"बालम" समझा करो...
"बालम" समझा करो...
तासगाव तालुक्यातील बलगवडे नावाचं गाव. आज यात्रेचा दुसरा दिवस. लवकर जेवण आटपून तमाशा बघायला जायचं म्हणून गावकऱ्यांची झुंबड उडली होती. पावण्या रावळ्यांनी गर्दी केली होती. बघूबघूस्तर घड्याळाचं काटं फिरलं. रात्रीचे दहा वाजले आणि तमाशा उभा राहिला. पेटीमास्तर मान डूलवत सुर काढाय लागला तर ढोलकीपटू तालात येऊन मान उडवायला लागला. पब्लिक रंगात आलं. तरणीबांड पोरं म्होरल्या तोंडाला जाऊन बसली. म्हातारी माणसं बुडाला टोचणार नाय अशा हिशेबानं शेलकी जागा बघून आणि पान खाल्ल्यावर थुकाय आलं पाहिजे म्हणून अंतर राखून बसायला लागली. लालभडक दाढी रंगवलेली आणि पांढरीधोट पैरण घातलेली तमाशातली ज्येष्ठ मंडळी गण म्हणू लागली. सुरती एक हात कानावर ठेवून दुसर्या हाताने हातवारे करत घसा फुटेस्तोवर गळा काढू लागली. हा हा म्हणता गण संपला आणि गवळण चालू झाली. लगबगीने तंबाखू थुकून तमाशातला श्रीकृष्ण स्टेजवर आला आणि गवळणीच्या पातळाला त्यानं हात घातला. पण पब्लिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होतं तो सोंगाडी मावशीच्या रूपात येण्याऐवजी भलताच गडी समोर आला आणि मोठा घोळ झाला. प्रेक्षकवर्ग नाराज झाला. पुढे बसलेली पोरं दगडं मारायला लागली. "त्यो सोंगाड्या कुठाय?" म्हणून जाब विचारू लागली. पोरांनी तमाशा बंद पाडला. नुसता राडा सुरू झाला. "त्यो सोंगाड्या आणा आणि मगच तमाशा चालू करा" असा डाव पोरांनी टाकला. सगळीकडं कालवायोट... वातावरण भांडणावर आलं. फडमालक स्टेजवर आला आणि टांगलेल्या माईकवरून बोलू लागला. "हे बघा त्यो सकाळपस्न आजारी हाय. त्येला सलाईन लावल्या. त्यो यीव शकत नाय. कृपया तुम्ही समजून घ्या." फडमालक असं म्हंटल्याबरोबर प्रेक्षकात एकच दंगा उठला. "त्यो सोंगाड्या नाय तर तमाशा हून देणार नाय, तमाशा बंद!" असं म्हणून सगळं पब्लिक उठून उभा राहिलं. यात्रा कमिटीची पाचावर धारण बसली. गाव पुढाऱ्यांनी बोलेरो काढली आणि सरकारी दवाखाना गाठला. सोंगाड्याची सलाईन नुकतीच संपली होती आणि तो डॉक्टरबर बोलत बसला होता. पुढा-यांनी डॉक्टरला हात जोडून विनंती केली आणि सोंगाड्याला बोलेरोत टाकून ही मंडळी घेऊन आली. सोंगाड्याची स्टेजवर एन्ट्री झाली. तसा समस्त प्रेक्षकवर्गातून शिट्ट्यांचा आवाज घुमायला लागला. टाळ्यांचा कडकडाट चालू झाला. सगळीकडे एकच हशा पिकला. वारा फिरला आणि प्रेक्षकांचा उत्साह तुडुंब भरला. कारण प्रेक्षकांना तमाशापेक्षा तो सोंगाड्या महत्वाचा वाटत होता. ज्याच्या भूमिकेसाठी प्रेक्षकवर्ग तमाशा बंद पाडायला तयार झाला होता आणि रसिकांच्या मनोरंजनासाठी जो आजारी अवस्थेत स्टेजवर आला होता तो तमाम महाराष्ट्रातील तमाशा रसिकांना पोट धरून हसायला लावणारा लोकप्रिय सोंगाड्या म्हणजे बालम पाचेगावकर.