कॉंग्रेस-पराभवाच्या अहवालाने उत्तर मिळणार नाही! लढून मरायच की बुडुन मरायचं... एवढच ठरवा...!

*कॉंग्रेस-पराभवाच्या अहवालाने उत्तर मिळणार नाही! 
लढून मरायच की बुडुन मरायचं... एवढच ठरवा*...!

*मधुकर भावे/उत्तर-दक्षिण*

पाच राज्यातील कॉंग्रेसच्या पराभवाची दखल पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी गंभीरपणे घेतलेली आहे. पराभव का झाला? पराभवातून कोणता धडा घेण्याची गरज आहे? केरळ आणि आसाम या दोन राज्यात सत्तारुढ पक्षाला (डावे कम्युनिस्ट आणि भाजप) कॉंग्रेस पक्ष सत्तेवरुन खाली का खेचू शकला नाही? पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेस पक्षाची पाटी का कोरी राहीली? असे चार महत्वाचे प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केलेले आहेत. कॉंग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी, या प्रश्नांची उत्तरे कोणी दिली आहेत का? आणि उत्तरे शोधून काढली आहेत का? याचा तपशील समोर आलेला नाही. परंतु बहुधा कोणत्याही सदस्यांने या पराभवाबद्दल विश्लेषण केले असेल असे वाटत नाही. या पराभवाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याकरिता श्री अशोक चव्हाण यांची समिती नेमण्यात आलेली आहे. त्यासाठी समितीचे चार सदस्य देशभरातून नियुक्त केलेले आहेत. पराभवाची राज्य पाच आहेत, १५ दिवसांत अहवाल द्यायचा आहे. कोरोनामुळे सगळ्या राज्यात समितीला फिरणे शक्यन नाही. त्यामुळे स्पष्ट काय आहे की ते त्या-त्या राज्यातल्या कॉंग्रेस कार्यकर्त्याशी चर्चा न करताच, कार्यकर्त्यांचे नेमके दुखणे काय आहे? हे समजून न घेताच ढोबळ मानाने अहवाल सादर केला जाईल आणि त्या अहवालाचा पुढच्यावर्षी आणि त्याच्या पुढच्यावर्षी होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसला फार मोठा फायदा होईल अशी अजिबात शक्यता नाही. उपचाराचा भाग म्हणून किंवा ‘पोस्टमार्टम’ म्हणून असे त्या अहवालाचे स्वरुप असेल. 
एक योगायोग असा आहे की, जवळपास पाच राज्यात कॉंग्रेस पराभूत झाली. त्याचवेळी भाजपाला आसाम सोडून सर्वत्र मोठा पराभव पत्करावा लागलेला आहे. ज्या राज्यात कॉंग्रेसचा पराभव झाला, त्या राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या रायात भाजपाचा पराभव झाला याचा जास्त आनंद आहे. सोनियाजींनी प्रश्न विचारला आहे की, बंगालमध्ये कॉंग्रेसची पाटी कोरी का राहीली? ती पाटी कोरी राहीली म्हणूनच बंगालमध्ये ममता बॅनर्जीच सरकार येऊ शकलं. तिथे लढतीमध्ये कॉंग्रेस नव्हतीच. कॉंग्रेसने मोठ्या प्रमाणात मतं खाल्ली असती तर त्याचा भाजपाला फायदा झाला असता. बंगालच्या चाणाक्ष मतदारांनी कॉंग्रेसला वगळून मतदान केले, त्यामुळे कॉंग्रेसची पाटी कोरी राहील्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्याची जिरवली गेली. कॉंग्रेसनं जे चिंतन करायला हवे ते हे करायला हवे की, देशातील लोकशाही समोरचा सगळ्या मोठा धोका मोदी-शाह-भाजप हाच आहे. प्रत्येक राज्यात त्यांना पराभूत करणाºया सक्षम नेता कॉंग्रेसमध्ये त्या त्या राज्यात जिथपर्यंत निर्माण होत नाही, तिथपर्यंत कॉंग्रेसला