आजची खरी गरज कुस्ती सुधरणे ही आहे

        खरंच कुस्ती सुधारली पाहिजे!


*मनोज मस्के :- मांगरूळ*  9890291065

ग्रामीण भागातील यात्रांना खऱ्या अर्थाने एक मोठा मान आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक यात्रेवर कुस्ती मैदान हे हमखास पहायला मिळते. कारण ग्रामीण भागात अजुन तरी कुस्तीचे मैदाने घेणे ही जुनी परंपरा कायम आहे.  आजकाल सर्वच जुन्यापुरान्या गोष्टींचा अंत झाला.  फक्त कुस्ती मात्र अजुन जिवंत आहे. अलीकडे तर कुस्तीला फारच चांगले दिवस आले आहेत.  आहो पुर्वी कुस्ती जिंकणार्यालाच बक्षीस मिळत होते. आता हारले तरी मिळते. कारण अलीकडे खुराकाला सुद्धा भरपुर पैशे लागतात. त्यात सर्वच पैलवान काय श्रीमंत असतात असं नाही. त्यामुळे ही पद्धत चांगली आहे.
       परंतु अनेक चांगल्या गोष्टींचे खुप वाईट परीणाम सुद्धा आहेत. कारण या मुळे कुस्तीत नुरा नावाचा राक्षस जास्त प्रमाणात पुढे येऊ लागला. तो ईतका वाईट आहे की तो पैशासाठीच खेळत असतो. त्यामुळे खरीखुरी कुस्ती मैदानात राहिलीच नाही.
     बरं मैदाने खेळणारी पोरं स्पर्धा खेळत नाहीत. कारण स्पर्धेत पैसा नाही.  कुस्ती ही पैशासाठी खेळली जाते असे अनेक मुलांच्या बापांना , मुलांना व वस्तादांना वाटत असते. पण हा निव्वळ मुर्खपणा आहे. आपल्याच पोरांचा पाय मागे ओढल्यासारखे आहे.
    अलीकडे मी अनेक मैदाने फिरत असतो. बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की वरच्या रांगेत खेळणारी जी मुलं आहेत ती गेली 10 वर्ष झाली आपली जागा सोडत नाहीत. कारण हरलं तरी पाकीट जिंकलं तरी पाकीट आणी समजा कुस्ती बरोबरी सोडवली तरी पाकीट नुकसान होतच नाही. आणि यांना या जागेवरून हलवले तर मात्र धमकी, मग पैपाहुणे, मित्रमित्रपरिवार, यांना मध्यस्थी करून कशीतरी आपली कुस्ती बसवणे व पैसा मिळवणे एवढाच उद्देश.
       खरं पहाता गावातील यात्रा कमीटींनी आता या कुस्ती मैदानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जी नवीन मुलं आहेत त्यांना वाव देणे. जुन्या पैलवानांनी आता स्पर्धा खेळणे गरजेचे आहे. मैदाने खेळुन खुप अनुभव तुम्हाला मिळाला आहेच . आता तुमच्या पाठीमागून येणार्‍या पैलवानांना जागा रिकामी करून देणे गरजेचे आहे. वारंवार  त्याच त्या  कुस्त्या बघुन कुस्तीशौकीनांना सुद्धा काही मजा राहीली नाही. असे अनेक कुस्ती प्रेमींनी बोलुन दाखवले आहे.
    आज अनेक मैदाने गावोगावी मोठ्या प्रमाणात होतात.  पण आजपर्यंत पैलवानांच्या मानधनातील गुत्ता काही कुस्ती आयोजकांना सोडवता आला नाही. कारण कुठल्या कुस्तीला किती मानधन हे गावातील कमेटीलाच  माहीत नसते. ते परगावच्या वस्तादांना विचारून पाकिटे भरतात आणी कोणाला कमी कोणाला जादा पैशे पाकिटात भरले जातात.  त्यामुळे पैलवान मैदानातच आयोजकांच्या आंगावर जातात. कृपया हा दुटप्पीपणा आयोजकांनी ही करू नये.  असे अनेक पैलवान सांगत होते. 
      या सर्व मैदानाची जबाबदारी तशी तालीम संघांची आहे. जर तालीम संघानी या मैदानांची दखल घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीला एक पत्रक काढणे गरजेचे आहे. ठराविक वजन गटाला एवढे मानधन द्यावे त्यापेक्षा जास्त मानधन देणार्‍याला व घेणाऱ्यांना कायदेशीर कारवाई करावी. असे प्रत्येक वजन गट प्रमाणे मानधन लिहुन प्रत्येक ग्रामपंचायतीकडे पाठवणे गरजेचे आहे.  तरच पुढील काळात कुस्ती जगेल अन्यथा ज्या प्रमाणे तालीम संघ झोपी गेलेत त्याच प्रमाणे कुस्ती सुद्धा झोपणार नाही तर संपणार असे काही कुस्ती जाणकारांनी सांगीतले.
