शेतीला शेतमजूर मिळेनात.....

मनोजकुमार  मस्के

पूर्वीपासूनच शिराळा तालुका कोकण पट्टा व प्रामुख्याने भात शेतीचा भाग असं म्हटलं जातं. सागाव, चिखली, नाटोली यासह संपूर्ण वारणा पट्ट्यात प्रामुख्याने भात शेती  मोठ्या प्रमाणात केली जाते. जुन्या काळापासून शिराळा येथील भात जगप्रसिद्ध आहे पूर्वी तालुक्यात जलसिंचनाची प्रभावी सुविधा नव्हती. त्यामुळे पावसाच्या जोरावर येणारे भात पीक घेण्यास शेतकऱ्याचा जोर होता. परंतु अलीकडे शेतकऱ्यांना भात शेती करण्यास खूप त्रास होऊ लागलाय. शेती बि-बियाणे, खत यांच्या वाढलेल्या किमती, भात शेती करण्यासाठी लागणारे मजूर मिळणे कठीण झाल्याने अनेक शेतकऱ्यांना शेती करणे परवडनासे झाले आहे.
        खऱ्या अर्थाने भातशेती करण्यासाठी नांगरणी, पेरणी, लावणी, कापणी,  मळणी,व झोडपणी ही कामे करण्यासाठी शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्याचबरोबर बी-बियाणे संकरित वापरल्यास जवळपास १०० रुपये किलोने घ्यावी लागते. खत वापरावे लागते. युरिया खत सरकारी दराने मिळते पण शेतीला अनेक वर्षापासून अनेक विविध खतांची सवय लावल्याने जमिनीचा कस वाढविण्यासाठी मिश्रण दाणेदार खते वापरावी लागतात. या रासायनिक खतांचे भाव तर गगनाला भिडले आहेत. सध्या 1100 रुपयाला 50 किलो ची पिशवी मिळत आहे. शेतीला लागणाऱ्या मजुरांची मजुरी 300 ते 400 रुपये पर्यंत गेली आहे. एवढे करून शेतकऱ्याची दमछाक होते नांगरणी बैलजोडीने करणे परवडत नाही. सध्या तर बैल सांभाळणे देखील अनेक शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले आहे.  त्यामुळे जवळपास 70 टक्के शेतकरी पावर ट्रेलर किंवा ट्रॅक्टरचा वापर करत आहे. यासाठी ताशी 500 रुपये पर्यंत भाडे द्यावे लागते. ग्रामीण भागात आसपासच्या गावातून मजूर आणून त्यांना आणणे, नेणे पासून मजुरी व दोन वेळचे जेवण व राहण्याची सोय करावी लागते. त्यामुळे भात शेती करण्यासाठी शेतकरी धजावत नाही. पूर्वी शेतमजूर मुबलक प्रमाणात मिळत होते. ऊसाचे क्षेत्र ही कमी होते. सध्या औद्योगिकरणामुळे अनेक ग्रामीण भागातील तरुण  कामासाठी शहरात जात आहेत. तर काही मंडळी अनेक सरकारी व खासगी योजनेतून कर्ज घेऊन स्वतःचे दुकान, किंवा भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शेत मजूर मिळणे खूपच कठीण झाले आहे. 

चौकट
सध्या मी भात शेतीचे प्रमाण कमी केले असून ऊस लागवड अधिक करीत आहे. शेतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने आवडत असून देखील इतर पिके घेणे परवडत नाही. त्यामुळे ऊस हे पीक विना त्रासाचे असल्याने ते परवडण्यासारखे आहे.

- पांडुरंग पाटील- शेतकरी

गेल्या वर्षी तालुक्यात 12964 हेक्टर क्षेत्रावर भात पीक पेरणी झाली होती यंदा भाताचे क्षेत्र कमी झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी भाताचे सुमारे 500 ते 700 हेक्‍टर क्षेत्र कमी होईल असा अंदाज आहे.

- एस.डी.घागरे
 मंडल कृषी अधिकारी शिराळा

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*