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात 1 जून 1951 साली पाचेगाव बुद्रुक या गावी अठराविश्व दारिद्र्यात दिवस काढणाऱ्या दामोदर आणि अंजुबाई या दांपत्याच्या पोटी "बालक" या तिसऱ्या पोराचा जन्म झाला. लहानपणी अभ्यासात हुशार असणारा बालक विविध कलांमध्ये पारंगत होता. शाळेतल्या स्नेहसंमेलनात गाणी म्हणत आणि नाटक करत बालक मधील कलाकार बाळसं धरत होता. पण बालकच्या घरात खाण्यापिण्याची वणवण होती. अशातच त्याचे वडील आईला सोडून परगावी निघून गेले. आई एकटी पडली, थोडीशी रडली पण कोणाच्या हातापाया पडली नाही. कारण तिला पोरंबाळ जगवायची होती. म्हणून ती हिमतीने लढू लागली. कधीमधी उपाशी राहून पण धीर धरून हे कुटुंब जगायला लागलं. बालक चांगल्या मार्कांनी सातवी पास झाला. कलेचा नाद असणाऱ्या आणि प्रामाणिक वागणाऱ्या बालकला अख्खा गाव लाडाने "बालम" म्हणू लागला. त्याकाळात सातवी शिकलेल्या बालमला कुणाचं मार्गदर्शन नव्हतं म्हणून तो आपली कला जपत आईसोबत रानात कामाला जाऊ लागला. तेव्हा "तमाशात गेल्यावर लय पैसे मिळतील", असं बालमला कुणीतरी सांगितलं. मग गावाजवळ असणाऱ्या घाटनांद्रेचा "शिकू शिवा घाटनांद्रेकर" या तमाशात बालम जाऊ लागला आणि तिथेच बालक दामोदर कांबळेचा बालम पाचेगावकर झाला.
सुरुवातीला बालम पेट्या उचलायची आणि कणात बांधायची कामं करू लागला. त्याच वेळी तो तमाशातील सोंगाड्यावर नेमकेपणानं लक्ष देऊ लागला. त्याचं बोलणं, चालणं आणि स्टेजवरचं वावरणं नजरेत टिपू लागला. दोन महिने उचलाउचलीची कामे करून बालम सोंगाड्याच्या वेशात डायरेक्ट स्टेजवर उभा राहिला आणि प्रेक्षकवर्ग हसून खुळा झाला. "अठरा वर्षाचा पोरगा एक नंबरचा सोंगाड्या वठीवतो" म्हणून म्हाताऱ्या-कोताऱ्यांच्यात सुद्धा चर्चा रंगाय लागली. आपल्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकणारा बालम फर्मात येऊ लागला. पण भावभावकी आणि गावातली लोकं बालमला नावं ठेवू लागली. पोरगा तमाशात जातोय म्हणून चिडवायला लागली. पै पावण्यात बालमविषयी अपप्रचार सुरू झाला. लग्नाचं वय झालं तर कोण पोरगी देईना. "तमाशा सोडावा लागेल" या अटीवर नात्यातलंच एक जवळचं पाव्हणं तयार झालं आणि वयाच्या विसाव्या वर्षी बालमचं लग्न झालं. सगळ्या बाजूंनी दबाव वाढला आणि या जिगरबाज कलावंताची आतून घुसमट होऊ लागली. बालम आतल्याआत कुढू लागला. तमाशाशिवाय त्याला चैन पडत नव्हती. अशा परिस्थितीत "सगळं जग तुमच्या इरोधात गेलं तर चालेल, पण मी तुमच्या संगटं हाय नव्हका?" अशा शब्दात बालमच्या बायकोने त्याला साथ दिली आणि नव्या जोमाने बालम पुन्हा तमाशात काम करू लागला.
