अत्रेसाहेबांसोबतची १२ वर्षेकोणती पुण्ये येती फळाला...?

अत्रेसाहेबांसोबतची १२ वर्षे
कोणती पुण्ये येती फळाला...?
मधुकर भावे

१३ जून १९६९...
१३ जून २०२१ (रविवार)
५२ वर्षापूर्वी आमचे अत्रेसाहेब याच तारखेला गेले. बघता बघता ५२ वर्षे झाली. या ५२ वर्षांत साहेबांच्या सोबत काढलेली १२ वर्षे म्हणजे ‘मंतरलेले दिवस’ होते. त्यावेळची ‘मराठा’तली आमची टीम एक झिंग असल्यासारखी काम करता होती. अत्रेसाहेबांच्या सभा, अत्रेसाहेबांच्या मराठातील हेडलाईन, त्यांचे इशारे, त्यांच्या सिंहगर्जना अत्रेसाहेबांसोबतचा प्रवास, त्या टाळ्या, ते हे सगळं काही बेफाम होतं. साहेबांना कोणताही लहान शब्द मान्यच नव्हता. सगळं काही जबरस्दत, तडाखेबाज आणि विरोधकाची सालटी काढणारं.  ‘मराठा’ हे वृत्तपत्र नव्हतचं. एखाद्या महायोध्याने दोन दांडपट्टे हातात घेऊन शत्रूवर तुटून पडावं, त्याच अर्विभावात अत्रेसाहेबांची लेखणी आणि वाणी महाराष्टÑाच्या शत्रूंवर तुटून पडत होती. अत्रेसाहेबांचा तो संतप्त अवतार या डोळ्यांनी पाहता आला. या देहाने अनुभवता आला. मुडद्यामध्ये जीव कसा निर्माण होऊ शकतो, मरगळलेली माणसं ताड-ताड चालू शकतात, ही कीमया, तो अंगार.. याचा जिवंत प्रत्यय त्या काळात आला होता. असा वक्ता होणे नाही, असा पत्रकार होणे नाही. ५ रुपये १० आण्याच्या पुंजीवर महाराष्टÑाच्या त्यावेळच्या सरकारला गदगदा हलविणारा पत्रकार पुन्हा होवू शकतो का? आपल्या वाणीने आणि लेखणीने किंवा ‘मराठा’ च्या हेडलाईनने, सरकारची झोप उडविणारा पत्रकार पुढच्या पिढ्यात होणेच शक्य नाही. आचार्य अत्रे यांच्यामध्ये १० अत्रे होते. शिक्षक अत्रे म्हणून सुरुवात करणारे, झेंडूच्या फुलातून अजरामर विडंबन काव्य करणारे, ‘गीत-गंगा’मधुन भावपूर्ण कविता लिहीणारे, ‘नवयुग’ वाचनमालेतून ‘दिनूचे बिल’ गोष्ट सांगणारे, कॅम्प एज्युकेशन सोसायटीची शाळा एका वर्षात नामवंत करणारे. मराठी रंगभूमीला मृतावस्था आली असताना, ‘साष्टांग नमस्कार’ घालून ‘पाणी ग्रहण’ करणारे.. लग्नाच्या बेडीची अनुभूती देणारे. ‘घराबाहेर’ पासून ‘जग काय म्हणेल’ सांगणारे आणि... ‘शामची आई’ या चित्रपटाला पहिले राष्टÑपती पदक मिळविणारे.... विधानसभेत ज्यांचा तोफखाना धडाडला, ‘मराठा’च्या अग्रलेखातून ज्यांनी महाराष्टÑ विरोधकांचे बुरुज उद्ध्वस्त केले.... शिवाजी पार्क असो, चौपाटी असो... त्यांच्या एकएका व्याख्यानाने संयुक्त महाराष्टÑासाठी सर्वस्व पणाला लावून लढ्याचा झेंडा खांद्यावर घेतलेले असंख्य कार्यकर्ते, अत्रेसाहेबांनी काय किती आणि किती प्रभावीपणाने कोणतेकोणते विषय हाताळले. देशाच्या इतिहासात याला तोड मिळणार नाही.
अत्रेसाहेब केवळ विनोदी होते, केवळ हसवणारे होते असा समज असणारे बरेच समीक्षक होते आणि आजही आहेत. अत्रेसाहेबांच्या हास्यामागचे कारण, त्यांच्या शब्दामागचा आशय. त्यांच्या लेखणीतून सांगण्यात आलेला सोपा विषय हे केवळ आणि केवळ अफाट बुध्दीसामर्थ्याचे दर्शक होते. जाहीर सभेतील त्यांचा शब्द बंदुकीच्या गोळ्यांसारखा होता. हा सारा अनुभव त्यांच्यासोबत १२ वर्षे वावरताना जिवंत अनुभवता आला आणि आजही ६० वर्षे त्याच पुंजीवर पत्रकारीता करतो आहे. मिडास राजानं हात लावला की त्याच सोनं होई, असं सांगितलं गेलं ही गोष्ट खरी, खोटी पहायला आपण कोणीच गेलो नाही. अत्रेसाहेबांनी जवळ केल्यावर जीवनाचं सोनं झालं हे सांगताना संकोच वाटत नाही अभिमान वाटतो.
किती सांगू आणि काय सांंगू ...
