अत्रेसाहेब नसते तर....?
मधुकर भावे
१३ आॅगस्टला आचार्य अत्रे यांची १२३ वी जयंती आहे. दोन वर्षांनी सव्वाशे वर्ष होतील. अत्रे साहेब १३ जून १९६९ला गेले. ते गेल्याला ५२ वर्षे झाली. या ५२ वर्षांत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रांमधल्या लोकांना ‘आज अत्रेसाहेब हवे होते..’ असं वाटत राहीलं. लोक असं सांगत राहीले. मृत्यूला ५० वर्षे झाल्यानंतर तो माणूस आज हवा होता असं वाटणं, त्या व्यक्तिमत्वाचा गौरव आहेच. पण गेलेल्या ५० वर्षांच्या काळात झालेल्या चुकांबद्दल कान पकडणारा कोणी राहीला नाही, ही भावना व्यक्त करणारेही ते वाक्य आहे.
अत्रेसाहेबांची जयंती तसा महोत्सवाचा दिवस आहे. माझ्यासारख्या व्यक्तिचे तर सारे आयुष्य त्यांनी उभे केले. एक दृष्टी दिली. केवळ मीच नव्हे, माझ््या पिढीतील अनेकांना साहेबांचा सहवास मिळाला नसला तरी, आमच्या पिढीचे शालेय जीवन समृध्द करण्याचे काम अत्रेसाहेबांच्या ‘नवयुग’ वाचनमालेने केले. त्यामुळे ज्यांचा साहेबांशी थेट संबंध आला नाही, अशा लाखो घरांमधल्या माझ्या पिढीचा अत्रे साहेबांशी संबंध आलेलाच आहे. मग तो नवयुग वाचन मालेमुळे आला असेल. साप्ताहिक नवयुगच्या लेखातून आला असेल. संयुक्त महाराष्टÑाच्या लढ्यात आला असेल. दैनिक मराठाच्या प्रत्येक शब्दात आणि वाक्यात अत्रेसाहेब पुरुन उरलेले आहेत आणि ते महाराष्टÑासाठीच आहेत. त्यामुळे अत्रेसाहेब १ आहेत की १० आहेत, असा पुढच्या पिढ्यांनी प्रश्न विचारावा. इतक्या अथांग व्यक्तिमत्वाची प्रत्येक दालनातली निर्विवाद कामगिरी महाराष्टÑात कोणालाही करताच आली नाही.
सुरुवात नवयुग वाचनमालेपासून करु.. आजही त्या कविता आठवतात. तोंडपाठ आहेत....
‘आजीच्या जवळी घड्याळ कसले.
आहे चमत्कारीक...
देई ठेवूनी ते कुठे,
अजुनही नाही कुणा ठाऊक
त्याची टिकटिक वाजते न कधीही
आहे मुके वाटते....
किल्ली देईन आजी त्यास...
परी ते सारखे चालते...’
या पुढच्या सगळ्याच ओळी त्या बालवयातील मनाला घराघरातील आजीच्या जवळ आपण बसलो आहोत, घड्याळ शोधण्याकरीता तिच गाठोड.. उस्कटून टाकितो आणि आजीच्या त्या घड्याळाची किंमत अनुभवतो आहोत. असा वेगळ आनंद या कवितेने दिला आहे.
‘आली ओटीवरी उन्हे बघ म्हणे’
आजी, दहा वाजले...जा जा लवकर
कानी तो घणाघणा घंटा ध्वनी आदळे....
आजच्या मुलांना ‘ओटी’ माहित नाही. आणि आजीच गाठोडही माहित नाही.
‘दिनुचं बिल’ अशी साहेबांची मनाला भिडणारी एक गोष्ट.. छोटा दिनू, त्याचे वडील डॉक्टर. त्यांच्याकडील रुग्णांच ते बिल करायचे, दिनूला वाटलं.. आपण आईची काम करतो.. आपण बिल का करु नये? दिनूने बिल केलं. आईला दिलं... दिनू झोपला, सकाळी उठला तेव्हा आईनं केलेले बिल त्याच्या हातात मिळालं.
‘दिनू जन्माला आल्यानंतर तुला लगेच टायफाईड झाला, सात रात्र तुला मांडीवर घेऊन बसले होते... त्याच काहीही नाही...
रोज तुला शाळेत नेते, तुला शाळेतून आणते... त्याच काही नाही..
तुझे कपडे धुणे, तुला कपडे शिवणे सर्व काही करते याच काहीही नाही. एकूण काहीही नाही....’
