हा ‘निकाल’ कशाची सुरुवात...
मधुकर भावे
लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या २९ जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल लागले. भाजपासाठी ते धक्कादायक आहेत. हवा बदलते आहे. देशपातळीवर मोदी, शहा, महाराष्ट्राच्या पातळीवर देवेंद्र फडणवीस आणि चंपा यांचे खिसे कितीही मोठे असले तरी, त्यात आता हे निकाल मावत नाहीत. महाराष्ट्रात देगलूरची जागा ४0 हजार मतांच्या फरकाने जिंकली. महाराष्ट्र भाजपाची सगळी ताकद आणि सगळी आर्थिक शक्ती देगलूरात ओतली गेली. ‘देगलूरचं पंढरपूर करु’ अशी भाषा होती. झाल उलट.. अशोक चव्हाण आणि त्यांच्या टीममुळे मोठा विजय मिळाला. भाजपाचे हरलेले उमेदवार दाभणे २0१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून उभे होते, तेव्हा कॉंग्रेसच्या अंतापूरकर यांनी त्यांना पराभूत केले होते. सेना सोडून ते भाजपामध्ये गेले. मध्यंतरी आमदार अंतारपूरकर कोरोनामुळे स्वर्गवासी झाले. त्यांच्या मुलाने भाजपामध्ये गेलेल्या दाभणेंना पराभूत केले आहे. आता चंद्रकांत पाटील म्हणू शकतील की, ‘अशोक चव्हाणसारखे माझ्या खिशात आहेत...’ या लोकांचे खिसे किती मोठे आहेत याची कल्पना नाही. महाराष्ट्रात देगलूर पोटनिवडणुकीत कॉंगे्रस जिंकणारच होती, कारण नांदेडवर अशोक चव्हाणांची मजबूत पकड आहे. तिकडे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपाची आणखी एक जागा खेचून आणली. पण त्याहीपेक्षा भाजपाचे दोन सणसणीत पराभव असे आहेत की, भविष्य काळाची सगळी नोंद या पराभवांमध्ये आहे. त्यातला पहिला गुजरातमधला दादरा हवेलीचा पराभव. इथे तर शिवसेनेने महाराष्ट्राच्या बाहेर पहिला विजय नोंदवताना भाजपाच्या उमेदवाराला झोपवलं. गुजरातमधला हा पराभव २0२४ च्या निवडणुकीची झलक आहे. हिमाचलप्रदेशमध्ये ‘मंडीची जागा भाजपाकडून कॉंग्रेसने खेचणे आणि चार जागा हिमाचलप्रदेशमध्ये कॉग्रेसने मिळवणं हा दणका फार मोठा आहे. वातावरण बदलत आहे. पोटनिवडणुकीत निकालाला मर्यादीत महत्व असले तरी, मतदारांचा कल आता भाजपाऐवजी भाजपाविरोधात चालला आहे. सत्ताधारी भाजपाचे नेते लबाड आहेत, सगळी आश्वासन खोटी ठरली आहेत. डिझेल असो, पेट्रोल असो, घरगुती गॅस असो, सीएनजी असो... जीवनावश्यक कोणतीही वस्तू घ्या. २0१४ साली मोदी सत्तेवर आले तेव्हाचे भाव बघा, आजचे भाव बघा. या दोन भावांच्या याद्या फडणवीस आणि पाटलांनी त्यांच्या खिशात ठेवाव्या आणि प्रत्येक मुद्याला उत्तर द्यावे. करा त्या महागाईच समर्थन. मग लाटण हातात घेवून महिला कशा पळताभुई थोडी करतात ते बघा. आज मृणालताई, अहिल्याताई हव्या होत्या... विदर्भात बर्धन, सुदाम हवा होता. जांबुवंतराव हवे होते, भाजपाचं नशिब असं आहे की, प्रचंड प्रश्न असून विरोधकांकडे नेतृत्व नाही. आज अत्रेसाहेब आणि ‘मराठा’ असता तर सत्ताधाºयांना फाडून खाल्ल असतं. कॉंग्रेससाठी आज माधवराव शिंदे, राजेश पायलट आणि राज्यपातळीवर विलासराव देशमुख, पतंगराव कदम, राष्ट्रवादीसाठी आर.आर.आबा हवे होते आणि मनातली गोष्ट सांगतो, गोपीनाथ मुंडेसुध्दा भाजपासाठी हवे होते. महाराष्ट्राच्या भाजपाचे ‘खरे नाथ’ गोपीनाथ होते. फडणवीस , पाटील भाजपाला ‘अनाथ’ करतील. आज लोकांच्या मनात राग आहे. २0१४ साली मोदी सांगत होते की, प्रत्येकवर्षी २ कोटी रोजगार देवू, काय झालं त्या रोजगाराच? ८ कोटी लोकांना रोजगार मिळण्याऐवजी ८ कोटी लोकांचे रोजगार गेले. कोरोनाचे कारण देतात. पण अंबानी, अदानी कोरोनाच्या काळातच अधिक श्रीमंत झाले. देश विकायला काढला तो याच काळात. कोरोनाच्या मागे लपायला मोठी जागा आहे. विकासदर घटतोय, महागाई वाढतेय... दोन अब्ज डॉलरच कर्ज जागतिक बँकेकडून घेण्याची वेळ आली, गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएसटीला विरोध करणारे मोदीच होते. आता महाराष्ट्राचे कायदेशीररित्या मिळणारे ४0 हजार कोटी बुडवणारे मोदीच आहेत. बोलता का या विरुध्द फडणवीस आणि पाटील?.... कोरोनाची नावं घेतात. १0 महिन्यापूर्वी लिहीलं होतं. आज पुन्हा लिहीतो. मार्च २0२0 ला लॉकडाउन झाला. ३ महिने उशीर केला. कशाकरीता? मोदींचे खास मित्र डोनाल्ड ट्रम्प गुजरातमध्ये येणारे होते म्हणून हवाई प्रवासाला बंदी केली नव्हती. ते आले, त्यांना मोदींनी झोका दिला. त्या तीन महिन्यात परदेशातून ३५ लाख प्रवासी आले. त्यांच्या येण्याने देशाला धोका झाला, याची जबाबदारी कुणाची? कोणी बोलतयं का?... सामान्य माणसं हे फार बारकाईन पाहात आहेत. २0१४, २0१९ ची मोदींची जादू, भाजपाची जादू संपलेली आहे. लोकांना फार दिवस मूर्ख बनवता येत नाही. चार वर्षापूर्वी चर्चा होती. वाचक फोन करुन सांगायचा... ‘तुमचं सगळं बरोबर हो..... पण पर्याय काय?’ आता वाचक सांगतो....‘पर्याय मिळेल’. पहिलं यांना बाजूला करा, आणखी दोन वर्षांनी.. ‘कोणीही चालेल, पण हे नको...’ या निर्णयाला वाचक येतील. पोटनिवडणुकीच्या निकालाकडे या भूमिकेने पाहिले पाहिजे. मग उत्तर मिळतील..
महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर... एक गोष्ट स्पष्ट आहे की, २0२४ च्या देशाच्या राजकीय परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल. त्यासाठी तुमची सगळी भांडण बाजूला ठेवा. १00 कौरव, ५ पांडवसुध्दा एका विषयावर एकत्र झाले होते. (वयमं पंचाधिकम शतम्) भाजपाच्या पराभवासाठी महाराष्ट्राच्या आघाडी सरकारला हीच भूमिका घ्यावी लागेल. तरच... उद्याच परिवर्तन होईल. देशावरचं सगळ्यात मोठ राजकीय संकट भाजपा ठरतंय... एक काळ असा होता की, म्हणजे अगदी ५0 वर्षापूर्वीचा... कॉंगे्रेस विरोधात बडी आघाडी (१९७१), महाआघाडी (१९७७) सगळ्यांना एक व्हावं लागलं. याच आघाडीमधील पक्षांच्या चुकांमुळे- त्या चुकांमध्ये कॉंग्रेसही आहे- आज देशावर ही वेळ आली. ‘५0 वर्षापूर्वी कॉंग्रेसविरुध्द सगळे पक्ष’ एक झाले होते. ‘५0 वर्षांनंतर भाजपाविरोधात सगळ्या पक्षांनी’ एकत्र येण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र आणि बंगाल या लढाईचं नेतृत्व करतील. बंगालमध्ये त्या वाघिणीचा छळ केला. मोदी आणि भाजपाला ती पुरून उरली. कालच्या पोटनिवडणुकीतही बंगालच्या चारही जागा वाघिणीनं जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत तिला पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. पोटनिवडणुकीत तिनं हिसका दाखवला. कॉंग्रेसकडून उसने लोक घेवून भाजपा मजबूत होवू शकणार नाही. आता कितीही पैसा ओतला तरी ते शक्य नाही. लोकांना सर्व काही समजलं आहे. शंभर अपराध भरेपर्यंत लोक वाट पाहत राहतात. त्यात १0 वर्षे गेली. आता ना ‘मन की बात’, ना ‘दिल कि बात...’ आता ‘सीधी बात नो बकावास... ’ कामाला येणार नाही. बकवास म्हणजे काय लोकांना कळून चुकलयं.. फक्त महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी थोडं शहाणपणानं वागावं, तर पुढच्या राजकारणात कशी मजा येते ते बघा. २0१९ ला कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे जे नेते भाजपामध्ये गेले, त्यांची हालत काय आहे, त्याची चौकशी करा. भास्करराव खतगावकरांना भेटा. तपशीलात ते सांगतील. माझे मित्र आणि एक चांगला माणूस हर्षवर्धन पाटील यांना कॉंग्रेसने भरभरुन दिलं, पण बुध्दी फिरली. भाजपामध्ये गेले... थोडे दिवस थांबा.. खरी मजा आता सुरु होईल. नांदेडच्या टोकाचे भास्करराव आणि पश्चिम महाराष्ट्राच्या या टोकाचे पिचड असोत नाहीतर आमचे विजयसिंह मोहिते असोत, लक्ष्मणराव ढोबळे असोत.. कॉंग्रेस- राष्ट्रवादीने त्यांना जेवढे सन्मानित केले. आता भाजपावाले ‘पंचायत समिती सभापती’ तरी करतात काय ते बघा.... सगळ्यांची अवस्था अशी होईल... शेवटी राष्ट्रीय निष्ठा आणि पक्षनिष्ठा यातूनच व्यक्तिमत्व तयार होतं. पळापळी करुन होत नाही, हेही आता सगळ्यांना समजेल. एका पक्षात विचारपूर्वक राहून त्या राजकीय निष्ठेने पद मिळाल नाही तरी प्रतिष्ठा मिळते. पळी-पळी करुन मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद मिळालं तरी त्याची प्रतिष्ठा राहत नाही. उध्दवराव पाटील, एन.डी.पाटील, गणपतराव देशमुख, ए.बी.बर्धन सत्तेमागे धावले नाहीत. पद मिळाली नाहीत पण ज्यांनी पळापळी केली. त्यांना उध्दवराव, एन.डी. यांच्यासारखी प्रतिष्ठा आहे का? ते आरशात बघा. सध्या ऐवढेच.
Comments
Post a Comment