हरवली पाखरे परतणार कधी, ओस पडलेल्या शाळा बहरणार कधी....
हरवली पाखरे परतणार कधी, ओस पडलेल्या शाळा बहरणार कधी....
मनोजकुमार मस्के
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांची अवस्था पालवी गळुन पडलेल्या वृक्षांप्रमाणे झाली आहे .विद्यार्थी शिक्षकांविना ती सुनी सुनी झाली आहे. गेल्या वर्षभरापासून सलग शाळा बंद असणारी ही पहिलीच घटना आहे. सुट्टीचा आता शिक्षक विद्यार्थ्यांसह सर्वांनाच कंटाळा आला आहे. त्यामुळे सर्वांनाच शाळेचे वेध लागले आहेत. मात्र कोरोनाचा भयंकर राक्षस पिच्छा सोडायला तयार नाही.त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या शाळेची घंटा कधी वाजणार हे अद्याप अनुत्तरितच आहे.कोरोणामुळे अख्खं जगच बदलून गेलं आहे . त्यात शाळांचं रुपडंही पालटलं आहे . राष्ट्रगीत, प्रार्थना ,प्रतिज्ञा ,पसायदान, समूहगीत ,कित्येक दिवसांपासून कानी पडलेलं नाही. वेळोवेळी शाळा भरल्याची सुटल्याची तास सुरू झाल्याची जाणीव करून देणारी घंटा वाजलीच नाही. शाळेच्या खिडक्या दरवाजे गेल्या चार महिन्यांपासून स्तब्धच आहेत. काळ्याभोर फळ्यावर उमटणारी पांढरी शुभ्र अक्षरे लुप्त झाली आहेत.त्यांची जागा धुळीने घेतली आहे. सतत धडधडणारी बाके निमूटपणे उभी आहेत. मंद वाऱ्याने आणि विद्यार्थ्यांच्या गोंगाटाने वर्गा वर्गातील सतत हलणाऱ्या बोलक्या पताका पुतळ्याप्रमाणे स्तब्धपणे लटकलेली आहेत .बोलक्या भिंतीवरील रंग छटा फिक्या पडल्या आहेत.शिपाई मामामुळे सतत स्वच्छ असणारा वरांडा धुळीने माखला आहे.शाळेच्या बाहेर गोळ्या बिस्किटे शेंगदाणे घेऊन बसणारा खाऊवाला मामा दिसेनासा झाला आहे. दुपारच्या सुट्टीत बुट्टी भरून पेरू घेऊन येणारे आजोबा आवासून विद्यार्थ्यांची वाट पाहात आहेत. कबड्डी खोखोच्या मैदानाचं अस्तित्व संपल्याचं चित्र निर्माण झाले आहे .परिणामी बालचमूंच्या हुंदडणेमुळे गजबजलेल्या शाळेच्या मैदानात स्मशान शांतता पसरली आहे .
नको ऑनलाइन शिक्षण
प्रत्यक्ष मुलं भेटू देत
विद्यार्थ्यांच्या बागडण्याने शाळा फुलून दे
देवा पाऊस पण असा पडू दे
त्यात प्रत्येक थेंब तुझ्या चमत्काराचा सॅनिटायझर होऊन बरसु दे
ही महामारी लवकर नष्ट होऊ दे !
शाळे भोवतीची फुल ,फळ झाडं कोमेजू लागली आहेत .माध्यान भोजनासाठी दररोज पेटली जाणारी चूल शांतपणे विसावली आहे. परिणामी या शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ताटांनाही विसावा मिळाला आहे .त्यामुळे या ताटांचा आवाजही लुप्त झाला आहे .ना दंगा आहे ,ना मस्ती आहे, ना शिक्षा आहे, ना शिकवणं आहे, विद्यार्थी आणि शिक्षक केंद्रीत शाळांवर कोरोनाचा असा कधी नव्हे तो प्रभाव पडला आहे.
अरूण पाटील - पालक
संस्काराच्या पवित्र मंदिरात ज्ञानाचा पाऊस पडून शिक्षणाचा हिरवागार मळा पुन्हा एकदा फुलावा सुनीसुनी मैदानात मुले मनसोक्त बागडावीत.शिंपल्यातील मोत्या प्रमाणे वर्गात बसणाऱ्या मुलांचा आनंदाचा सोहळा पुन्हा एकदा सर्वत्र संपन्न होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
बि. आर. पाटील - शिक्षक
Comments
Post a Comment