ऐरणी चे घाव आता कारागिरांच्या पोटावर
चिखली - मनोजकुमार मस्के
सध्या शिराळा तालुका सह सर्वत्र सुगीचे दिवस चालू आहेत. शिराळा तालुक्यातील अनेक खेडेगावात औजारे बणिवणारे गाडी लोहार आले आहेत. ग्रामीण भागात शेतीसाठी लागणारी अवजारे पुरवण्याचे एक घटक म्हणजे लोहार व घिसाडी कारागीर असतात. ज्या गावांमध्ये लोहार कारागीर नाहीत अशा गावांमध्ये हे गाडीलोहार आपला मुक्काम ठोकून त्या गावातील शेतीला लागणारे अवजारे बनवून देण्याचे काम करत असतात. गेल्या दोन वर्षापासून कोरणा आजारामुळे हाताला काम मिळत नव्हते. सध्या पाऊस काळ चांगला झाल्याने व कोरोणा रोगाचे संकट दूर झाल्याने यांच्या हाताला काम मिळत आहे.
सध्या शेतीसाठी लागणारे अवजारांचे कारखाने उभे राहिले. या कारखान्यातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात आहे. कारखान्यात तयार झालेली अवजारे थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचू लागली आहेत. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने तसेच जुन्या तंत्रज्ञानाच्या जोरावर काम करणारे लोहार व घिसाडी कारागिरांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. कारखान्यात तयार झालेली अवजारे घेण्याची ज्या शेतकऱ्यांची आर्थिक ताकद नाही, असे शेतकरी आजही लोहार कारागिरांकडून अवजारे तयार करून घेत आहेत. शेताची मेहनत करून घेत असताना शेतकरी वापरत असलेल्या कुळवा चे फास, लाकडी बैलगाडीच्या धावा, विळा, खुरपे, कुऱ्हाड, कोयता आधी शेतीशी संबंधित वस्तू बनवणे. त्यांना धार लावणे तसेच मजूर लोकांना लागणारी खोरी, पार, टिकाव, आधी साहित्य शेवटने याशिवाय घरी वापरात येणारी काठवट, रवी, उलथणे, पक्कड आदी वस्तूंचे ही उत्पादन हे बारा बलुतेदार कारागीर करीत असतात.
या सगळ्या संसार उपयोगी साहित्य यांचेही आता उत्पादन कारखान्यात मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने या लोहार कारागीरांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे लोहार समाज मात्र अंधाराच्या खाईत लोटला आहे.
चौकट-
आता आमच्या हाती केवळ जुन्या अवजारांची दुरूस्ती धार लावणे शेवटचे एवढीच कामे राहिली आहेत त्यामुळे आम्हा लोहार कारागिरांची परवड वाढली आहे आमचे जीवन सध्या पुरते मेटाकुटीस आले असून ऐरणीचे घाव आता थेट आमच्या आयुष्यावर वसत आहेत दोन वर्ष झाली कोरणा मुळे आमच्या हाताला काम नाही आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
- एक लोहार कारागीर
Comments
Post a Comment