नाना, औषध कडू आहे, पण... मधुकर भावे
मधुकर भावे
नानाजी, प्रदेश कॉंग्रेस कार्यकारीणीची दुसरी बैठक गुरुवारी झाली. तुम्ही अध्यक्ष झालेत, याच जागेवर लेख लिहून स्वागत केलं होतं. विधानसभेचे अध्यक्षपद सोडून- म्हणजे सत्ता सोडून- तुम्ही ‘आव्हान’ म्हणून अध्यक्षपद स्वीकारलत, याच स्वागत झालं होतं. विदर्भात तुम्ही चांगल यश मिळवलतं. महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस पक्षाला नवा चेहरा तुमच्यामुळे मिळाला, हे सर्व ठीकच झालं. पण नानाजी, गेल्या काही दिवसात काही गडबड होतय, काहीतरी चुकतयं, कोण चुकतयं, याच चिंतन होत नाही. दिल्ली चुकतेय की महाराष्ट्रात काही चुकतयं, याचही चिंतन होत नाही. आज तपशिलवार लिहायच ठरवलं. तो तपशिल तुम्हालाही माहित नसेल. तुम्ही सत्ता सोडून अध्यक्ष झालात. मागचा एक संदर्भ लक्षात ठेवा. १९६७ साली वसंतदादा पाटील यांनी आमदारकीच तिकीट नाकारुन बिरनाळे आप्पांना सांगलीतून विधानसभेत निवडुन आणलं. १९७२ ला प्राचार्य पी.बी.पाटील, हा अभ्यासू चेहरा दादांनी सांगलीतून आमदार केला. १९५२ ते १९६७ पर्यंत दादा सलग आमदार होते. पण १९६७ साली अध्यक्षपद स्वीकारताना दादांनी आमदारपद सोडलं. १९६७ च्या निवडणुकीत देशात ९ राज्यात कॉंग्रेसची सरकारं पराभूत झाली. पण महाराष्ट्रात वसंतराव नाईक मुख्यमंत्री, वसंतदादा पाटील प्रदेशाध्यक्ष. त्यांनी महाराष्ट्रात कॉंगे्रसचे २0२ आमदार निवडुन आणले. १९७२ साली २0२ चे २२२ झाले... आज आपण ४४ आहोत. तुम्हाला खूप मोठ पाणी कापायचं आहे. अशावेळी निर्णय चुकता कामा नयेत. तुमची जंबो कार्यकारीणी फार मोठं यश मिळवून देईल असं वाटत नाही. त्यातले ७0 टक्के लोक मिरवणारे आहेत. पुढच दिसतंय म्हणून लिहीतोय. कॉंगे्रसचा विचारच देशाला टिकवेल, या भावनेनं गेली ५0 वर्षे लिहीत आलोय. व्यक्तिगत राग, लोभ, प्रेम बाजूला ठेवलं. तुम्ही हे समजून घ्या. तुमच्या
आजू-बाजूचे कोणीही तुम्हाला हे सांगणार नाहीत. म्हणून लिहीणं आवश्यक वाटलं.
मराठवाड्याला कॉंग्रेसचा बिनीचा एकमेव कार्यकर्ता पापा मोदी कॉंगे्रस सोडून राष्ट्रवादीत गेला. कोणी विचार केला का? २0४ जणांच्या तुमच्या कार्यकारीणीत प्रत्येक जिल्ह्याची चर्चा होते का? ६ कार्याध्यक्ष, ३६ उपाध्यक्ष, ८१ जनरल सेक्रेटरी, कॉंग्रेसचे ४४ आमदार, एक खासदार, १0 कॅबिनेट मंत्री, २ राज्यमंत्री... २0२४ ची निवडणुक जवळ येतेयं. प्रत्येक जिल्ह्याच चिंतन कितीजण करु शकतील? का मागे पडतो आहोत? पापा ओबीसीचा चेहरा होता, अनेक संस्था, नगरपालिका त्यांच्या हातात.अशोक चव्हाण यांच्यानंतर मराठवाड्यात एवढा मोठा नेता तुमच्याजवळ कोण होता? त्याला विधानपरिषद नाही, राजीव सातव यांच्या अकाली दु:खद निधनामुळे राज्यसभेची जी जागा खाली झाली, ती जागा श्रीमती रजनीताई पाटील यांना दिली. विधानपरिषदेसाठी त्यांची शिफारस झालेलीच होती. त्या बीड जिल्ह्यातल्या. यापूर्वी कॉंग्रेसच्या खासदार होत्याच, त्यांना द्या, हरकत नाही. कॉंग्रेसचा एक आमदार तरी बीड जिल्ह्यात निवडुन येईल का? आणतील का? १९६७ ते १९९५ बीड जिल्हा कसा होता, का बिघडला? आज जिल्ह्यात कॉंग्रेसचा खासदार नाही, एकही आमदार नाही. संपूर्ण बीड जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे फक्त २ सदस्य, त्यातला एक राष्ट्रवादीत गेला. संजय दौंड. राहीले एक राजेसाहेब देशमुख तेच जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष, तेच एकमेव जिल्हा परिषद सदस्य. १९६७ साली सुंदरराव सोळंके यांच्यापासून पुढची २0 वर्षे हा जिल्हा कॉंग्रेसचा होता. टी.