कोणती पुण्ये येती फळाला....
मधुकर भावे
६१ वर्ष झाली असतील. तारीख आठवत नाही. मार्च १९६२ च्या विधानसभा अधिवेशनाचा तो काळ. विधानसभेच्या निवडणुका होवून गेल्या होत्या. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यामुळे १९५७ च कॉंग्रेस विरोधातल वातावरण यशवंतरावांच्या नेतृत्वामुळे निवळलं होतं. कॉंग्रेसला बहुमत मिळालं होतं. एकूण २६४ जागांपैकी कॉंग्रेसला २१५ जागा मिळाल्या. यशवंतराव पुन्हा मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब भारदे विधानसभा अध्यक्ष. कृष्णराव धुळप विरोधी पक्षनेते. एदलाबाद मतदारसंघातून (आताचा मुक्ताईनगर) श्रीमती प्रतिभाताई पाटील प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
त्या पदवीधर झाल्यानंतर त्यावेळचे नेते सोनूूसिंगआण्णा पाटील यांनी त्यांना राजकारणात येण्याच आग्रह केला (पुढे हेच सोनूसिंगअण्णा मोरारजी देसार्इंच्या मंत्रीमंडळात गृहराज्यमंत्री झाले होते.) सोनूसिंगआण्णानीच प्रतिभातार्इंना निवडणूक लढविण्यापूर्वी यशवंतरावांची भेट घ्यायला सांगितलं होते. यशवंतरावांची भेट झाल्यावर या सुविद्य भगिनीला यशवंतरावांनी कॉंग्रेस संबंधात काही प्रश्न विचारले, जवळपास दहा मिनीटे प्रश्न विचारत होते. ताई सांगत होत्या की, मी आताच पदवीधर झालेली आहे, राजकारणात यायची इच्छा आहे. आपणच एक निवेदन असे केलं आहे की, सुशिक्षितांनी राजकारणात यावं, यामुळेच मी आपणाला भेटायला आले, मी चांगले काम करीन एवढा शब्द देते. यशवंतराव हसले आणि तिकिट निश्चित झाल. (अलिकडच्या निवडणुकीत तिकीट वाटप करताना कोणत्याही पक्षाचे पक्षाचे ‘श्रेष्ठी- हायकमांड’ दोनच प्रश्न विचारतात-
१) तुझ्या जातीची मतं किती. २) तु किती खर्च करु शकशील. त्या उमेदवाराला पक्षाची माहिती असो वा नसो) ताबडतोब तिकीट दिलं, अशी तार्इंच्या राजकारणाची सुरुवात झाली. १९६२ च्या विधानसभेच पहिलचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पण.. बेळगाव-कारवार- निपाणी सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाला नाही. तो प्रश्न त्यावेळी खूप जिव्हाळ्याचा आणि महाराष्ट्राला भिडणारा होता. कृष्णराव धुळप यांनी तोच प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री यशवंतराव उत्तर देत होते. चार-पाचवेळा मुख्यमंत्री म्हणाले की,... ‘ आमच्या म्हैसूर सरकारशी ‘वाटा-घाटी’ चालू आहेत ’ चार-पाचवेळा ‘वाटा-घाटी’ शब्द आला. प्रतिभाताई त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या शेवटच्या बाकावर बसत होत्या. जुन्या विधानभवनात पत्रकार कक्षातून ते बाक दिसत नाही. प्रश्नोत्तराच्या तासात एक नाजूक आवाज सभागृहात घुमला... अध्यक्षांनी त्यांना प्रश्न विचारण्याला परवानगी दिली. आमदार झाल्यानंतरचा तार्इंचा तो पहिला प्रश्न... ‘अध्यक्ष महाराज, .. माननीय मुख्यमंत्री सांगत आहेत की, सीमा प्रश्नात आमच्या
‘वाटा-घाटी’ चालू आहेत.. माझा प्रश्न असा आहे की, या वाटा-घाटीत ‘वाटा’ कुणाला मिळणार? आणि ‘घाटा’ कुणाचा होणार...?’
प्रश्न विचारुन ताई खाली बसल्या. मुख्यमंत्र्यांनी बसल्या जागेवरुन, हाताची घडी घालून, प्रश्न विचारणाºया आमदाराकडे बघितलं... यशवंतरावांची ती टोकदार टोपी, काटकोनातली टोपी पत्रकार कक्षातून दिसत होती. विरोधी आमदारांनी बाकं वाजवली. तार्इंचा तो पहिला प्रश्न साºया सभागृहाच लक्ष वेधून गेला. सीमा प्रश्नात त्या वाटा-घाटी अजून चालू आहेत. फक्त त्या सुप्रिम कोर्टात गेल्या आहेत. महाराष्ट्राचा ‘घाटा’ तेव्हापासूनच झालेला आहे...
