ताईसाहेब....!

रक्ताच्या नात्यापलिकडची नाती कशी निर्माण होत असतील? वर्षांनुवर्षे कशी टिकत असतील? मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनाही या प्रश्नाचे नेमके उत्तर देता येईल की नाही, याची शंका आहे.... 
‘आई’, ‘ताई’, ‘माई’ या तीन मराठी शब्दांचे आणि त्या शब्दांमागील अर्थाचे जगातील कोणत्याही भाषेत भाषांतर होणार नाही, असे हे हृदयाला भिडणारे शब्द आहेत. ‘आई’, ‘ताई’, ‘माई’ या शब्दांना पर्यायी शब्दच नाहीत. प्रतिभाताई त्यातीलच एक ‘ताई’ आहेत. 
प्रतिभाताई पाटील यांच्याकडून ‘मधुभाऊ’... ही हाक माझ्या कानावर पहिल्यांदा पडली... त्याला आता ६० वर्षे झाली. हे नातं ताईंनी टिकवलं, जपलं... आणि माझ्यासारख्या एका छोट्या पत्रकाराला... पत्रकार म्हणून नव्हे... ‘भाऊ’ म्हणून स्वीकारले.  राखीपौर्णिमा जवळ आली की, ताईंची ती ‘मधुभाऊ’ ही हाक कानात आपोआप ऐकू यायला लागते. बघता-बघता ६० वर्षे झाली. 
काळ कसा सरकतो... हे काळालाही समजत नसावं. इतका त्याचा वेग आहे. १५ मार्च, १९६२ ला विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. १९५८ साली पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावर शिव छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले होते. त्यावेळी पसरणीच्या घाटात त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना सांगितले होते,... ‘जर, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण केले नाही तर १९६२ च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळवून देणे मला कठीण आहे.’ पंडितजींनी विचारले होते, ‘आणि जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य दिले तर...?’ यशवंतराव म्हणाले होते की, ‘काँग्रेसला बहुमत मिळवून देण्याची माझी जबाबदारी...’ १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.  १९६२ मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा  निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात काँग्रेसला बहुमत मिळाले. खान्देशातून एदलाबाद मतदारसंघातून उच्च शिक्षित प्रतिभाताई पाटील महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून आल्या. त्यानंतर विधानसभेच्या पाच निवडणूका, १९९१ ची अमरावतीची लोकसभा निवडणूक  जिंकून त्या खासदारही झाल्या. राष्ट्रपतीपदावर विराजमान होईपर्यंत राजकीय जीवनातील एकही निवडणूक त्या पराभूत झालेल्या नाहीत. अशा या ताई... विधानसभेत पहिल्यांदा निवडून आल्या. पत्रकार कक्षात मी बसलेलो होतो. त्यांची आणि माझी ओळखही नव्हती. विधानसभेचे अिधवेशन सुरू झाले. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. आज ज्या बेळगाव-कारवार सीमा भागाची आठवण महाराष्ट्राला राहिलीही नाही, त्या विषयावर त्या दहा-वीस वर्षांत अनेकवेळा विधानसभेचे काम बंद पडले होते. त्याच विषयाची चर्चा सुरू होती. यशवंतराव उत्तर देत होते. वारंवार सांगत होते की, ‘आमच्या सरकारच्या वाटा घाटी म्हैसूर सरकारशी चालू आहेत....’ (तेव्हा कर्नाटक राज्याला म्हैसूर राज्य म्हणत होते.) यशवंतरावांनी पाच ते सात वेळा.... ‘वाटा- घाटी’, ‘वाटा-घाटी’ या शब्दाचा उच्चार केला. ताई तेव्हा शेवटच्या बाकावर बसत होत्या. त्यावेळच्या आमदार महिलांची संख्याही हातावर मोजण्याएवढीच असायची. ताईंनी हात वर करून प्रश्न विचारला... ‘अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री ‘वाटा-घाटी,’ ‘वाटा-घाटी,’ सतत सांगत आहेत, माझा प्रश्न असा आहे की, या वाटा घाटीमध्ये ‘वाटा’ कुणाला मिळणार आणि ‘घाटा’ कोणाचा होणार?’ 