यश मिळणे सोपे राहीलेले नाही. पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसजवळ ममता बॅनर्जी, मोदी -शाह यांच्या तोडीचा, मोदी-शहांच्या अरेरावीला तेवढ्याचा चोखपणे उत्तर देणारा दुसरा नेता कोण आहे? मग तिथे कॉंग्रेसचा विजय कसा अपेक्षित आहे? शिवाय ५० वर्षापूर्वीचा सिध्दार्थ शंकर रे यांच्या कॉंग्रेस सरकारचा एक अपवाद सोडला तर, बंगालमध्ये कॉंग्रेस उभा करणारा कोणता नेता होता आणि आज आहे? चिंतन करायचं असेल तर हे केले पाहिजे की, ममता कॉंग्रेसपासून दूर का गेल्या?  महाराष्टÑात शरद पवार कॉंग्रेसपासून का दूर गेले आणि त्यांच्याच पक्षाशी का आघाडी करावी लागत आहे, आणखीन जुने सांगायचे तर, उत्तरप्रदेशात हेमवंतीनंदन बहुगुणा यांच्यासारखा बहुगुणी नेता कॉंग्रेसपासून दूर गेला तेव्हा याचा विचार झाला नाही आणि उत्तरप्रदेश जवळपास आपण कायमचे गमावले किंवा ममताच्या तोडीचे नेतृत्व पश्चिम बंगालमध्ये का उभे केले नाही ? किंवा का उभे राहु शकले नाही? जी अवस्था बंगालमध्ये आहे तिच अवस्था केरळमध्ये आहे.  तामिळनाडूमध्येही के. कामराज यांचा अपवादात्मक काळ सोडला तर, १९६७ पासून अण्णा दुरार्इंचे डीएमके सरकारनंतर रामचंद्रन यांचे एडीएमके सरकार, अशा प्रादेशिक पक्षांच्या विरोधात कॉंग्रेस सरकार आणू शकणारे कोणते समर्थ नेतृत्व तामिळनाडूत होते ? आणि आज आहे? डीएमके या प्रादेशिक पक्षासोबत कॉंग्रेसला का जावे लागले? महाराष्टÑात शिवसेनेच्यासोबत का जावे लागले? याचे चिंतन होण्याची गरज आहे. कॉंग्रेस एक राष्टÑीय पक्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाºया पक्षाला, १३६ वर्षाच्या पक्षाला, प्रादेशिक पक्षांसोबत का जावे लागते? याचे चिंतन होण्याची मुख््य गरज आहे. एक उदाहरण सांगतो १९६७ साली देशातल्या ९ राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाची सरकारे पराभूत झाली होती. काश्मिरमध्ये शेख अब्दुल्ला, उत्तरप्रदेशमध्ये चरणसिंग, बिहारमध्ये 
कर्पुरी ठाकूर, बंगालमध्ये अजय मुखर्जी, ओरिसामध्ये हरिकृष्ण मेहताब्ब, मध्यप्रदेशात गोविंदनारायण सिंग, केरळमध्ये नंबुद्रीपाद, पंजाबमध्ये अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल, तामिळनाडूमध्ये अण्णादुराई अशी विरोधी पक्षाची ९ सरकारं सत्तेवर आली. कॉंगे्रेसला पहिला तो झटका होता. त्यावेळी महाराष्टÑात वसंतराव नाईक मुख्यमंत्री आणि वसंतदादा पाटील कॉंग्रेस अध्यक्ष यांनी कॉंग्रेसचे २०२ आमदार निवडुन आणले. १९७२ साली याच जोडीने (नाईक-दादा) २२२ आमदार निवडुन आणले. १९७२ ते २०१९ या ५० वर्षांच्या काळात २२२ वरुन ४६ वर आपण का आलो? याचे चिंतन होण्याची गरज आहे. राज्या- राज्यात सक्षम नेतृत्व का कमी पडत आहे?. कॉंग्रेसचे नेते आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात किती अंतर पडलेले आहे? सरकारात मंत्री झालेला कॉंग्रेसचा मंत्री आणि कॉंग्रेसचा कार्यकर्ता यांच्यात अंतर पडले आहे का? २०२ आणि २२२ आमदार निवडुन येत असताना महाराष्टÑ प्रदेश कॉंग्रेस दरवर्षाला कार्यकर्त्यांची तीन-तीन, चार चार  शिबिर घेत होती. त्या शिबिरात कार्यकर्ते तयार होत होते. निवडणुकीचे तिकीट देताना ‘तुझ्या जातीची मत किती?’ आणि ‘तु किती पैसा खर्च करु शकशील?...’ असे प्रश्न विचारले जात नव्हते. एकाच कार्यकर्त्यांला तिकीट मिळणार हे माहित असताना बाकीचे कार्यकर्ते त्यासोबत जीव ओतून काम करत होते. आता हाच फरक का झाला? याचे चिंतन होण्याची गरज आहे. प्रत्येक कॉंग्रेसच्या मंत्र्याने आपले गट का तयार केले? ‘सत्ता मिळाली तर पक्षाशी निष्ठा’ अशी भावना का निर्माण झाली? पक्षाच्या कामासाठी सत्ता सोडायची तयारी का नाही? सत्तेत बसलेल्यांचा सार्वजनिक जीवनातील वावर त्यांच्या जीवनमानातला जबरदस्त फरक, त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या, पाच बोटातल्या ४ अंगठ्या हे सगळे काळजीपूर्वक लोक पाहत आहेत. कॉंग्रेस सेवेकरीता होती, समर्पणाकरीता होती, लोकांना आज तसे वाटत नाही. या देक्षाला एकत्र ठेवण्याची शक्ती फक्त कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्येच आहे आणि कॉंग्रेसच्या विचारात आहे. मोदी आणि शाह लोकशाहीचा बुरखा घालून या देशात गेली ६ वर्षे जो आर्थिक धिंगाणा घालत आहेत, नोटाबंदी करत आहेत, देशाच्या अनेक संस्था विकून टाकल्या जात आहेत. कोट्यावधी रोजगार हिरावले जात आहेत. महागाईचा कहर झालेला आहे, पेट्रोल १०० च्या पार झालेले आहे. याचा लोकांना आता पुरेपुर प्रत्यय येतो आहे. ज्या उत्तरप्रदेशान भाजपाची मिजास मानली जात होती. तेथील महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला पराभूत करुन मतदारांनी सपा-बसपाला विजयी केले कॉंग्रेसला का विजयी केले नाही? त्या-त्या राज्यात मोदी-शाह यांच्या ‘अरे’ला ‘कारे’ असे म्हणणारे कॉंग्रेसचे कणखर नेतृृत्व तयार होत नाही? तिथपर्यंत कॉंग्रेसला फार मोठे यश मिळेल अशी स्थिती आज नाही. छत्तीसगडमध्ये आमचे भूपेश बघेल रस्त्यावर उतरला. त्यावेळचे भाजपचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग यांनी भूपेश बघेलला अडीच वर्षे तुरुंगात डांबले. पण रस्त्यावरची लढाई भूपेशने चालूलच ठेवली. भाजपाने सहा वर्षांच्या सत्ता काळात महागाई वाढवली, आर्थिक वित्तिय तुटीने देश उद्ध्वस्त होत आहे. कोट्यावधीचे रोजगार गेलेले आहेत आणि जगातली वृत्तपत्रं नरेंद्र मोदींना आता उघडी पाडत आहेत. पण राज्या-राज्यातले कॉंग्रेस कार्यकर्ते भांबावलेसारखे का आहेत ? जिथपर्यंत लोकांचे प्रश्न अंगावर घेऊन, नेते आणि कायकर्ते रस्त्यावर उतरण्याची तयारी होत नाही तिथपर्यंत फार मोठ्या यशाची अपेक्षा अत्यंत चुकीची ठरेल आणि मग अशावेळी पाटी कोरी राहीली याची खंत करण्यापेक्षा, देशाचा मुख्य शत्रू भाजपा आहे त्याला पराभूत करणारा कोण? हे ओळखा. श्रीमती इंदिरा गांधी यांनी चरणसिंग यांचे सरकार स्थापन करायला पाठींबा दिला आणि सरकार चालवायला पाठींबा न देता ते पाडले. (सरकार बनानेको समर्थन दिया था, चलाने को नही - इंदिरा गांधी) आजचे राज्या-राज्यातले कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व डावपेचातही कमी पडत आहे. महाराष्टÑात कॉंग्रेसच्या पाठींब्यावर तीन पक्षाचे सरकार