पॉझिटीव्ह’ शब्द झाला बदनाम....‘निगेटीव्ह’ला अकारण प्रतिष्ठा.... मधुकर भावे उत्तर-दक्षिण
‘पॉझिटीव्ह’ शब्द झाला बदनाम....
‘निगेटीव्ह’ला अकारण प्रतिष्ठा....
मधुकर भावे
उत्तर-दक्षिण
कोरोनाच संकट कधी संपणार याचा अंदाज कोणालाही करता येत नाही. आषाढी एकादशीला पांडुरंगासमोर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हे संकट निवारण होण्यासाठी साक्षात पांडुरंगाला साकड घातलं आहे. गेले १०० दिवस ८० टक्के देश घरात बसलेला असताना कोरोनावर नियंत्रण ठेवता आलेले नाही. ‘घर मे रहो - सुरक्षित रहो..’ सर्व चॅनेलवरील या जाहिरातींचा कसलाही परिणाम झालेला नाही. ‘घर मे रहो, कोरोना हार जाएगा’ ही पंतप्रधान मोदींची भाबडी आशा होती. ‘एक दीप जलाईये, कोरोना भाग जाऐगा’.. ‘थाली बजाईऐ, ताली बजाईए’ या सर्व घोषणा किती बिनकाामाच्या होत्या, हेही सिध्द झालं. आता कोरोनाची संचारबंदी ३१ जुलै पर्यंत आहे. २१ मार्च ते ३१ जुलै बंदी प्रयोग झाला. आता ३ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट पर्यंत थोडी ढील दिली जाईल. महाराष्टÑ विधानसभेचे अधिवेशन
३ ते १४ आॅगस्टपर्यंत आहे. ते संपल्यावर १५ आॅगस्टचे झेंडावंदन, मग लाल किल्लयावरुन पंतप्रधानांचे भाषण. या भाषणातून पंतप्रधान देशाला सांंगतील, ‘जिस हिम्मतसे देश के भाई बहनोंने कोरोना का सामना किया, मै सभी को नमन करता हूॅ, स्वतंत्रता की शुभकानाए देता हू, इसी धैर्य के साथ आगे भी मेरे प्यारे देशवासियो, इस संकट का मुकाबला करेंगे और हम आत्मनिर्भर होने की और चलेंगे...। ’ मग हे भाषण १५-१६ आॅगस्टपर्यंत ऐकत रहाव लागेल. नंतर मग इंडिया न्यूज चॅनेल ‘देश की सबसे बडी बहस’ कार्यक्रम करतील. सगळा आॅगस्ट महिना असा जाईल.
हे चालू असताना पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतच राहतील. मग या भाववाढीच विश्लेषण करणारे आणि त्यांच समर्थन करणारी एखाद्या मंत्र्याची अर्णब गोस्वामी मुलाखत घेताना दिसतील. हा सगळा कार्यक्रम जणू ठरलेला आहे आता ३१ जुलैपर्यंत घरात बसायचं आहे. जे घरात बसतील ते सुरक्षित, या भावनेचा निकाल कधीच लागलेला आहे. उपासमार सहन न झाल्यामुळे संचार बंदी असताना अनेकजण बाहेर पडले आणि काळजी न घेतल्याने काही शिकार झाले. जुलै संपल्यानंतर राहिलेल्या पुढच्या पाच महिन्यात कोरोना लगोलग संपेल, अशी स्थिती नाही. त्यामुळे ही बंदी संपूर्ण वर्ष संपेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या काळात महाराष्टÑाचे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे.
जे आर्थिक संकट आहे त्या संकटात ४ कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार गमावावा लागला आहे. अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत. अनेक उद्योगांनी अर्ध्या कामगारांना कमी करुन टाकलेलं आहे. देशाचा जो चौथा स्तंभ आहे, तो कोसळू पाहतोय. त्या कोसळलेल्या खांबाखाली अनेक पत्रकारांनी नोकºया गमावलेल्या आहेत. ‘सकाळ’ आणि ‘पुण्यनगरी’ या वृत्तपत्रांंनी नांदेड, जळगाव, अकोला अशा आवृत्त्या बंद केलेल्या आहेत. ‘हिंदुस्थान टाईम्स’ सारख्या ख्यातनाम इंग्रजी वृत्तपत्राने चार आवृत्त्या बंद केल्या आहेत. टाइम्सच्या फायद्यावर चालणारा ‘म.टा.’ आचके देऊ लागलेला आहे. ऐरव्ही पत्रकारांवर अन्याय झाला की, मोर्चे काढणारे पत्रकार संघटनांचे पुढारी आता गायब आहेत.