‘मंतरलेले दिवस’ या माझ्या पुस्तकात जवळपास सगळचं सांगितलयं. पण, पुस्तक पूर्ण झाल्यावर असं वाटत राहीलं की, खूप सांगण्यासारखं राहीलं. नवीन पिढीला तर अनेक गोष्टी माहित नाहीत. अत्रेसाहेबांनी ‘महात्मा फुले’ चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटाची सुरुवात गाडगेबाबांच्या कीर्तनाने होते, कितीजणांना माहिती आहे? अत्रेसाहेबांच्या ‘श्यामची आई ’ चित्रपटाला राष्टÑपतींचं पहिल सुवर्णपदक मिळालं. महाराष्टÑाची छाती अभिमानानं ताठ झाली. राष्टÑपतींच्या सुवर्ण पदकाची सुरुवात अत्रे साहेबांच्या ‘श्यामची आई’ पासून झाली. पण हा चित्रपट जेव्हा राष्टÑीय स्पर्धेसाठी दिल्लीत पाठवला गेला त्यावेळी सुवर्ण पदकासाठी आणखीन दोन महान चित्रपट होते. सोहराब मोदी यांचा
‘झाशीची राणी’ आणि बिमल रॉय यांचा
‘दो बिघा जमीन’... गुणवत्तेमध्ये समसमान असलेले चित्रपट होते. परिक्षक मंडळात एकही मराठी सदस्य नव्हता. पाचही सदस्य बंगाली आणि पंजाबी होते,  ‘झाशीची राणी’ आणि ‘दो बिघा जमीन’ याचे दोन्ही नामवंत दिग्दर्शक असताना आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’या चित्रपटाला राष्टÑपतींचे पहिलं सुवर्णपदक मिळालं. हा विक्रम अजून कोणालाही मोडता आलेला नाही.
संयुक्त महाराष्टÑाची निर्मिती ही तर अत्रे साहेबांच्या लेखणीची आणि वाणीचीच कमाल आहे. त्यांच्यासोबत कॉम्रेड डांगे, एस.एम.जोशी, क्रांतीसिंह नाना पाटील, दादासाहेब गायकवाड, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, ही सगळी मोठी नेते मंडळी होतीच. सारी जनता संयुक्त महाराष्टÑाच्या बाजूने होतीच १०६ हुतात्म्यांच्या रक्ताचं अर्घ्य महाराष्टÑाला अर्पण झालं होते. पण आचार्य अत्रे, त्यांचा ‘मराठा’ आणि त्यांची वाणी या दोघांचे श्रेय निर्विवाद आहे. ‘मंगलकलश’ कोणी आणला, याचे श्रेय घेता येईल आणि यशवंतरावांना ते आहेसुध्दा. पंडितजींना त्यांनी मराठी मन समजवून सांगितलं. कलश कोणी आणला यापेक्षा तो ‘कलश’ महाराष्टÑाला का द्यावा लागला? त्यामागे निर्विवादपणे आचार्य अत्रे आणि त्यांच्यामागे असलेली मराठी जनता आणि त्यांचा ‘मराठा’ कामगार आणि शेतकरी याखेरीज हे मराठी राज्य मिळालेच नसते. अत्रेसाहेबांचे महाराष्टÑावर अनंत उपकार आहेत.  महाराष्टÑाच्या नवीन पिढीला आज हे माहितही नाही. संयुक्त महाराष्टÑ झाल्यावर या राज्याचे नाव ‘मुंबई राज्य’ असे ठेवण्यात आले. दुसºया दिवशीच्या ‘मराठा’त घणाघात करीत अत्रेसाहेबांचा अग्रलेख आला ...
‘आमचे नाव महाराष्टÑच’...
यशवंतरावांना फोन करुन त्यांनी खडसावून सांगितले. यशवंतराव म्हणाले, आम्ही ‘कंसा’त महाराष्टÑ असे लिहू... म्हणजे... मुंबई राज्य (महाराष्टÑ).. अत्रेसाहेबांनी तडकावले... ‘चव्हाणसाहेब, तुमच्या ‘कंसा’चे पोट फाडून टाकू..’ आईच्या पोटात मुलगी की मुलीच्या पोटात आई? काय वाटेल ते झाले तरी ‘मुंबई राज्य’ शब्द आम्हाला चालणार नाही, दुसरा लढा उभा राहील... आमच नाव महाराष्टÑच!
अवघ्या ३६ तासात ‘मुंबई राज्य’ हे  अगोदर ठरलेले नाव बदलून
‘महाराष्टÑ राज्य’ हे नाव सरकारला द्यावे लागले.
१३ जून १९६९ रोजी अत्रेसाहेब हे जग सोडून गेले. ‘मराठा’वर आकाश कोसळल. शिरीष पै- व्यंकटेश पै खंबीरपणे उभे राहीले. दुसºया दिवशीच्या ‘दैनिक मराठा’च्या अंकात अत्रेसाहेबांच्या भल्या मोठया फोटोसह मुख्य शिर्षकाशेजारी ग.दि.मांच्या या चार ओळी प्रसिध्द केल्या होत्या...
‘सर्वांगाने भोगी जीवन’
तरीही ज्याच्या, उरी विरक्ती
साधुत्वाचा गेला पूजक
खचली, कलली, श्री शिवशक्ती....
मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ होण्यासाठी अत्रेसाहेब लढलेच. संयुक्त महाराष्टÑ झाल्यावर ‘महाराष्टÑ राज्य’ नाव मिळण्यासाठी अत्रेसाहेबांनी पुन्हा दोन दांडपट्टे हातात घेतले. असा संपादक, असा नेता पुन्हा कधी होईल का? त्या अत्रेसाहेबांच्यासोबत आयुष्याची १२ वर्षे काम करता आलं, राहता आलं...
आयुष्यात आणखी काय पाहिजे?
कोणती पुण्ये.... येती फळाला....
माझ्या आयुष्याचे सार्थक झालं आहे.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*