तार्इंचा तो पहिला प्रश्न. मी ‘मराठा’चा प्रतिनिधी म्हणून पत्रकार कक्षात बसत होतो. दुसºया दिवशीच्या ‘मराठा’त पहिल्या पानावर तार्इंच्या फोटोसह ती बातमी दिली... ‘दैनिक मराठा’ कॉंग्रेसच्या विरोधात, पण सीमाप्र्रश्नाच्या बाजूने. संपादक आचार्य अत्रे आमदार म्हणून विधानसभेत बसलेले. त्या बातमीची दुसºया दिवशी चर्चा झाली. दोन दिवसांनी विधानसभेच्या लॉबीत प्रतिभाताई समोरुन येत होत्या. खादीची पांढरी स्वच्छ साडी, डोक्यावरुन पदर, एक खानदानी भगिनी समोरुन येत होती. त्यांनी हळूच हाक मारली ... ‘मधुभाऊ’...
गेली ६१ वर्षे ताई त्याच नावाने मला हाक मारतात. भावाच नातं त्यांनी ६१ वर्षे जपलंं, का? कोणत्या जन्मीची माझी पुण्याई? ६१ वर्षे मी विचार करतोय. उत्तर सापडलेलं नाही, पण नातं टिकून आहे. या ६१ वर्षांत ताई आमदाराच्या उपमंत्री, कॅबिनेट मंत्री, अमरावतीच्या खासदार, राज्यसभेच्या खासदार, राज्यसभेच्या उपाध्यक्षा.. राजस्थानच्या राज्यपाल आणि २५ जुलै २00७ ते २४ जुलै २0१२ देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती... एदिलाबाद कुठे, राष्ट्रपतीभवन कुठे?.. ताई कुठून कुठे पोहोचल्या. पण या सगळ्या ६१ वर्षांच्या प्रवासात मी जिथ होतो, तिथच राहीलो. हातात लेखणी कायम राहीली, पत्रकारिता कायम राहीली. ताई खूप मोठया झाल्या. पण ६१ वर्षांत ‘मधुभाऊ’ या हाकेत त्यांनी कधीही बदल केला नाही. आजही तीच प्रेमळ हाक त्या मारतात.. पे्रमाने घरी बोलवतात.., मंत्री, राज्यपाल, राष्टÑपती असतानाही आणि आता कोणत्याही पदावर नसतानाही.. आता माजी राष्ट्रपती असतानाही... तीच गोड हाक.... मधुभाऊ.
ताई कुठून कुुठे गेल्या. पण त्यांच्या स्वभावात, पे्रमळपणात, पोषाखात, खानदानीपणात कशा कशाचा बदल झालेला नाही. महाराष्ट्र विधानमंडळात त्यावेळी फार प्रभावी स्त्री आमदार होत्या. अंजनाताई मगर, कुसुमताई कोरपे होत्या, विमलताई रांंगणेकर होत्या, चंपाताई मोकल, कुसुमताई अभ्यंकर होत्या, निर्मलाताई ठोकळ होत्या, प्रभाताई राव, मामी भुवड होत्या.. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे विरोधी बाकावरच्या १९७२ मृणाल गोरे, आणि नंतर विरोधी पक्षनेत्या झालेल्या मृणाल गोरे या सर्व भगिनी तार्इंच्या जवळपास समकालीन आमदार... पण या सगळ्यात उठून दिसणारं व्यक्तिमत्व तार्इंच होतं. त्यांनी कधी पक्ष बदलला नाही, राजकीय निष्ठा बदलली नाही, पोषाख बदलला नाही, डोक्यावरचा पदर कधी ढळला नाही. पदरात निखारा घेवून चालल्या. पदर पेटला नाही, निखारा विझला नाही. कोणत्याही निवडणुकीत त्या कधी पराभूत झाल्या नाहीत. मग त आमदारपदाची निवडणुक असो, खासदारपदाची असो नाहीतर राष्ट्रपतीपदाची असो... राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झालेला सामना तर.. काँग्रेसच्या सौ. प्रतिभाताई देवीसिंह शेखावत विरुध्द भाजपाचे भैरोसिंह शेखावत असा सामना झाला. ताई निवडुन आल्या. आणि गंमत म्हणजे त्यावेळच्या शिवसेनेच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने भैरोसिंह शेखावत या भाजपाच्या उमेदवाराला मते न देता कॉंगेसच्या उमेदवार प्रतिभाताई यांना मत दिली. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. (आजच्या आघाडी सरकार बीजं या भेटीत तर नसेल ना) या एकमेव राष्ट्रपती अशा आहेत की, ज्यांच्या राष्ट्रपती पदाच्या काळात देशातल्या दीड लक्ष सामान्य लोकांना राष्ट्रपतीभवनवर ताई भेटल्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात ताई २0 वर्षे आमदार, ३ वर्ष उपमंत्री, १५ वर्ष मंत्री.. आरोग्यमंत्री, अन्नपुरवठा मंत्री, सामाजिक न्याय मंत्री. कितीतरी खाती त्यांनी प्रभावीपणे सांभाळली. कोणाला त्यांच्याकडे बोट दाखवून एक आरोप करता आला नाही. ना आमदार म्हणून त्यांची कधी सभागृहात फजिती झाली, ना मंत्री म्हणून. ताई मूळापासूनच बुध्दीमान, शांत आणि विचारी. त्या स्वत: एम.ए.एम.एड आहेत. त्यांना डॉक्टर व्हायच होतं. पण जळगावमध्ये आर्ट खेरीज कोणतंही दुसºया शाखेचं महाविद्यालय तेव्हा नव्हतं आणि त्यांच्या आईवडीलांना आपल्या लाडक्या ‘बेबी’ला मुंबईला, पुण्याला पाठवायचं नव्हत, म्हण्ूान त्या आर्टस्कडे गेल्या.
लहानपणी त्यांनी वडीलांना प्रश्न विचारला होता.... ‘ नाना, कलेक्टर मोठा की, राज्यपाल’... आणि हा प्रश्न विचारणाºया ताई राज्यपालही झाल्या आणि राष्ट्रपतीही झाल्या. त्या राष्ट्रपती होताना त्यावेळच्या यु.पी.ए.सरकारच्या सुकाणु समितीचे सदस्य, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए.बी.बर्धन यांनीच ताईचे नाव सुचवले आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ते उचलून धरले, तेव्हा ताई राजस्थानच्या राज्यपाल होत्या. श्री. शरद पवार साहेबांनी त्यांना फोन करुन कळवले. मग सोनियाजी तार्इंशी बोलल्या. त्या क्षणाला ताई त्यांना म्हणाल्या.. ‘ ओ माय गॉड... केवढी मोठी जबाबदारी...’, तार्इंनी ती जबाबदारी पेलली. पाच वर्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात
(२५ जुलै २00७ ते २४ जुलै २0१२) त्यांनी सामान्य नागरिक असलेल्या दीड लक्ष लोकांना राष्ट्रपती भवनवार भेट दिली, असे पूर्वी घडले नव्हते. राष्ट्रपती झाल्यावर त्या पहिल्यांदा अमरावतीला आल्या होत्या. त्यांच्या स्वागताला लाखभर लोक जमले होते. ते हात उंचावून घोषणा देत होते.
‘प्रतिभाताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है।’ .. ताई म्हणाल्या. ‘ मै इतनी आगे बढ चुकी हूॅ की, अपने देश मे इसके आगे कुछ नही है।’... आणि ते खरच होतं. घटनेच सर्वोच्च पद हे राष्ट्रपती पद आहे. तीनही सेनादलांच्या त्या अध्यक्षा होत्या. आजपर्यंत कोणताही राष्ट्रपती कानठळ्या बसवणाºया ‘सुखोई’ विमानातून प्रवास करण्याची हिंमत करत नव्हता. (मात्र तार्इंच्या अगोदर राष्टÑपती असलेले अब्दुल कलाम साहेब हे सुखोईत बसलेले आणि या सगळ्या संशोधनाच्या कामात त्यांच तर केवढ मोठ श्रेय आहे) एअरफोर्सचा पोषाख घालून तार्इंनी त्या विमानातून उड्डाण केले. पण, ताईचे पाय नेहमी जमिनीवरच राहीले.
अचलपुरचे माजी आमदार सुदाम देशमुख यांना कॅन्सर झाला, या निष्ठावान कम्युनिस्ट नेत्याच्या सत्कार समारंभाला कार्यक्रमाच्या ताई अध्यक्षा होत्या. रा.सू.गवई यांचा पुढाकार होता. कॉम्रेड बर्धन आणि मी, नागपूर लोकमतचा संपादक असताना त्याच आयोजन केलं होतं. सुदाम देशमुख सत्काराला येवू शकत नव्हते. कारण त्यांच्या घशाला भोक पाडलं होतं. ते अत्यवस्थ होते. त्यांना मानपत्र देण्याकरीता ताई, गवईसाहेब, बर्धन आम्ही सर्व त्यांच्या घरी गेलो... अशा या ताई.
