊ चांभार... निर्दयी फौजदाराने या युवकांचे मृत्यदेह अमानुषपणे गावापर्यंत फरकटत नेले....पुन्हा गावात ध्रुमचक्री उडाली... ३९ प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाली.. धग कायम ठेवत हे बंड शांत झाले.... पण भारताच्या स्वातंत्र्यालढ्याला दिशा देवून गेले....
देशासाठी प्राण देणा-या त्या हुतात्मांना व क्रांतिकारकांना सलाम!!
लेखन - अमर पाटील करमाळे ९५५२८८१५३५
Comments
Post a Comment