शिकू शिवा घाटनांद्रेकर, जयवंत सावळजकर सह शामराव पाचेगावकर, काळू बाळू कवलापूरकर, शंकर फक्कड मच्छिंद्रगडकर, दत्तोबा तिसंगीकर, कमल ढालेवाडीकर, छाया आगर नागजकर आणि जयसिंग पाचेगावकर सह लता लंका पाचेगावकर या तमाशातून बालमने जीव ओतून सोंगाड्याचं काम केलं. लोकांना मनमुराद हसवलं. पण तमाशात काम करताना बालमने कधीही व्यसन केलं नाही. तमाशातले इतर कलाकार हॉटेलात जाऊन चैनी करताना बालम उघड्या डोळ्यांनी बघत होता पण त्याचवेळी त्याला आपला परिवार दिसत होता. त्यामुळे बालमने कधीच पैसा उडवला नाही आणि कोणत्याच वाईट मार्गाला तो गेला नाही. स्वतःला मिळालेले सगळे पैसे तो बायकोला पाठवून प्रपंचाच्या गाड्याचे चाक भक्कमपणे ओढत होता. तमाशात काम करून बालमने आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केलं. चार महिने तमाशाच्या फडात काम करून गावी आल्यानंतर बालम दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला जात होता. आपल्या कुटुंबाच्या उभारणीसाठी सदासर्वकाळ राबत होता.
जयवंत सावळजकर हा बालमच्या आवडता सोंगाडी. जयवंत सावळकरच्या हाताखाली तयार झालेला बालम आपल्या अफाट विनोदबुद्धीने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत सुटला होता. त्यामुळे गेल्या वीस वर्षांत बालमची सर करणारा सोंगाड्याच झालेला नाही असे मोठमोठे तमाशा कलावंत सांगतात. कारण काही गावं अशी आहेत की, जिथे कोणताही तमाशा असला तरी प्रेक्षकांना सोंगाड्या बालम हवा असतो. बालमची भूमिका तमाशात असल्याशिवाय प्रेक्षक तमाशाच होऊन देत नाहीत. काही गावं तर अशी आहेत की, जी तमाशा ठरवायला गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारतात, "बालम पाचेगावकर आहे का?" बालम पाचेगावकर तमाशात असेल तरच सुपारी दिली जाते. इतका बालम लोकप्रिय आहे. एकदा तासगाव तालुक्यातील मांजर्डे या गावी तमाशा होता. सकाळीच बालमला फोन आला आणि त्याचा भाव वारल्याचे कळवले. एका आईच्या पोटातून आलेल्या तिन्ही भावंडांपैकी एक भाऊ गेल्याचे कळताच बालमच्या काळजाचं पाणी झालं. असंख्य आठवणींचं आभाळ भरून आलं आणि बालमच्या अश्रूंना बांध फुटला. दुःखी अवस्थेतच बालम घरी जाण्याची तयारी करू लागला. पण तमाशा उभा राहिला होता. पब्लिककडून बालमच्या नावाचा पुकारा होत होता. गावपुढारी गोळा झाले. आता बालम गेला तर पब्लिक गोंधळ घालेल या विचाराने यात्रा कमिटीचा थरकाप उडाला. सगळ्यांनी बालम समोर हात जोडले आणि तमाशात भूमिका करण्याची विनंती केली. एकीकडे बालमची भूमिका पाहण्यासाठी तरसलेले प्रेक्षक, दुसरीकडे विनंती करणारे गावपुढारी आणि तिसरीकडे सख्ख्या भावाच्या प्रेताचे तोंड पाहण्यासाठी गावाकडे आगेकूच करणारे बालमचे काळीज... बालमला काहीच सुचत नव्हतं. पण लोकआग्रहास्तव काळजावर धोंडा ठेवून बालम स्टेजवर चढला आणि लोकांना हसून बेजार करणारा सोंगाड्या त्याने वठवला. भावाच्या दहनाला जाण्याऐवजी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी स्वतःच्या भावनांचं बालमने दहन केलं होतं. कलाकार उगीच मोठा होत नाही. त्या पाठीमागे प्रचंड त्याग असावा लागतो. त्यादिवशी बालमने स्वतःला हरवलं होतं आणि हसरे दुःख जगणारा त्याच्यातील सच्चा कलाकार जिंकला होता.
