रविवारची संध्याकाळ आपली नव्हती, हा खेळ आहे, हार-जीत होणारच!
रविवारची संध्याकाळ आपली नव्हती, हा खेळ आहे, हार-जीत होणारच!
मधुकर भावे
टी-२0 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव होईल, असे जवळपास कोणी मानत नव्हते. ज्या पध्दतीनं पराभव झाला तसा पराभव अपेक्षितही नव्हता. यापूर्वी अशा टी-२0 विश्वचषक स्पर्धेत १0 विकेटने तीन संघांनी विजय मिळवलेला आहे. पण धावसंख्या १२0च्या आत होती. १५0 च्या पुढील धावसंख्या गाठून १0 विकेटने पराभव हा विश्वचषक स्पर्धेतला विक्रम ठरला आहे. मी खूप लहानपणापासून क्रिकेट खेळायचो आणि बॅडमिंटन वयाच्या ६0 वर्षांपर्यंत खेळत होतो. या दोन्ही खेळांमध्ये खूप मजा आहे, कौशल्य आहे, खेळाचा आनंद आहे. विश्वचषक स्पर्धा सुरु झाली त्याआधी आयपीएल झाली. पण ती स्पर्धा निव्वळ ‘टाईमपास’ आहे. कुणीतरी, कोणालातरी विकत घ्यायचे आणि त्यानंतर खेळवायचे. शिवाय तो खेळ असा की, कोहलीला (बंगळुरु) भवुनेश्वर कुमारने (हैद्राबाद) बाद केले तर भुवनेश्वरकुमारने टाळी वाजवायची. विश्वचषक स्पर्धा तशी नाही. शिवाय यापूर्वीच्या एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा (सुरुवातीला ६0 षटकांची होती, १९७५, १९७९ लागोपाठ दोनवेळा वेस्टइंडीजने जिंकली.) त्यानंतर ५0 षटकांचा स्पर्धा सुरु झाली. पाच दिवसांच्या कसोटी मालिकेपेक्षा ही अधिक रंगतदार मालिका आहे, कमी वेळात आहे त्यामुळे लोकप्रिय झाली. मग आणखी एका शहाण्याला आणखी एक कल्पना सुचली ५0 षटकाऐवजी २0 षटकांवर आले. पुढच्या महिन्यात १0 षटकांची मालिका होणार आहे. आयपीएलमध्ये सुपर लीगला एका षटकाची मालिका होतेच आता एक चेंडूची मालिका न होवो म्हणजे मिळवले.
गंमतीचा भाग सोडून द्या. या स्पर्धेला आपण ‘जागतिक स्पर्धा’ म्हणतो, त्यात जगातल्या एकूण १९५ देशापैकी जेमतेम दहा देश यात खेळतात आणि ती जागतिक मालिका होते. जसं हल्ली कोणत्याही गावातला स्विमिंग पूल याची जाहिरात ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचा’ अशी केली जाते. तसंच या स्पर्धेच आहे. जगात फुटबॉल खेळणारे देश ७0 टक्के आहेत. भारतात बंगाल सोडला तर अन्य राज्यात फुटबॉल इतका लोकप्रिय नाही. सध्या क्रिकेटचा हंगाम आहे. या जागतिक स्पर्धेत ज्यांना क्रिकेट फारस कळत नाही, आवडही नाही, अशा बहुसंख्य लोकांना फक्त एवढच वाटत की, जागतिक स्पर्धेतला अंतिम सामना हरला तरी चालेल पण पाकिस्तानविरुध्दचा सामना जिंकलाच पाहिजे, या भावनेचा खेळाडूपणाशी काहीही संबंध नाही. ही जी राजकिय भावना वाढलेली आहे, त्यातूनच क्रिकेट न समजणारेही या भावनेने पछाडलेले असतात. आमच्या घरात एक मावशी काम करतात, त्या कोकणातल्या आहेत. क्रिकेट काही समजत नाही. कधी सामना बघितलाही नाही, पण सोमवारी कामावर आल्यावर त्या मावशीनी काय म्हणाव... ‘बाबा, काल हरलो... पाकिस्तानविरुध्द तरी जिंकायला हवं होतं...’
अशी ही गंमत...
पण, आपण का हरलो, रविवारचा दिवस पाकिस्तानी संघाचा होता.टॉस हरलो म्हणून सामना हरलो असे अनेक तज्ञांना वाटत. मयांक, अश्विन, शार्दूल ठाकूर यांना घेवून शमी, चक्रवर्ती, भुवनेश्वर यांना बाहेर ठेवायल हवं होतं... एक की दोन... क्रिकेटच्या खेळातील तज्ञ मंडळी म्हणजे आमचे व्दारकनाथ संझगिरी किंवा सदा चिरतरुण आमचा शिरीष कणेकर... दोघेही खरोखरच क्रिकेटचे तज्ञ. शिरीष तर क्रिकेट आणि संगीत या दोन्ही विषयात. या दोघांनी त्यांच्या भावना लेखातनं व्यक्त केल्या. पण, हा खेळ आहे. एक दिवस त्यांचा असू शकतो, एक दिवस आपला असू शकतो. आॅस्ट्रेलियामध्ये गेल्यावर्षी १९ डिसेबंर २0२0 ला ५0 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचे सर्व गडी फक्त ३६ धावांत बाद झाले होते. तेव्हाही टीकाकारांची झोड उठली होती. नंतरचे सर्व सामने आपण जिंकले. मग, शमी असो, बुमराह असो, पतं असो, सगळ्यांना डोक्यावर घेतले. आपल्या रसिक प्रेक्षकांना समतोल साधता येत नाही. १९७१ साली वाडेकरच्या संघाने इंग्लडला इंग्लंडमध्ये पहिल्यांदा हरवलं. तर वाडेकर आणि त्याची बॅट इंदूरमध्ये स्मारक म्हणून उभी राहीली. पुढच्या सामन्यात आपण हरलो. तर लोकांना राग अनावर झाला म्हणे, त्यांनी त्या स्मारकाची बॅट तोडून टाकली. आपण एकतर या टोकाचे नाहीतर त्या टोकाचे. कोणताही जो खेळ आहे. तो खेळ या भावनेनेच पाहिला पाहिजे. आता राहीलेल्या सामन्यात आपण उसळून खेळलो तर हेच लोक पुन्हा सगळ्यांना डोक्यावर घेतील.
