बदललेल्या युगात खळ्यातली मळणी रस्त्यावर आली.
चिखली (मनोजकुमार मस्के) :
पूर्वी शेतातील पिकापासून धान्याची रास करण्यासाठी शेतकरी शेतात खळे करत असे. हेच त्याचे धान्य मळणीयंत्र होते. यांत्रिकीकरणामुळे काळाच्या ओघात हे खळे गायब झाले आहे. हल्ली खळ्यावरील मळणी ही रस्त्यावर आली आहे. पारंपारीक पद्धतीची खळी आता दिसेनाशी झाली आहेत. शिराळा तालुक्यात सर्व ठिकाणी लोकांनी रस्त्यावर भातमळणे पसंत केले आहे. यामुळे अपघाताचे धोके मात्र वाढले आहेत. समोरून आलेल्या वाहनाला साईट देण्यास सुद्धा जागा शिल्लक नसते .
पुर्वी सुगीचे दिवस आले की शेतकरी खळे काढत असे. शेतातील एका कठीण गोलाकार आकाराचे व मध्ये लाकडाचा खांब (तीवडा) रोवलेले खळे असायचे. त्याच्याभोवती गोलाकार आकारात असणारे खळे झोडपून सपाट केले जायचे व शेणाने सारवले जायचे. असे या खांळ्यावरती शेतकरी आपल्या धान्याची मळणी करत असत. याच खळ्यावरती भाताच्या राशी लागत असेत. तिवड्याला दावणीची जनावरे बांधली जायची. जनावराच्या साह्याने भात मळणी केली जात होती. या प्रक्रियेला वेळही लागत असे, आणि माणसेही लागत असे. परंतु काळ जसा बदलला तसं खळ्यांचे रूपांतर हे डांबरी रस्त्यावर आले. जनावरांची मळणी यंत्राने होऊ लागली.
हल्ली शेतीची बहुतेक कामे यंत्राने होऊ लागली. यामुळे शेती काम करणाऱ्या बैलाची संख्या देखील कमी झाली आहे. यंत्रांमुळे शेतकऱ्यांची श्रम करण्याची सवय मोडली आहे. पाळीव बैलांना शेतीची विविध कामे येत असत. आता हे पारंपरिक खळे कोकन भागात कुठेतरी तुरळक दिसत आहे.
चौकट
खळ्यातलं भात रस्त्यावर आलं, नव्हे शेतकरीच आता रस्त्यावर आला . किती केलं तरी ते पुरतच नाही... पुरणार कसं माणूस माणसातच नाही उरलं. कीतीही केलं तरी पुरतच नाही अशीच काही अलिकडे शेतीची गणितं झालेली आहेत. पुर्वी असं नव्हतं माणसं सुपानं दुसऱ्याला देत होती. भाताच्या रासीला किंमत होती. रास भरताना नियम होता. कुठं बी भात मळलं जात नव्हतं. मग आता सांगा गरीबी तेंव्हा होती का श्रीमंती आत्ता आहे. काळ कितीही पुढं गेला तरी फिरून परतच यावं लागणार हे मात्र खरं आहे.
- एक परंपरा जपणारा शेतकरी
Comments
Post a Comment