पवारसाहेब घरी आले....’मधुकर भावे उत्तर-दक्षिण

‘पवारसाहेब घरी आले....’
मधुकर भावे उत्तर-दक्षिण
कोणत्याही कुटुंबातला कर्ता पुरुष रुग्णालयातून योग्य उपचारानंतर घरी आल्यावर त्या कुटुंबात दिवाळीसारखी खुशी निर्माण होते.... ‘दादा’, ‘आण्णा’ ‘नाना’ ‘आप्पा’ अशा वेगवेगळ्या घरगुती नावाने हाक मारला जाणारा हा कुटुंबप्रमुख घरचा आधार असतो. त्याचा आजार बरा झाल्यानंतर त्यात खुशी होणारच. श्री. शरद पवार रुग्णालयातून घरी आल्याचा आनंद केवळ पवार कुटुंबियांमध्येच नव्हे तर महाराष्टÑाच्या अनेक घरातून हा व्यक्त झाला. ‘पवारसाहेब घरी आले’ ही आनंदाची भावना एका कुटुंबापुरती मर्यादीत नव्हती, ती महाराष्टÑाची प्रातिनिधीक भावना होती. कारण, पवारसाहेबांच नात महाराष्टÑाच्या घराघराशी आहे. जिल्ह्या-जिल्ह्याशी आहे. पक्षीय संबंधांच्या पलिकडचं आहे. असा नेता फार विरळा असतो. त्याचे घराघराशी संबंध जिव्हाळ्याने जोडलेले असतात. अशी नाती जोडणे आणि अशी जीवाभावाची माणसं वर्षानुवर्ष जपण, हे सोपं काम नाही. त्यामुळे या महाराष्टÑात किंबहुना देशात राजकारणाच्या पलिकडचे नेतृत्व म्हणून सर्व मान्य असलेले नेतृत्व आज फक्त शरद पवारसाहेब हेच आहेत, त्यामुळे एरवी पवारसाहेबांवर टीका करणारे अनेक पक्षातले राजकारणी, पवारसाहेबांची प्रकृती बिघडल्यावर राजकारणातला विरोध बाजुला ठेवून रुग्णालयात त्यांच्या भेटीला जातात. याच कारण सार्वजनिक जीवनात पवारसाहेब गेली ६० वर्षे असेच वागलेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागेवर आणि व्यक्तिगत संबंध त्याच्या पलिकडचे, ही महाराष्टÑाच्या पुरोगामी मनाची मोठी परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण यांनी या परंपरेचा पाया घातला. त्यामुळेच यशवंतरावांना हयातभर राजकीय विरोध करणारे 
श्री. एस.एम.जोशी असतील किंवा महाराष्ट्रातले फार मोठे शेतकरी नेते 
श्री. उध्दवराव पाटील असतील.. राजकारणात ते यशवंतरावांच्या विरुध्द होते. पण यशवंतरावांनी एस.एम आणि उध्दवरावांचा सत्कार करण्यात पुढाकार घेतला यशवंतरावांची हीच परंपरा शरद पवारसाहेब गेली ६० वर्षे चालवतात. यशवंतराव असतानाही आणि यशवंतराव गेल्यावरही. त्यामुळे महाराष्टÑातलं राजकारण निरोगी ठेवण्यात आणि हलक फुलक ठेवण्यात या नेतृत्वानं फार मोठी भूमिका नकळत बजावली आहे. विरोध करायचा पण द्वेष करायचा नाही, राजकारण संपल की व्यक्तिगत संबंध कायम ठेवायचं. अडीअडचणींना एकमेकांसाठी धावून जायचं, ही महाराष्टÑाची परंपरा. आजच्या घडीला तरी ही उच्च भावना जपण्याचे काम श्री. शरद पवार हेच करतात. त्यामुळेच राजकारणाच्या पलिकडचे नेते म्हणून घराघरात आदरणीय नेते असलेले शरद पवार हे महाराष्टÑाचे कुटुंब प्रमुख म्हणूनच मानले जातात. त्यामुळेच शरद पवार यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाल्यावर अनेकजणांनी आनंद व्यक्त केला. अनेकजण त्यांच्या प्रकृतीची चौकशी करतात. त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी प्रार्थना करतात.
  हे असे घडते याचे कारण पवारसाहेब हे नेतृत्व ६० वर्ष महाराष्टÑाच्या समोर सतत आहे आणि ते पक्षातीत आहे, असे कितीतरी किस्से आहेत की, जिथे पवारसाहेबांचा शब्द कोणी खाली पडू देत नाही आणि ज्यांना मदत हवी त्यांना पवारसाहेबांच्या शब्दांनी काम झाले नाही, असेही कधी घडत नाही. आजच्या घडीला कोणतीही ‘अपॉंयटमेंट’ न घेता एवढा मोठा नेता सकाळी ८ वाजता लोकांना भेटायला तयार असतो. जेवढे आले तेवढ्यांना तो भेटतो, त्यांच म्हणणं ऐकून घेतो आणि जी मदत करता येईल, ती मदत तात्काळ करतो. कुठचीही फालतु चर्चा करत न बसता, मुद्याचं  बोलून आलेल्या सामान्य माणसाच काम मार्गी लावण आणि ते काम मार्गी लागलं की, त्याच समाधान त्यांच्या चेहºयावर दिसत असतं. कोरोेनाच्या काळात परिचित नसलेल्या अनेकांनी केवळ फोन करुन मदत मागितली. कोणाला रुग्णवाहीका हवी होती, कोणाला रुग्णालयात कॉट मिळत नव्हती... अशा प्रत्येकासाठी महत्वाच्या विषय असलेल्या बारिक-बारिक विषयातही  लक्ष घालून ते काम पवारसाहेबांनी मार्गी लावलं अशी अनेक उदाहरण गेल्या वर्षभरात मी पाहीली आहेत. कामाला ते वाघ आहेत. सकाळी ७ वाजता तयार होऊन ८ वाजता आलेल्या सर्वांना भेटणारा या देशात दुसरा कोणता नेता आहे ते दाखवा. त्यांच्या कामाचा झपाटा, व्यक्तिगत जीवनातील शिस्त, असंख्य विषय डोक्यात ठेवून मार्गी लावण्याची हातोटी, सारेच विलक्षण आहे. 