पहिल्या प्रथम निवडून आलेल्या आमदार.... त्यात स्त्री आमदार.... मुख्यमंत्री यशवंतराव... सारे सभागृह चपापले... यशवंतरावांनी मागे वळून पाहिले... आजही यशवंतरावांच्या डोक्यावरची ती टोकदार टोपी मला आठवते आहे... दुसऱ्या दिवशीच्या ‘मराठा’ मध्ये मी ताईंचा फोटो टाकून बातमी केली.... मुख्यमंत्र्यांना प्रश्न... ‘वाटा’ कुणाला आणि ‘घाटा’ कुणाचा? ती बातमी वाचल्यानंतर दोन दिवसांनी लॉबीमध्ये ताईंची भेट झाली. ती पहिली भेट... पहिल्या भेटीत त्यांनी हाक मारली ती ‘मधुभाऊ’ म्हणून.... तेव्हापासून ६० वर्षे आज त्याच नावाने ताई हाक मारतात. त्याच प्रेमाने बोलतात.... आणि अनेक वर्षे प्रेमाने राखी बांधतात. हे नातं त्यांनी टिकवलं... जपलं... त्यांचे सगळेच राजकीय आयुष्य असे आत्मियतेचं, प्रत्येक गोष्ट मनापासून जगलेलं.. आणि राजकारणात ६० वर्षे वावरताना.... राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचताना, त्यांच्या त्या आत्मियतेच्या वागण्यातूनच त्यांनी कधीही मागे वळून बघितलेले नाही... ५ वर्षे आमदार.... मग उपमंत्री, मग कॅबिनेट मंत्री. मंत्रीपदाच्या या १५ वर्षांच्या काळात त्यांच्याकडील प्रत्येक खात्यावर त्यांचा ठसा उमटला आहे. सभागृहात पूर्ण तयारीने येणाऱ्या ताईंची त्यावेळच्या दिग्गज विरोधकांकडून कधीही अडवणूक झाली नाही. मंडल आयोगाचा विषय जेव्हा जाहीर झाला त्यावेळी विधानसभेत रणकंदन झाले. वसंतदादा मुख्यमंत्री होते. पण, त्या गदारोळाला ताईंनी विधान परिषदेत दीड तासाचे दिलेले उत्तर एक दस्तावेज ठरलेले आहे. त्यावेळचे विरोधी पक्षनेते प्रा. ग. प्र. प्रधान यांनीही ताईंच्या उत्तराने समाधान झाल्याचे सभागृहात सांगितले. ते संपूर्ण भाषण एक वेगळ्या लेखाचा विषय आहे. दादांनीही ताईंचे अिभनंदन केले. 