बालमचं मार्केट फुल्ल झालं होतं. तमाशामुळे बालमचा प्रपंचा भरभराटीला आला. त्याच्या एका पोराचं लग्न झालं होतं आणि दुसरी दोन पोरं लग्नाला आली होती. दोघंही चांगली शिकली होती. बालमने स्थळ शोधलं. पोरगा पोरगी एकमेकाला पास पडली. त्याच्या दुसऱ्या मुलाचं लग्न ठरलं. साखरपुडा झाला. लग्नाचा बस्ता काढला. उद्या लग्नाचा मुहूर्त होता. घरी सगळे आनंदाचे वातावरण होते आणि अचानक संध्याकाळी पाहुण्यांचा फोन आला. "मुलाचे वडील तमाशात काम करतात म्हणून आम्ही मुलगी देणार नाही" असे त्यांनी सांगितले. तेव्हा मात्र बालम आतून तुटला. तमाशा गाजवून सोडणाऱ्या बालमच्या वाट्याला ही व्यथा आली. त्यानंतर तो मुलांच्या स्थळासाठी खूप फिरला. त्याच्या दोन मुलांची त्यांचे वडील तमाशात काम करतात म्हणून लग्नं झाली नाहीत. हे खूप मोठं दुःख उरात घेऊन आज बालम जगतोय. लोकांना तमाशा बघायला आवडतो पण तमाशात काम करणारी माणसं त्यांना चालत नाहीत, ही फार मोठी शोकांतिका आहे. इथल्या व्यवस्थेच्या मानसिकतेमुळे तमासगीरांच्या आयुष्याचा "तमाशा" होत आहे. बालम सारख्या सच्च्या कलावंताला आतून होरपळायला लावणारी ही मानसिकता आहे.
आज बालमचे वय 70 वर्षे आहे आणि त्याने 52 वर्ष तमाशा जगलेला आहे. तमाशा भोगलेला आहे. 2020 सालच्या लॉकडाऊनमुळे तमाशा बंद झाला तो आजअखेर चालूच झाला नाही. तमाशा कलावंत देशोधडीला लागले. म्हातारपणात पाचेगावच्या डोंगरावर शेरडं राखण्याची वेळ बालमवर आली. ज्या बालमने आयुष्यभर प्रेक्षकांचे मनोरंजन केले त्या बालमला आपली व्यथा आज डोंगरदऱ्यांना सांगावी लागते. सेलिब्रिटींच्या बसण्या उठण्याला कव्हरेज बनवणारा मेनस्ट्रीम मीडिया बालमकडे फिरकत सुद्धा नाही. त्यामुळे कित्येक तमाशा कलावंत आज नाराज आहेत. आगामी काळात तमाशा ही लोककला टिकवणं खूप मोठं आव्हान आहे. तमाशा आणि तमाशा कलावंत यांच्याप्रती प्रेक्षकांनी आदरभाव दाखवला तरच बालम सारखे कलाकार उद्याच्या जगाची खूप मोठी प्रेरणा असतील. तमाशात "बालम समझा करो"गाण्यावर उठून नाचणाऱ्या पोरांनी बालमचं खरं आयुष्य समजून घेतलं तरच येणारी पिढी तमाशात जाण्याचं धाडस करेल आणि बालमला चांगले दिवस येतील.
लेखक :- काॅ. मारुती शिरतोडे
लेखक कॉ. मारुती शिरतोडे
ReplyDeleteKhup chan
ReplyDelete