आहे. कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. सरकारात सामील झालेले असतानाही कॉंग्रेस मंत्र्यांना मिळणारी वागणूक, अर्थसंकल्पातील असलेल्या तरतूदी वाटपात होणारी विषमता याबद्दल कॉंग्रेस आमदार आणि आमदार तक्रार करतात. नाना पटोले हेच तक्रार घेऊन जाताात. त्यांनी तसेच् केलेच पाहिजे. पण परिस्थिती सुधारते आहे का? असेच राहीले तर लढून मरायच की बुडुन मरायच, याचा निर्णय कॉंग्रेसला आज ना उद्या करावाच लागेल. मोदी आणि भाजपा नको हे देशभर वातावरण तयार होत आहे. मोदींच्या कर्मानेच त्यांचे सरकार जाईल. कॉंगे्रसने पक्षवाढीसाठी जर चिंतन करायचे ठरवले तर त्या-त्या राज्यात पक्ष मजबूत करणे हा विषय समोर ठेवा. महाराष्टÑात विधानसभेचे अध्यक्षपद सोडून म्हणजे सत्तेचा त्याग करुन, नाना पटोले यांनी पक्षाचा ध्वज खांद्यावर घेतलेला आहे. त्या पठठ्याची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. मुंंबई कॉंग्रेससाठी भाई जगताप त्याचसाठी रस्त्यावर उतरत आहेत. अशा नेत्यांना शक्ती  दिली नाही तर, मग पक्ष डळमळीत होणारच आहे. आजही देशाच्या प्रत्येक गावात कॉंग्रेस कार्यकर्ता आहे, कॉंग्रेसचा विचार आहे,  कॉंग्रेसचा झेंडा आहे. कॉंग्रेस विरोधात कितीही वातावरण असले तरी, १०, २० टक्के मत कॉंग्रेसची कायमची मत आहेत. मग अंतर का पडलं?. कार्यकर्ते आणि नेते यांच्यात अंतर पडलेलं आहे. जाती-पातींचे अंतर निर्माण झालेले आहे, चुकीच्या लोकांना महत्व दिले गेलं आहे. अनेक वर्ष खासदारकी, आमदारकी भोगून आता रिकामे असलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे काम काम करणाºया नेत्याचे पाय ओढण्याचेच काम सुरु आहे. तक्रारींच्या झेरॉक्सचा सपाटा सुरु आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांला त्याचे पाय खेचले जात आहेत. पराभव का झाला हे शोेधून काढणे फार अवघड नाही. त्याच्याकरीता समितीची गरज नाही. प्रत्येक राज्यातील २५- २५ कार्यकर्त्यांना दिल्लीला बोलवा आणि त्यांच्याशी केंद्रीय नेत्यांनी एक-एक तास बोलावं. कॉंग्रेसच्या अपयशाचं सगळ्यात उत्तम विश्लेषण हाच ग्रामीण कार्यकर्ता करु शकेल आणि हाच कार्यकर्ता कंबर कसून जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तोच कॉंग्रेसला विजय मिळवून देतो. या दोन ओळींमध्ये यश आणि अपयशाचे विवेचन आहे. वेगळ्या अहवालाची गरजच नाही. दिल्लीचे जी- तेवीस नेते आपआपसात भांडताहेत त्याची लागण राज्या राज्यात होणार की नाही? तिथली भांडण मिटवा. इथं भांडण होणार नाहीत. तालुका, जिल्हा आणि प्रदेश पातळीवर उमेदवारांची जी यादी ठरेल, ती मान्य करा. दिल्लीहून नाव घुसवू नका. फरक पडतो की नाही ते बघा. मंत्र्यांना स्पष्ट सांगा तालुका जिल्ह्यात पोहोचल्यानंतर तालुका, जिल्हाअध्यक्षाच्या घरी बैठका करा, तालुका आणि जिल्हाध्यक्षाला गाडीत घेऊन गावात फिरा. त्यांचे फोन घ्या, त्यांच्या लेटरहेडवर आलेली लोकांची कामे करत जा, ती कामे झाल्यानंतर त्या संबंधित माणसाला ‘ कॉंग्रेस तालुका आणि जिल्हाअध्यक्षांमुळे तुझ केलेलं आहे, असं मंत्र्यांनी आवर्जून सांगायला शिकवा फरक होतो की नाही ते बघा. 