पी.मुंडे हा एक चांगला कार्यकर्ता कॉंग्रेसमध्ये सडला म्हणून भाजपामध्ये गेला, तिथेही सडलाच आहे. पण आज बीडमध्ये कॉंग्रेसचा नेता कोण? एक आमदाराला निवडुन आणेल, अशाच नाव काय? कार्यकारीणीतल्या कोणालातरी सांगता येईल का? तिच स्थिती कोकणातली. बीड जिल्ह्यात एकमेव नगरपरिषद कॉंगे्रसकडे होती, ती पापा मोदींची आंबेजोगाई. तीही गेली. पापाला थांबवता आलं नसत का? किती वर्षे त्यांनी सतरंज्या घालायच्या? विधानपरिषदेवर आतापर्यंत तुम्ही जेवढे घेतलेत, राज्यसभेत ज्यांना-ज्यांना पाठवलतं, त्यापैकी एकान तरी पक्षासाठी महाराष्ट्र घुसळून काढला का? यातला एकजण तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पक्षासाठी दौरा लावून फिरला का? लोकांचे ढिगभर प्रश्न पडले असताना, असे चुकीचे निर्णय केलेत तर पक्षाला त्याची मोठी किंमत द्यावी लागेल. पंढरपूरची पोटनिवडणुक आघाडीच्या उमेदवारानं गमावली. ठीक आहे, ती कॉंग्रेसची जागा नसेल. पण आता देगलूरसाठी किती ताकद लावावी लागते, अशावेळी एकेक चुकीचा निर्णय पक्षाला मागे घेवून जाईल. कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्या, त्याशिवाय पक्ष उभा राहणार नाही. दिल्लीवाल्यांनी तिथे चुकीचे निर्णय केले. ज्या कॅ. अमरिंदर यांनी दोनवेळा कॉंग्रेसला जिंकून दिलं, त्यांना बाजूला करण्याचा निर्णय शहाणपणाचा आहे का? बर, बाजुला केले तर, तिथे आणताय कोणाला? सिध्दू सरळ बॅटने बॅटिग करत होता, राजकारण म्हणजे क्रिकेट नव्हे, एवढ सोपं नाही. उद्या पश्चाताप होईल. तेही राज्य हातून जाईल, हे सांगायच कोणी? नाना, हे कोणीतरी बोललं पाहिजे. वाईटपणा पत्करुन, श्रेष्ठींना सांगितलं पाहिजे. आज कडू वाटेल, पण कडू औषध योग्यवेळीच द्यावं लागतं. तुम्हाला दिल्लीचे नेते भेटू शकतात. तुम्ही स्पष्ट बोलण्याची भूमिका घ्या, आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून इथे निर्णय करताना चुकीचे निर्णय करु नका. प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांना बाजूला करण्यात मोठी चूक झाली. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी ज्या अभ्यासाने कॉंग्रेसची बाजू मांडली. भाजपावाल्यांना निरूत्तर केलं होतं. वेळप्रसंगी कोर्टापर्यंत गेले. खूप अभ्यास आहे त्यांचा. मुद्दाम सांगतो की, माझी आणि त्यांची गेल्या ५-६ वर्षात फक्त २ वेळा भेट झाली असेल. एकदा शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात आणि एकदा अशीच प्रदेश कॉंग्रेसमध्ये. पण मी त्यांचं काम पाहात होतो. तुमच्या माहितीकरीता सांगतो. तुमचा हा निर्णय चुकला आहे. तुम्ही ज्यांना मुख्य प्रवक्ता केलतं, ते अतुल लोंढे माझे मित्रच आहेत. पण मुख्य-प्रवक्ते पदाचा त्यांचा आवाका नाही. मुंबईच्या प्रेसला सामोरं जाणं सोपं नाही. शिवाय जो प्रवक्ता व्यासपीठावर बसला, त्याचा ‘पुढारी’ झाला. त्यांना प्रवक्ता करा किंवा पुढारी करा दोन गोष्टी एकत्र जात नाहीत. राजीव सातव गुजरातचे प्रभारी असताना व्यासपीठावर बसत नव्हते, मिरवत नव्हते. पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभा, लोकसभा हा राजीवचा सगळा प्रवास माझ्यासमोर विलासरावांच्या साक्षीने घडलेला आहे, असा नेता आणि खरं म्हणजे कार्यकर्ता, आता होईल का?