१९७९-८०  विधानसभेत विरोधी पक्षनेत्या, मग राज्यसभा सदस्य, राज्यसभेच्या उपसभापती.... मग अमरावतीच्या खासदार... मग राजस्थानच्या राज्यपाल.... आणि २००७ साली देशाच्या राष्ट्रपती.... ५५ वर्षांचा हा प्रवास... अत्यंत निर्मळ, नितळ आणि प्रामाणिकपणे राजकारण करणारा.... एवढ्या मोठ्या राजकीय प्रवासात ताईंच्या डोक्यावरचा पदर कधी ढळला नाही.  पांढऱ्या स्वच्छ साडीवर सुईच्या टोकाएवढा डाग कधीही पडला नाही. नाही कधी विरोधकांकडून आरोप झाला.... नाही कधी निवडणुकीत अपयश मिळवले.  स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ मन... सामान्य माणसांबद्दलची बांधिलकी आणि राजकारणात वावरताना पदरात निखारा घेऊन चालल्या तरी त्यांचा पदर कधी पेटला नाही. आणि त्यांनी निखाराही विझू दिला नाही. अशा या ताई.... त्याकाळात कमलाताई बागल, कुसूमताई कोरपे, विमलताई रांगणेकर, यशोधरा बजाज, डॉ. सुशीला बलराज, अंजनाताई मगर, निर्मलाताई ठोकळ अशा अनेक भगिनी आमदार म्हणून चांगलं काम करत होत्या. विरोधी बाकावर मृणालताई गोरे, कुसुमताई अभ्यंकर अशा  दिग्गज कतृत्त्वाच्या आमदार होत्या. सर्वांचाच अभ्यास होता... डॉ. सुशीला बलराज आणि श्रीमती प्रभाताई राव या तर मंत्रीही होत्या. या सर्वच आमदार भगिनींमध्ये नंदादीपासारख्या तेवत राहिल्या त्या प्रतिभाताई.... आणि खूप पुढे निघून गेल्या त्याही प्रतिभाताईच. राजस्थानच्या त्या राज्यपाल झाल्या तेव्हा मुख्यमंत्रीपदी भाजपाच्या वसुंधराराजे होत्या. पण, कुठेही विसंवाद नव्हता. राज्यपाल झाल्यावर त्यांना लहानपणीची एक गोष्ट आठवली.... त्या आठ-दहा वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना विचारले होते... ‘बाबा, कलेक्टर मोठा की, राज्यपाल मोठा?’ त्यांच्या वडिलांनी प्रश्न केला... ‘तुला काय व्हायचे आहे?’ ताईंनी विचारले, ‘यात मोठा कोण?’.... वडीलांनी सांगितले, ‘राज्यपाल’. मग त्या लहानग्या बेबीनं (वडिल ताईंना बेबी म्हणायचे) उत्तर दिले की, ‘मग मी राज्यपाल होईन....’ राजस्थानच्या राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली त्या दिवशी त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली. त्यांचे डोळे भरून आले.... त्या राजस्थानच्या राज्यपाल असतानाच राष्ट्रपतीपदाची अब्दुल कलाम साहेबांची   मुदत संपत आली होती. २५ जुलै २००७ ला नवीन राष्ट्रपतींची निवड होणार होती. पंतप्रधान होते... मनमोहन सिंग.... त्यावेळच्या पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारमधील घटक पक्षांची बैठक सोनियांजींनी बोलावली. ‘राष्ट्रपती पदासाठी उमेदवार कोण’? अनेक नावांची चर्चा झाली. त्यावेळच्या पी.डी.एफ. सरकारमधील घटक पक्षापैकी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य कॉम्रेड बर्धन होते. त्यांनी प्रतिभाताईंचे नाव सुचवलं.... ते म्हणाले की, ‘या पदासाठी आपण एखाद्या भगिनीचा का विचार करू शकत नाही....’ सोनियाजींनी पटकन पाठींबा दिला... पण कोणतं नाव... बर्धन म्हणाले, ‘प्रतिभाताई पाटील’ एका क्षणात सगळ्यांचा पाठींबा मिळाला. आणि मग २००७ साली ‘भाजपाचे भैरवसिंग शेखावत विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा देवीसिंह शेखावत’ असा सामना झाला... तीन लाख मतांनी ताई जिंकल्या. पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. त्यांचे नाव नागपूरच्या एका कम्युनिष्ट नेत्याने सुचवले आणि महाराष्ट्रातून त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांना ‘मराठी भागिनीला शिवसेना आमदारांनी मतं देण्याची विनंती’ केली. बाळासाहेबांनी एका क्षणात त्याला मान्यता दिली. दोन वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील पुरोगामी आघाडी सरकारची, म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेच्या जवळीकीची सुरुवात २००७ साली राष्ट्रपतीपदाकरिता प्रतिभाताईंना पाठींबा देवून झालेली आहे. आज दुसरी महिला राष्ट्रपती झाली, त्याचा देशाला आनंद आहे. पण इितहासात आता कायमची नोंद झाली आहे... ‘देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती... प्रतिभा देवीसिंह शेखावत....’ 