मंत्री म्हणून तार्इंनी विधानसभेत इतिहास घडवला. १९८३ साली मंडल आयोगाचा निर्णय आल्यानंतर महाराष्टÑ विधानसभेत हंगामा झाला. मुख्यमंत्री होते वसंतदादा. दोन दिवस चर्चा झाली. विरोधकांना ठोस आश्वासन हवी होती. ‘मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्याव’ अशी मागणी होती. दादा उत्तर द्यायला तयार नव्हते. कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली. उत्तर देण्याची जबाबदारी तार्इंनी घेतली. दोन दिवसांच्या चर्चेला अडीच तास, तार्इंनी चौफेर उत्तर दिलं. विधानपरिषदेत ग.प्र.प्रधानसाहेबांनी काही उल्लेख केले होते. त्याचा हवाला देवून ताई म्हणाल्या.... ‘ जगन्नाथ पुरीच्या मंदिरात या देशाचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले गर्व्हनर सर लॉर्ड माउंट बॅटन यांना प्रवेश दिला गेला, त्यांच्यासोबत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर उभं करुन ठेवलं. ही वर्णव्यवस्था तुम्हाला मान्य आहे का?’ एका पाठोपाठ तार्इंनी असे तडाखेबाज प्रश्न विचारले. विरोधक निरूत्तर झाले. सगळ्या बाजूनी बाके वाजली. दादांनी तार्इंच अभिनंदन केले. असे किती किस्से सांगू.
या सर्व प्रवासात तार्इंना त्यांचे पती
प्रा. देवीसिंह शेखावत यांची सतत आणि जबर साथ मिळाली. यामुळेच हे शक्य झाले. स्वत: देवीसिंह अमरावतीचे पहिले महापौर आणि १९८५ साली विधानसभेत अमरावतीचे आमदारही होते. त्यांचे पुत्र रावसाहेबही अमरावतीचे आमदार होते. सर्वच कुटूंब राजकीय पण कमलदलसारखं..
अशा या ताई, मला ‘मधुभाऊ’ म्हणतात.. राखी पौर्णिमेला बोलावून राखी बांधतात, भाऊबीजेला ओवाळतात. मी कोण, कुठचा, अतिसामान्य. पण आयुष्यात हे जे काही मिळालं तोच माझा मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त सामाजिक बँक बॅलन्स आहे असं मी मानतो.
पंडित जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्रीजी, इंदिराजी... डॉ.लोहिया, ज्योती बसू, नंबुद्रीपाद, कॉम्रेड डांगे, एस.एम.जोशी, क्रातिसिंह नाना पाटील,उध्दवराव पाटील, यशवंत चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू आणि तिकडे कर्मवीर भाऊराव पाटील, बाबा आमटे आणि तुकडोजी महाराजसुध्दा... या सर्वांना पाहता आल, बोलता आल, मुलाखती घेता आल्या. आचार्य अत्रे यांच्याबरोबर १२ वर्षे छोटा सहकारी म्हणून ‘मराठा’त काम करताना आचार्य अत्रे यांच्या सोबत अनेकवेळा प्रवास करता आला,त्यांच्या ३०० सभा कव्हर केल्या. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा (बाबुजी) यांनी मला लोकमतचे संपादक केलं. श्री. शरद पवारसाहेब यांच्या घरी बाहेर मंडप टाकून भेट द्यायला आलेले अमेरिकेचे राष्टÑपती बिल क्लिंटन यांच्या स्वागताकरीता पवारसाहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात फक्त ५० जणांना परवानगी होती. त्या ५० जणांत पवारसाहेबांनी सर्वात छोटा असलेल्या मला आमंत्रित केलं आणि रजनीगंधा फुलांचा छानसा गुच्छ बिल क्लिटंन यांना द्यायला मलाच सांगितलं. हे कोणतं नशिब आहे? आणि कोणाची पुण्याई आहे?. माझी तर नक्कीच नाही. आई-वडीलांचीच असेल. देशाच्या माजी राष्टÑपती प्रतिभाताई ‘मधुभाऊ’ या नावाने हाक मारुन राखी बांधतात, भाऊबीज करतात आयुष्यात आणखी काय हवं.
ताई, या जन्मातच नव्हे, पुढचा जन्म जर असलाच तर तुम्ही अशाच मोठ्या व्हा, मला असच छोट राहू द्या. पण तुमची ती ‘मधुभाऊ’ ही हाक प्रत्येक जन्मात माझ्या कानावर पडावी. एवढीच आयुष्याच्या संध्याकाळी अपेक्षा.
Comments
Post a Comment