सर्वात मोठं आर्थिक संकट बेरोजगारीच आहे. मुंबई म्हणजे बॉलिवूड. १० लक्ष लोक इथं रोजंदारीवर या व्यवसायात काम करतात. या धंद्याला ग्लॅमर असलं तरी आता ते ग्लॅमर संपल. ४ महिने १०लाख लोक बेकार आहेत. दुसरा मोठा व्यवसाय बांधकाम व्यवसाय. या व्यवसायातील रोजंदारांवर उपासमारीची पाळी आली आहे. मार्च, एप्रिल, मे हा लग्नसराईचा हंगाम. या तीन-चार महिन्यातील विवाह संमारंभ रद्द झाल्यामुळे हजारो लोकांना रोजगार गमवावा लागला. बँडवाले, ताशेवाले, सनई चौघडेवाले, डिजेवाले अगदी छोटा उल्लेख करायचा झाला तर, वरातीत पेट्रोमॅक्सच्या बत्त्या डोक्यावर घेऊन १००-२०० रुपये मिळविणाºया शेकडो स्त्रिया. सर्वांचे रोजगार गेलेले आहेत. रोजगार गमावून उपासमारीच्या महामारीत सापडलेल्यांची संख्या आता ४ कोटीच्या आसपास झाली.
महाराष्टÑाचे आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. आषाढी एकादशी आणि पंढरपूर हे कोट्यावधी मराठी माणसांच्या श्रध्देचे विषय आहेत. कशी झाली आषाढी? वारकरी, टाळकरी, माळकरी हा महाराष्टÑातला लाखोंच्या संख्येचा विठुभक्त आषाढी एकादशीच्या एका दर्शनामुळे वर्षभर कष्टाला सामोरा जात होता. जगण्याची जिद्द घेऊन पंढरपूरहून परतत होता. शेकडो वर्षांची वारीपरंपरा खंडित झाली म्हणून हताश, निराश झालेला हा विठुभक्त एक रिंगण पहायला आसुसलेला होता. हे रिंगण म्हणजे महाराष्टÑाचे आध्यात्मिक वैभव आहे. कोरोनानं ते उद्ध्वस्त झालं आहे. जातीभेद उखडून टाकणारा हा आध्यात्मिक उत्सव कसा हताश, निराश गेला. आध्यात्मिक समाधान गमावल्यांची संख्या लाखांत आहे.
महाराष्टÑाच्या सार्वजनिक जीवनातील आणखी एक उत्साहाचा भाग म्हणजे सार्वजनिक गणपती. यावर्षी सार्वजनिक गणपतीउत्सव होणे अवघड आहे. या निमित्ताने होणारे करोडो रुपयांची उलाढाल या वर्षी होणार नसल्यामुळे त्याचा सगळा फटका व्यवसाय करणाºया छोट्या-छोट्या व्यावसायिकांना बसणार आहे. याखेरीज असंख््य सामाजिक कार्यक्रम, अनेकांना दिले जाणारे पुरस्कार कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन समारंभ, वसंत व्याख्यानमालासारखे प्रबोधनाचे उपक्रम, हे सगळे महाराष्टÑातले ज्ञानदीप विझले आहेत. सांस्कृतिक महाराष्टÑ अस्वस्थ आहे. नाटकवेडा मराठी माणूस, चित्रपटवेडा मराठी माणूस हतबल झालेला आहे. आता दोन वर्षतरी नाटक, चित्रपट हा विषय संपलेला आहे. समोरच्या घराचं दार उघडत नाही तर शेजारी-शेजारी बसून नाटक कोण बघणारं? कोरोनानं आयुष्याच नाटक करुन टाकलं. एका नाट्यसंहितेसाठी हा केवढा मोठा विषय आहे.
१ मे २०२० ला महाराष्टÑ राज्य ६० वर्षांच झालं. पाचवर्षांच्या संघर्षांनतर ते राज्य मिळालं. त्याचा ६० वा वाढदिवस संचारबंदीमुळे सुतकासारखा वाटला.
येणारी गुरुपौर्णिमा, नंतरचा गणपती उत्सव, या सर्व कार्यक्रमांमध्ये ओसंडून वाहणारा उत्साह... आता पार ओहोटीला लागलेला आहे. एका विषाणूनं ही वेळ आणलेली आहे.
आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे या चार महिन्यात माणसांमधला माणूससुध्दा मनाने फार दूर गेलेला आहे! सर्व घरांची दारं बंद आहेत. वºहाड्यांत, इमारतीच्या प्रवेशद्वारात, चुकुन दार उघड असलं तर समोरच्या बिºहाडातल्या व्यक्तीशी कोणीही बोलतसुध्दा नाही. तोंडावर पट्याच आहेत. कोणी शिंकल तर त्याचा तिरस्कारच होत आहे. प्रचंड इमारतीमधल्या फ्लॅटची संस्कृती वेगळीच आहे पण, एका चाळीत समोरसमोर राहणारे ‘सख्खे शेजारी’ सुध्दा आता मनाने खूप दूर गेलेत. अडीअडचणीत एकमेकांसाठी धावून जाणारी माणसं दिवसभर दार लावून घरात बसून आहेत. ‘कॉमन वºहांड्या’तला बाळाचा वाढदिवस, ८-१० बिºहाडांचा कार्यक्रम असायचा. आता ते सारं संपलयं. संशयाने सगळेच पछाडलेले आहेत. समोरचा प्रत्येक माणूस जणू ‘पॉझिटिव्ह’ आहे! आयुष्यात खरं म्हणजे ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) असायला हवं. पॉझिटिव्ह हा इंग्रजीमधला शब्द अतिशय चांगला आहे. एखादी व्यक्ती ‘पॉझिटिव्ह’ विचार करते, असं म्हटलं जातं आणि पॉझिटिव्ह विचार करणारा जीवनात यशस्वी होतो. ‘निगेटीव्ह’ (नकारात्मक) विचार करु नका असं सांगितलं जातं. पण आता ४ महिन्यात ‘पॉझिटिव्ह’ हा शब्द कमालीचा बदनाम झालेला आहे. आणि ‘निगेटिव्ह’ या शब्दाला मोठी प्रतिष्ठा आलेली आहे! (दहा वर्षापूर्वी ‘आदर्श’ हा शब्द बदनाम झाला होता). जगातील कोरोनाग्रस्त संख्या आणि रोग्यांच्या मृत्यूचे प्रमाणे नगण्य आहे. पण काल्पनिक भितीनं आणि चॅनेलवाल्यांनी निर्माण केलेल्या भयग्रस्त वातावरणानं माणसं कमालीची पछाडलेली आहेत. मोबाईलच्या रिंग्टोनवरसुध्दा जाहिरातीत सांगाव लागतय,.. ‘कोरोना बिमारी से लढना है, बिमार से नही...’ आमची सगळ्यांची मानसिकता ‘बिमार’ बद्दल तुच्छतेची झालेली आहे. संशय हे त्याचं कारण आहे.
....तर महाराष्टÑाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवन उध्दवस्त करणारा हा कोरोना अजून किती दिवस छळेल, सांगता येत नाही. हिंमतीनं सामना करायचा, आपली कामं करत रहायची. घरात बसून कोरोना साथ संपली असती तर ती केव्हाच संपायला हवी होती! येणाºया दिवसात देशातील शेतीचे उत्पादन, औद्योगिक उत्पादन धडाधड खाली येणार आहे. पेट्रोल, डिझेलची वाढ सगळ्या वस्तुंच्या महागाईसाठी शाप ठरणार आहे. बाजारातील आजचे दर पाहिले तर, या महागाईनं आधीच रोजगार गमावलेला सामान्य माणूस पुरता मोडून जाणार आहे. देशान ‘आत्मनिर्भर’ व्हावं असं सांगितलं जातं. सदिच्छा चांगली आहे. पण रिकाम्या पोटी सैन्य जशी लढाई जिंकू शकत नाहीत त्याचप्रमाणे रोजगार गमावून घरात बसलेली माणसं ‘आत्मनिर्भर’ होऊ शकत नाहीत. शिवाय आता भाषण हा कोरोनावरचा उपाय राहीलेलाच नाही. काम करुनच कोरोना पराभूत होईल. घरात बसून जिद्द हरवण्याची भीती आहे. जो घरात बसेल त्याच नशिब घरात बसेल. हिंमतीनं बाहेर पडा, काळजी घेऊन काम करा, जगातल्या ज्या देशात कोरोनानं तेथे हैराण केलं, ते देश तेथील लोक घरात बसलेले नाहीत. ते काम करत राहीले. तेथील चॅनेलवाल्यांनी काल्पनिक भय निर्माण केलं नाही. कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाण आता ९० टक्क्याच्या पुढे गेलेले आहे. पण, चॅनेलवाले घरात बसा म्हणून सांगतील. कोरोनाने मृत्यू टाळता येतो, घाबरु नका, रुग्ण बरा होणार आहे. असा विश्वास या चॅनेलवाल्यांनी कधीच दिला नाही. सुरुवातीला धक्क्याने जी माणसं गेली त्याला ५० टक्के चॅनेलवाले कारणीभूत आहेत. ‘सुबह के ८ बजे तक के २४ घंटोमे, इतने हजारो मरीज, २४ घंटोमे इतने सैंकडो मृत्यू’ या आकडेबाजीने भय निर्माण करण्याचं काम केलं. बरे झालेल्या रुग्णांची संख्या, सांगितली जात नव्हती. आता तर सामान्य माणसं कोरोनाच्या भयापासून मुक्तच झालेली आहे. ‘ज्याच पोट हातावर आहे. तो म्हणतो, काय व्हायचं ते होऊ द्या, मी कामाला बाहेर पडणार.... ’ हा निर्धारच कोरोनाला पराभूत करेल.
मी वैद्यकीय शास्त्राचा विद्यार्थी नाही. पण, रोजच्या अनुभवाचा एक उपाय सांगतो. सकाळी लवकर उठून जमेल तेवढा वेळ प्राणायाम करा. कसा परिणाम होतो पहा. हळद आणि मीठ टाकून गरम पाण्याने दहा मिनीटे गुळण्या करा. दिवसात २ वेळा तरी वाफ घ्या. एक लक्षात ठेवा. कोरोनावर कोणतेही अधिकृत औषध नाही. आपले उपचार आपल्याच हातात आहेत.
Comments
Post a Comment