ताई राष्ट्रपती झाल्यानंतर १३ नोव्हेंबर २००७ ला पहिल्यांदा अमरावतीला गेल्या... ‘हिंदुस्तान’ दैनिकाचे संपादक विलास मराठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘श्री अंबा महोत्सव’ साजरा करायचे ठरवले.... त्याच्या उद्घाटनाला राष्ट्रपती म्हणून ताई अमरावतीत आल्या. त्यांचं सासर अमरावतीचंच. अख्खं अमरावती शहर लोटलं. ... लाखो लोक घोषणा देत होते.... ‘प्रतिभाताई, आगे बढो.... हम तुम्हारे साथ हैं....’ ताई हसून म्हणाल्या.... ‘मैं इतनी आगे बढ चुकी हूँ, अपने देश में इसके आगे कुछ नही हैं.....’ आणि खरोखरच देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या एका मराठी भगिनीचा महाराष्ट्राला कायमचा अभिमान आहे. राष्ट्रपतीपदाच्या पाच वर्षांच्या काळात ‘राष्ट्रपती भवन’ खऱ्या अर्थाने ‘लोकभवन’ झाले होते. या पाच वर्षांत देशातील पाच लाख सामान्य माणसांना राष्ट्रपतींची भेट घेता आली होती. राष्ट्रपती भवनाचे दरवाजे जणू सर्व देशासाठी खुले झाले होते... 
प्रकृतीने कृष असलेल्या ताई मनाने किती खंबीर आहेत त्याचे दर्शनही त्याचवेळी त्यांनी घडवले. तिन्ही सेनादलांच्या प्रमुख असलेल्या प्रतिभाताईंनी त्या काळात सुखोई विमानात हवाईदलाचा वेष घालून सफर केली. वेग... आवाज.... हे सर्व धोके त्यांना समजावून सांगण्यात आले होते. पण मनाच्या निर्धाराने त्यांनी सर्वांवर मात केली. सुखोईतून प्रवास करणाऱ्याही त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या.... 
‘मधुभाऊ’ अशी प्रेमळ हाक मारणाऱ्या  ताईंबद्दल आज हे सगळे आठवत आहे... १९ डिसेंबर २०२२ ला ताई वयाची ८८ वर्षे पूर्ण करतील. निसर्ग नियमाने आलेला थकवा स्वाभाविक आहे... पण तरीही देशाची पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती झाली त्यांचे अभिनंदन करण्याकरिता २५ जुलै २०२२ रोजी ताई संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या पंतप्रधानांच्या शेजारी बसल्या होत्या. सगळ्या देशाने हे पाहिले. या घटनेचाही सगळ्यांना आनंद झाला. 
ताई मूळ खान्देशातील..... त्यांचे सासर विदर्भातील अमरावतीचे... श्री. देविसिंह शेखावतजी मूळचे प्राचार्य.... नंतर अमरावतीचे पहिले महापौर... आणि १९८५ चे अमरावतीचे आमदारसुद्धा.... राजकीय क्षेत्रातील कोणत्याही पतीचे कौतुक त्याच्या पत्नीला वाटचत असतेच.... पण शेखावतसाहेब पत्नीच्या मागे नेहमीच ठामपणे उभे राहिले. राष्ट्रपती पदापर्यंत ताई पोहोचल्या तेव्हा त्यांचाही ऊर आनंदाने भरून आला. आज शेखावत साहेब ९० वर्षांचे आहेत. ताई ८७ वर्षांच्या आहेत... राखीपौर्णिमेच्या निमित्ताने या दाम्पत्याला निरोगी १०० वर्षांच्या आयुष्याची प्रार्थना करु या...
ताई, तुमची ‘मधुभाऊ’ ही प्रेमळ हाक अजून खूप वर्षे ऐकायची आहे....

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*