शेवटचा मुद्दा
एक अतिशय गंभीर मुद्दा मांडतोय. २०२१ च अर्धे वर्ष संपलं.  अवघ्या आठ महिन्यानंतर म्हणजे २०२२ च्या मार्चमध्ये उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, मणिपूर, गुजरात आणि गोवा अशा ७ राज्यांच्या निवडणुका आहेत. त्या-त्या राज्यातला कॉंग्रेसचा नेता कोण? पंजाबमध्ये कॅप्टन अमरेंद्र सिंग एकदम योग्य नेतृत्व आहे, बाकी राज्यात कोण? आतापासून ठरवा. २०२३ साली म्हणजे दोन वर्षांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा आणि अतिपूर्वेकडे मेघालय, नागालँड आणि त्रिपूरा अशा ९ राज्यांच्या निवडणुका आहेत. यापैकी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यात २०१८ साली कॉंग्रेसला घवघवीत यश मिळालेले होते. आजही राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसचे राज्य आहे. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाला मिळाले. कॉंग्रेसचे आमदार फोडून तिथे शिवराजसिंग चौहान यांचे सरकार आले. कर्नाटकातही जनता दलाचे आमदार फोडूनच दोनवेळा तुरुंगात येडुरप्पाला भाजपाला पवित्र करुन घेऊन मुख्यमंत्री केले. म्हणून तिथे भाजपचे सरकार आले. येत्या दोन वर्षांत १६ राज्यात होणाºया निवडणुकीत कॉंग्रेस कोणती भूमिका घेऊन निवडणुका लढणार?, तिथे राज्याचे नेतृत्व कोणाचे? त्या-त्या राज्यातला कॉंग्रेस नेता सक्षम आहे का? त्या-त्या राज्याहून दिल्लीला जाणारा प्रभारी इथं दोन वर्ष राहणार आहे का? महाराष्टÑाचे प्रभारी एच.के.पाटील हे आतापर्यंतच्या महाराष्टÑाच्या प्रभारींमध्ये सर्वोत्तम प्रभारी आहेत. या १६ राज्यात जे प्रभारी नेमाल. त्यानां वर्ष दोनवर्षे मुक्कामालाच पाठवा. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि तयारी आतापासून करा. बघता बघता वेळ निघून जाईल आणि मग पुन्हा अहवालाची पाळी येता कामा नये. २०२३ संंपतो न संपतो तर २०२४ ला मे महिन्यात पुन्हा लोकसभा आणि २०२४ आॅक्टोबरमध्ये महाराष्टÑाची विधानसभा! बघता बघता दिवस जातील. म्हणून राज्या राज्यातल्या नेतृत्वाला ताकद देण्याचे निर्णय आतापासून व्हायला हवेत. ‘कॉंग्रेस पक्ष मास पक्ष’ आहे मान्य. ही काय ‘केडर’ पार्टी नाही. पण पक्षाचे स्वरुप १३५ वर्षापासूनचे आहे. मग फरक काय झाला तेवढा शोधा. मला तर चित्र असं दिसतयं की,  २०२४ च्या महाराष्टÑ विधानसभा निवडणुकीत भाजपाचा फडशा पडेलच, भाजपाचे ५० आमदारसुध्दा निवडुन येणार नाहीत. पण एकूण सरकारचा कारभार पाहता, शिवसेना आणि राष्टÑवादी खूप पुढे निघून गेली आहे, मजबूत झाले आहेत. आणि पाठिंब्याच्या नावावर सरकारमध्ये सहभागी असल्याच्या समाधानावर कॉंग्रेसला त्यांच्या पाठी चिपळ्या घेऊन चालत जाण्याखेरीज पर्याय राहीलेला नाही, त्यामुळे आज सरकारात असल्याचे समाधान असले तरी, कॉंगे्रेसचा कार्यकर्ता मात्र अस्वस्थ आहे हे समजून घ्या. समजनेवाले को इशारा काफी... आणि आमच्या नानाला एवढेच सांगणे  आहे की, ‘नाना तुम्ही सत्ता सोडून पक्षाध्यक्ष झालात फार मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही मैदानात उतरा, कॉंग्रेस पक्ष सरकारात सामील आहे की नाही, याचा तुम्ही विचार करु नका... मग पहा चित्र बदलून टाकण्याची ताकद कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. 
सध्या ऐवढेच

Comments

  1. नेमकं विश्लेषण...काॅग्रेस पक्ष आपला पराभव का झाला यापेक्षा भाजपा चा पण पराभव झाला याचा जास्त विचार करतंय....

    ReplyDelete
  2. वास्तव विवेचन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*