दिनू बिल वाचतो आणि आईला बिलगून त्याच्या डोळ्यातून पाण्याची धार लागते. इथे गोष्ट संपते आणि ७० वर्षापूर्वी शाळेत शिकलेला हा धडा आजही आठवला तरी, डोळ्यात पाणी येते... लहान मुलांना कसं घडवावं हे अत्रेसाहेबांनाच समजले. म्हणून ‘नवयुग’ वाचन मालेन माझ्या पिढीला सर्वाथाने घडवले आहे. साने गुरुजी आणि अत्रेसाहेब यांची व्यक्तिमत्व भिन्न असली तरी मनाची कोमलता, ऋजुता दोघांच्या लेखनात ठसाठस भरलेली आहे म्हणून तर ‘श्यामची आई’ हा चित्रपट अत्रेसाहेब निर्माण करु शकले. आणि त्या चित्रपटाला राष्टÑपतीचे पहिले सुवर्णपदक मिळवू शकले. नुसतेच पदक मिळवले नाही तर, जे अन्य दोन चित्रपट स्पर्धेत होते, ते तेवढेच तोलामोलाचे होते. त्यात एक होता
‘दो बिघा जमीन’ त्याचे दिग्दर्शक होते बिमल रॉय. दुसरा चित्रपट होता ‘झाशीची राणी ’ त्याचे दिग्दर्शक होते सोहराब मोदी. अत्रेसाहेबांच्या श्यामची आई जेव्हा परिक्षकांना दाखवला गेला. ७ परिक्षकांपैकी एकही परिक्षक मराठी नव्हता. दोन होते बंगाली, दोन होते उडीया आणि राहीलेले तीन होते उत्तर भारतीय. एकही मराठी परीक्षक नसताना मराठीमधल्या ‘शामची आई’ चित्रपटाला सुवर्ण पदक देणारे किती निपक्षपाती परिक्षक असतील. विशेष म्हणजे अत्रेसाहेबांच्या गळ्यात पुरस्काराचे पदक घातले तेव्हा राष्टÑपती राजेंद्र प्रसाद यांनी या विषयाचा उल्लेख केला. अत्रेसाहेबांचे अनेक सन्मान झाले. त्यांनी जिथे पाऊल ठेवले, तिथे तिथे पादाक्रांत केले. पण, ‘श्यामची आई’ चे सुवर्णपदक हे अत्रेसाहेबांच्या जीवनातीलत सर्वात मोठे यश होते.
असे अत्रेसाहेब काय नव्हते? ते शिक्षक होते, ते कवी होते, ते विडंबनकार होते, ते प्रस्तावनाकार होते, ते नाटककार होते, ते चित्रपट निर्माते होते, ते स्वत: अभिनेते होते (पंपूशेठची भूमिका आठवा). वक्ते होते, संपादक होते आणि राज्यकर्त्यांना दरदरुन घाम सुटेल असाही घणाघात करणारे राजकीय नेतेही होते. एका व्यक्तिमत्वात अशी दहा व्यक्तिमत्वे जगाच्या इतिहासात शोधून सापडणार नाही.
अत्रेसाहेब नसते तर..
क्नवयुग वाचन मालेनं घडवलेली माझी पिढी कुणी घडवली असती?
अत्रेसाहेब नसते तर झेंडूतल्या फुलातल ते खोबरं रसिकांना कसं खाता आलं असतं.
अत्रेसाहेब नसते तर, कॅम्प एज्युकेशन सोसायटी कशी नावारुपाला आली असती?
अत्रेसाहेब नसते तर, नवयुग साप्ताहिकाची वाट पाहत वाचक बसला असता का?
अत्रेसाहेब नसते तर, उद्याचा संसार आणि घराबाहेर या नाटकांना भगिनींना जो संदेश दिला तो कोणी दिला असता? ‘जग काय म्हणेल’ अत्रेसाहेबांनी उभी केलेली बंडखोर स्त्री कोणी निर्माण केली असती?
त्रेसाहेब नसते तर श्यामची आई चित्रपट झाला असता का? आणि महात्मा फुले चित्रपटात गाडगेबाबांनी कीर्तन केले असते का?
अत्रेसाहेब नसते तर दैनिक मराठाचा दणका अन्य कोणाला देता आला असता का...
अत्रेसाहेब नसते तर मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ झाला असता का?
अत्रेसाहेब नसते तर शिवाजी पार्कवर लाखोंच्या त्या सभा होऊ शकल्या असत्या का?
अत्रेसाहेब नसते तर ते हशे आणि त्या टाळ्या महाराष्टÑात घुमल्या असत्या का?
९८६९२३९९७७
Comments
Post a Comment