पूर्वी आपल्याकडे वेगवान गोलंदाज नव्हते. आज कोणाला खरे वाटणार नाही. ४0 वर्षापूर्वी मुंबईच्या कसोटी सामन्यात नव्या चेंडूच पहिल शतक कर्सन घावरीनं टाकल्यावर, दुसºया एंडनं षटक टाकायला आपल्याजवळ वेगवान गोलंदाज नव्हता. म्हणून हे षटक सुनील गावस्कर यानं टाकलं होते. फाळणीपूर्वी आपला वेगवान गोलंदाज फजल महम्मद, फाळणीनंतर दत्तू फडकर, १९६0 च्या दशकात रमाकांत देसाई, नंतर घावरी... कपिल देव आला आणि सगळं चित्र बदललं. आता तर आपल्याकडे चार-चार वेगवान गोलंदाज आहेत. पण, चंद्रशेखर, बेदी, प्रसन्ना, व्यंकट अशी चौकडी आता पुन्हा होणार नाही. भागवत चंद्रशेखर तर इंग्लडच्या अंडरवूड सारखा जवळपास मध्यमगती वेगाचाच गोलंदाज होता.
विश्वचषक स्पर्धा रंगात आलीय. नवे नवे संघ प्रभावीपणे खेळताहेत. अफगाणिस्तान चार-पाच वर्षात महत्वाचा संघ होईल.
रविवारचा सामना आपण हरलो, कोहलीच्या चेहºयावर तणाव होता. बाबर आझम तणावरहीत वाटला. कोहलीचा घेतलेला झेल विकेटकिपरचा नव्हता. जणु पहिल्या स्लिपमध्ये व्हिकेटकिपर उभा आहे, अशा थाटात रिझवानने झेल घेतला. रविवारचा दिवस त्यांचा होता म्हणून ते जिंकले असं रोज होत नाही, असं आता समाधान मानूया. सामना संपल्यावर खूप गंमती झाल्या. कोहलीनं बाबरला मारलेली मिठी खूप मोकळी वाटली, त्यात खिलाडूपणा होता. जे प्रेक्षक नाराज झाले ते स्वाभाविक होतं. पण सामना न बघणाºया आणि निकाल लागल्यावर खूप छान गंमती करणाºया नागरिकांची तर कमालच होती. सोशलमिडीयावर तर धमालच आली.
सामना संपल्यावर मोदींचा कोहलीला फोन आला...
मोदी : विराट, वो कितने आदमी थे
विराट : ‘सरदार वो दो आदमी थे’
मोदी: ‘वो दो और आपने ग्यारह’
विराट : सरदार, वो दो खेले, हम दस खेले...
आणखी एक मित्र म्हणाला की, हरल्याच दु:ख नाही. हजार रुपयांचे फटाके आणून ठेवले त्याच दु:ख आहे. अशा प्रकारच्या विनोदांनी तणाव हलका होतो हे नक्कीच.
पुढच्या राहीलेल्या सामन्यात भारत रविवारची जखम भरुन काढेल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे. बघू या काय होतय ते.... पण समजा... पराभव झाला, तरी प्रत्येक स्पर्धेत आपणच जिंकलं पाहिजे असं कसं मानून चालेल. ज्याचा खेळ उत्तम होईल तो जिंकेल. हा सांघिक खेळ आहे. तीनही क्षेत्रात जो संघ सरस तो जिंकणार.... जिंकण आणि हरण... एक जिंकणार, एक हरणार... काहीस निवडणुकीसारखच आहे हे. मनाला फार लावून घ््यायच नाही. शिरीष कणेकरला सांगण आहे. तुझ शेवटच वाक्य आहे. ‘दारुण पराभवाची सलं, फार काळ उरात राहील....’ अरे मर्दा, तुझ उर एवढं नाजूक ठेवू नकोस, तुला अजून खूप चांगल लिहायचं आहे. रोजचा दिवस वेगळाच असतो. तुझ्याच लेखणीतून ते वाचायला मिळेल....
आता माझी सल गेली.... शाब्बास रे पठ्यांनो...आपल्या खेळाडूंना हिंमत द्या. जिंकले तर फारच छान, समजा हरले, पण लढून हरले तरीही छान. हा खेळ आहे एवढ लक्षात ठेवा.
Comments
Post a Comment