नाना, शेवटचा मुद्दा
तुम्ही एवढी मोठी कार्यकारीणी केलीत. आता एक काम करा. ३६ उपाध्यक्षांना एक-एक जिल्हा वाटून प्रभारी करा. त्यांच्या मदतीला ८१ सरचिटणीसांपैकी ३-३ सरचिटणीस त्या-त्या जिल्ह्यात मुक्कामाला बसवा. कारण, ३६ उपाध्यक्ष प्रदेश कॉंग्रेसमध्ये एकाचवेळी आले तर त्यांना बसायलाही केबिन नाही. म्हणून या कार्यकारीणीला सांगा की, जिल्ह्यातच मुक्काम टाका, दोन वर्षे मेहनत घ्या. जशी भूपेश बघेल यांनी छत्तीसगढमध्ये घेतली. शिवाय, आपले जे १0 कॅबिनेट मंत्री आहेत, त्या १0 मंत्र्यांना ३-३ जिल्हे वाटून द्या. त्या १0 मंत्र्यांना पक्षाचा व्हीप द्या. ते ज्या जिल्ह्यात जातील त्या जिल्ह्याच्या कॉंग्रेस अध्यक्षाच्या घरी अगोदर जा, त्यांना गाडीत घेवून सर्किट हाउसला जा. मंत्री सर्किट हाउसवर आणि पक्षाचा जिल्हाध्यक्ष बाहेर वेटींगमध्ये... मंत्रालयातही हे चित्र डोळ्यानं पाहतो आहे. अनेक जिल्हाध्यक्षांचे फोन मंत्री उचलत नाहीत, हे सगळे विचित्र आहे. तुम्हाला कठोर व्हाव लागेल. औषध कडू आहे पण घ्यावं लागेल. यात मी जे जे लिहीलंय, ते ते पक्षाच्या हिताकरीता लिहीलंय. मला काही मागायच नाही, कोणतं पद दिलत तरी नको आहे. पत्रकार म्हणूनच मी मरणार आहे. हा देश आणि हे राज्य एकसंधपणे चालायचा असेल तर लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समानता आणि स्वातंत्र्य याच कॉंग्रेसच्या तत्वावर चालेल. सध्या देशात धार्मिक उन्माद शिगेला पोहोचलेला आहे. महागाईचा तर विषयच नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना शेवटच्या दिवशी २४ मे २0१४ ला ६२ रुपये लिटर पेट्रोल होत, ५२ रुपये लिटर डिझेल होत, घरगुती गॅस ४५२ होता आज हे भाव काय आहेत? आज कॉंग्रेसच राज्य असतं तर हेच फडणवीस आणि चंपा पाटील रस्त्यावर थयथया नाचले असते. महागाई विरोधातले फलक लावून सत्तेवर आले, वर्षाला २ कोटी रोजगार देण्याच्या घोषणा झाल्या होत्या. ८ वर्षात देश विकायला काढला. नाना, केवढ आक्रमकपणे आंदोलन व्हायला हवं, त्यासाठी कॉंग्रेसचा एक-एक कार्यकर्ता जपायला पाहिजे. नको त्यांना मोठेपणा देवू नका. व्यक्तिचा विचार करु नका, खांद्यावर हात ठेवा. पण कितपर्यंत कुणाला जवळ करायच हे ठरवा. पुढचे दिवस सोपे नाहीत. निवडणुकीच्या आदल्या रात्री दिवस उगवल्यासारखं भाजपावाल्यांच काय-काय वाटप होत होतं, तुम्हाला माहित आहे, आता रात्रही राहणार नाही, दिवसही राहणार नाही. सगळं पैशानं खरेदी करता येत, हा सिध्दांत जणू लोकांना मान्य झालाय. अशावेळी व्यक्तिगत प्रेम बाजूला ठेवून दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, पक्षाच हीत कशात? त्यासाठी मरणारा कोण? हे ओळखलत तर पक्ष उभा राहील. २0२४ च्या निवडणुकीत सेना- राष्ट्रवादी एक होवू शकेल. कॉंग्रेसला अलगद बाजूला काढलं जाईल अशावेळी प्रत्येक जिल्हा मजबूत करताना असा
एक-एक ‘पापा’ गमावलात तर ‘बापा .... बापा ’ म्हणण्याची वेळ येईल. माझी नितळ भावना आपण समजू शकाल. थोडा राग आला तरी हरकत नाही, औषध कडू आहे, पण कधी कधी ते घ्यावं लागत... आणि द्यावही लागतं...
Comments
Post a Comment