      खऱ्या अर्थाने तालीम संघ नुसत्या झोपा काढत आहेत.  मुलांनी स्पर्धा खेळाव्या यासाठी  कुठलेही प्रयत्न  करताना दिसत नाही. आज  कोल्हापुर सांगली, सातारा पैलवानांच्या साठी प्रसिद्ध होते. ते फक्त जत्रेवरच्या फडासाठीच प्रसिद्ध राहीले आहे.
      पैलवान मित्रानो आज प्रत्येक मैदानावर कुस्ती करून नुसते पैशे मिळतील . पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ज्या आई -वडीलांनी जिवाचं राण करून तुम्हाला मागील  तो घास दिला. स्वतःच्या पोटाला खाल्ले नाही. त्यांचा तुम्ही म्हातारपणी आदार आहात. त्यांच स्वप्न एवढंच आहे. पोराला कुठेतरी नोकरी मिळावी. 
    आज तुम्ही तरूण मुलं आहात जरा विचार करा. आजची ताकद परत नाही , आजची वेळ परत नाही जोपर्यंत ताकद आणि वेळ आहे तोपर्यंत तुम्हाला किम्मत आहे.  कृपया सर्व पैलवानांनी गरजेपुरती मैदाने खेळावित व जास्तीतजास्त स्पर्धा खेळाव्यात. स्पर्धा तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेऊ शकते. मैदाने फक्त  गरज भागवू शकतात. शहाणे व्हा कदाचीत तुमच्यातला एखादा ऑलंपीकचं सुवर्ण पदक भारताला मिळवून देऊ शकतो.
       अलीकडे महिला कुस्ती जास्तच पुढे येताना दिसत आहे.  या लहान- लहान मुली सुद्धा अत्यंत चपळाईने खेळताना दिसत आहे. परंतु जर महिला कुस्ती मैदानात घ्यायची असल्यास त्याची स्वतंत्र व्यवस्था आयोजकांनी करणे गरजेचे आहे.  अनेक खेळाडू मुलींच्या बापांनी आपल्या मुलीला जर खरंच कुस्ती खेळाडू बनवायचं असेल तर मैदाने खेळुन काही कुस्ती खेळाडू होता येणार नाही. तर स्पर्धा खेळाव्या लागतील तरच नाव व पैसा मिळवणे शक्य आहे. 
   मला अभिमान वाटतो तो म्हणजे नरसिंह यादव याचा कारण मला निटसं आठवत नाही कदाचित 2005 किंवा 04 असेल नरसिंह यादव मुंबई शहर तालीम संघातर्फे डीलाईल रोड , जिमखाना येथे स्पर्धा  खेळण्यासाठी आला. महाराष्ट्र केसरी जिल्हा चाचणी स्पर्धा होती. आणी मुंबई उपनगर व मुंबई शहर असे दोन तालीम संघ होते. पण नरसिंह यादव हा मुंबईतून खेळत होता आणी तो सर्वांना हारवणार हे पक्के होते. त्यावेळी काही वस्तादांनी पैलवानांच्या डोक्यात भलतेसलते भरवले व स्पर्धा खेळायला आलेल्या नरसिंह यादवला डीलाईल रोड येथे तानुन-तानुन कपडे फाटेपर्यंत मारले. नरसिंग तेथून कसाबसा पळुन गेला. पण त्याने जिद्द ठेवली आणी भारताचा झेंडा ऊंचवन्याचा मान त्याला मिळाला तेंव्हा हीच मारणारी मंडळी मार्केटला हमाली करत होती.
         मित्रानो मागच्या ऐका महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपण विचार सुद्धा केला नव्हता किंवा ज्याच्या नावाची चर्चा सुद्धा नव्हती. असा आपला मित्र बाला रफीक याने फक्त जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र केसरीची गदा आनली आणी संपुर्ण महाराष्ट्रात अखंड कुस्तीशौकीनांना एक आनंदाचा धक्का दिला.  त्याने दाखवुन दिले की प्रामाणिक पणे केलेल्या प्रयत्नाला यश नक्की मिळते. तेंव्हा कृपाकरून सर्व पैलवानांना विनंती आहे. कृपया सर्वांनी स्पर्धा खेळुन पै. खशाबा  जाधव, पै. आंदळकर आबा, पै. मारूती माने, पै.  राहुल आवारे , पै. नरसिंह यादव   पै. विजय चौधरी पै. चंद्रहार पाटील, पै. बाला रफीक यासारख्या अनेक महाराष्ट्र केसरी पैलवान यांच्या प्रमाणे राज्याची, देशाची मान ऊंच होईल आणी आपल्या आई - वडीलांची व भारत देशाची मान ऊंच राहील त्यासाठी प्रयत्न करू.   छत्रपती शिवाजीराजे , छत्रपती शाहूमहाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील,  यांनी कुस्तीचा वारसा टिकवला. कुस्ती जिवंत ठेवली.  आज आपण ती टीकवनं गरजेचं आहे. तरच महाराष्ट्रातून अनेक हिरे ऑलंपीकसाठी पुढे येतील अन्यथा चालले ते बरे आहे. असंच म्हणावे लागेल.
     
धन्यवाद! 
  

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*