गेल्या काही वर्षापूर्वी एका कठीण आजारावर मात करुन केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर पवारसाहेबांनी पुढच्या पिढीसाठी इच्छाशक्तीचे जे औषध दाखवून दिले त्याला तोड नाही. नवीन पिढीनं हे सर्व शिकून घेतलं पाहिजे. जे राजकीय पुढारी १०-११ वाजेपर्यंत तयार होत नाहीत. लोक भेटायला आले की त्यांना कंटाळा वाटतो. ते शरद पवारांसारखे यश कधीच मिळवू शकणार नाहीत आणि शेवटी यश हे पदांवर नाही. पवारसाहेब पदावर असतील किंवा नसतील... आज ते पदावर कुठे आहेत? अनेक वर्ष ते विरोधी पक्षात राहून लढत होते तेव्हा पदावर कुठे होते? पण पद असो -नसो. लोकांसाठी आणि लोकांमध्ये रहायच हेच त्यांच्या जीवनाच सूत्र आहे. 
एका किस्सा सांगून थांबतो. 
२०१९ च्या मे महिन्यात लोकसभेची निवडणुक आटोपली. निकाल २० दिवसांनी लागणार होते म्हणून निवडणुक आटोपली, त्यादिवशी रात्री अनेक नेते श्रमपरिहारासाठी परदेशात रवाना झाल्याची माहिती आहे. ती तारीख २४ मे २०१९ होती. २५ मे रोजी अनेक नेते जिनेव्हाला पोहोचले होते, काही विमानात होते आणि श्री. शरद पवारसाहेब २५ मे २०१९ रोजी रणरणत्या उन्हात सांगोला या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयाच्या बांधावर त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याच्या प्रश्नांची चर्चा करत होते. 
शरद पवार मोठे का? हे समजायला असे खूप प्रसंग मदत करतील. शरद पवार रुग्णालयातून योग्य उपचार घेऊन घरी आले, याचा आनंद महाराष्टÑाला का होतोे? याच उत्तरही शरद पवार यांच्या महाराष्टÑाशी एकरुप होण्यातच आहे, त्यामुळे काहीही संबंध नसताना माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला- जे शरद पवारसाहेबांना भेटू शकले नाहीत- असे लोक जळगाव, चंद्रपूर, सोलापूरपासून शेकड्यांनी  फोन  करुन आपला मनस्वी आनंद व्यक्त करतात आणि सांगतात... ‘अहो, छान बातमी वाचली..’ पवारसाहेब रुग्णालयातून घरी आले.’
गेल्या ६० वर्षांत शरद पवार यांनी आपल्या कुटुंबाला किती वेळ दिला असेल? आणि समाजासाठी किती वेळ दिला? हिशोब केला तर घरच्यांसाठी त्यांनी दिलेले दिवस जेमतेम दिवाळीतल्या चार दिवसातले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनीसुध्दा हे पूर्ण समजून घेतलं आहे. सौ. प्रतिभाताई पूर्णपणे घर सांभाळतात शरद पवार पूर्णपणे महाराष्टÑ सांभाळतात. त्यांची प्रिय लेक सुप्रिया हिसुध्दा आता महाराष्टÑाच्या लोकजीवनात समरस झालेली आहे.  मुंंबईत असताना सुप्रिया तरी घरी कुठे असते..... ती यशवंतराव प्रतिष्ठानच्या कामात व्यग्र असते आणि राहीलेल्या वेळात मतदारसंघ आणि लोकसभा. पवारसाहेबांचा हा संस्कार तिलाही सामाजिक भान देऊन गेला आहे.  पण सुप्रियाचे तिच्या प्रिय बाबांवर आणि त्यांच्या औषधांच्या वेळांवर किती बारिक लक्ष्य असते. दिल्लीमधला प्रसंग आहे.  पवारसाहेबांची एक मुलाखत 
‘६ जनपथला’ मी घेत होतो. रात्रीचे ८ वाजले होते. पवारसाहेबांची गोळ्या घेण्याची वेळ झाली होती. सुप्रियाताई मुलाखतीच्या जागेवर आली. ‘बाबा, गोळ्या घेण्याची तुमची वेळ झाली आहे, आधी उठा, गोळ्या घ्या आणि मग काय ती मुलाखत द्यायची ती द्या.’ सुप्रियाच्या त्या आवाजातली अपार प्रेमाची जाणीव कोणालाही झाली असती. पवारसाहेब न बोलता उठले, घरात गेले, औषध घेऊन पाच मिनीटात परत आले . पवारसाहेबांची कौटुंबिक काळजी इतक्या आत्मियतेने घेतली जाते आहे.... पण ते जेव्हा दौºयावर असतील तेव्हा हेच काम तेवढ्याच आत्मियतेने त्यांचे सचिव करतात हे ही मी पाहिलेले आहे. मग ते सतिश राऊत असतील किंवा सुनील रानडे असतील...वा अन्य सचिव असतील साहेबांना ते सगळे छानपणे जपतात...

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*